सोयाबीनवर गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, नियंत्रणासाठी कोणते उपाय करावेत?

पावसाळा सुरू असल्याने या वातावरणात गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. गोगलगायी घास, द्राक्ष, वाल, कारली, भोपळा, काकडी, टोमॅटो, लसूण, मिरची, भुईमूग, भेंडी, फुलकोबी, सोयाबीन इत्यादी पिकांची रोपे कुरतडतात. पावसाळ्यात त्या चारीलगत, बांधालगत असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. अंड्यातून बाहेर आल्यानंतर सुरवातीच्या वाढीच्या काळात गोगलगायींचा खाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे सुरवातीच्या काळात पिकांचे जास्त नुकसान करतात.
एकात्मिक नियंत्रणाचे उपाय -
1) शेतालगतचे बांध स्वच्छ करावे. 2) गोगलगायी दिसताच चिमट्याने अथवा हाताने गोळा करून उकळलेल्या पाण्यात टाकून माराव्यात. 3) संध्याकाळी शेतामध्ये ठराविक अंतरावर गवताचे ढीग ठेवावेत व सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून त्यांचा नाश करावा, तसेच पिकांच्या मुळाशेजारी गोगलगायींनी घातलेली पिवळसर पांढऱ्या रंगाची (100 ते 150च्या पुंजक्‍यात) साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत. 5) दहा लिटर पाण्यात एक किलो गूळ मिसळावा व त्या द्रावणात गोणपाटाची पोती भिजवून संध्याकाळी गोगलगायीग्रस्त शेतात ठराविक अंतरावर पसरावीत. गोगलगायी अशा पसरलेल्या पोत्यांखाली जमा होतात, सकाळ होताच त्यांचा वेचून नाश करावा. 6) सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खड्ड्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकावी. 7) जास्त उपद्रव असल्यास शेताभोवती दोन मीटर पट्ट्यात राख पसरून त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना 2ः3 या प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा किंवा बांधाच्या शेजारी तंबाखू अगर चुन्याच्या भुकटीचा चार इंच पट्टा टाकावा, त्यामुळे गोगलगायींना शेतात येण्यापासून अटकाव करता येईल. पाऊस पडत असल्यास या पद्धतीचा उपयोग होत नाही. 8) मेटाल्डीहाईड कीडनाशकाच्या गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत. प्रादुर्भाव असलेल्या शेतात संध्याकाळच्या वेळी पाच किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शेतात टाकल्यास, त्या खाऊन गोगलगायी मरतात. 9) विषारी आमिष देऊनही गोगलगायी मारता येतात, त्यासाठी गव्हाचा किंवा भाताचा 50 किलो कोंडा दोन किलो गुळाच्या द्रावणामध्ये 10 ते 12 तास भिजवून ठेवावा. त्यामध्ये 25 ग्रॅम यीस्ट मिसळावे. या मिश्रणात मिथोमिल कीटकनाशकाची 50 ग्रॅम भुकटी मिसळून संध्याकाळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रात प्रति हेक्‍टरी पसरून टाकावे. मिथोमिल हे
विषारी कीटकनाशक असल्यामुळे त्याचा वापर करताना प्लॅस्टिकचे हातमोजे घालावेत आणि नाका-तोंडावर कापड बांधावे. हे आमिष जनावरे व पाळीव प्राणी खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 10) सामूहिक प्रयत्न केल्यास प्रभावी नियंत्रण होते.