Welcome You All

RSS

ख रीप हंगामाच्या पूर्वतयारी

ख रीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये माती परीक्षण, जमिनीची पूर्वमशागत, बियाण्याची तरतूद, सेंद्रिय व रासायनिक खतांची त्याचप्रमाणे जिवाणू खतांची उपलब्धता करून ठेवणे, कीटकनाशकांची तसेच पेरणी अवजारे व हत्यारांची दुरुस्ती या बाबींचा समावेश होतो. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी माती परीक्षण उपयोगी ठरते. माती परीक्षणानुसार पिकास द्यावयाची खताची मात्रा निश्‍चित करता येते. जमिनीच्या पूर्वमशागतीमध्ये शेतात ढेकळे असल्यास ती बोड किंवा मैंदाच्या साह्याने फोडून घ्यावीत, जमिनीस उंच-सखलपणा असल्यास तिफणीने सपाट करावी. आडव्या-उभ्या कुळवाच्या पाळ्या द्याव्यात, शेवटच्या कुळवणीअगोदर शिफारशीप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. जमिनीची बांधबंदिस्ती करून पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे.

पीक उत्पादनवाढीसाठी संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांचा महत्त्वाचा वाटा असल्याने पेरणीसाठी बियाण्याची निवड करताना जास्त उत्पादन देणाऱ्या, खतास चांगला प्रतिसाद देणाऱ्या, कमी कालावधीत व कमी पाण्यात येणाऱ्या तसेच रोग व किडीस प्रतिकारक्षम असणारे वाण निवडावेत. शक्‍यतो प्रमाणित बियाणे पेरणीसाठी वापरावे. बियाणे खरेदी करताना त्याची उत्पादन तारीख, शुद्धता, वाणाचे/ जातीचे नाव, उगवणक्षमता इत्यादी सर्व गोष्टी पाहूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून त्याची पक्की पावती घ्यावी. विकत घेतलेल्या बियाण्याच्या पिशवीस असलेले लेबल व टॅग जपून ठेवावा, यदाकदाचित बियाण्यात काही दोष आढळल्यास बिल, लेबल व टॅगची संबंधितांकडे तक्रार करताना गरज पडते.

पीक पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेसाठी पिकानुसार शिफारस केलेल्या जिवाणू खतांची खरेदी करून ठेवावी. ज्वारी, बाजरी, भात, मका या एकदल व तृणधान्ये पिकासाठी ऍझोटोबॅक्‍टर, शेंगवर्गीय द्विदल पिकासाठी रायझोबियम हे जिवाणू संवर्धक वापरावे. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारचे रायझोबियम वापरावे. स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा आवश्‍यकतेनुसार बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.

पूर्वहंगामी कापूस लागवड ठिबक सिंचनावर केल्याने सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पिकाची वाढ जोमदार होते, लवकर फुले येतात. पर्यायाने हा कापूस हंगामी कापसाच्या तुलनेत वेचणीसाठी 20 ते 25 दिवस लवकर तयार होतो आणि उत्पादनात भरीव वाढ होते.

पूर्वहंगामी कापूस पिकासाठी उष्ण, कोरडे व कमी आर्द्रतायुक्त हवामान मानवते. या काळात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्वहंगामी कापूस पीक 25 ते 30 दिवसांचे होऊन त्यास पाते लागण्यास सुरवात होते. ठिबक सिंचनावर आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड योग्य वेळी करता येते व या पिकास पाण्याचा कोणताही ताण बसत नाही. सर्वसाधारणपणे पाच अश्‍वशक्तीचा पंप ताशी 18 ते 21 हजार लिटर पाणी देतो. एवढ्या पाण्यावर कमीत कमी दोन ते अडीच एकर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ठिबक पद्धतीने करणे शक्‍य आहे.

जमिनीची निवड ः
मध्यम ते भारी, काळी, कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. हलक्‍या, उथळ आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे.

पूर्वमशागत ः
एक खोल नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकाची धसकटे, पाला व काडीकचरा गोळा करून तो जाळावा व शेत स्वच्छ करावे. शेवटाच्या कुळवाच्या पाळीअगोदर 15 ते 20 गाड्या कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
ठिबक सिंचन संच उभारणी ः
पूर्वमशागत झाल्यावर शेताची पाहणी करून आराखडा तयार करावा. आराखड्याप्रमाणे ठिबक संचाची उभारणी करावी. पाण्याचा स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. कापूस पिकासाठी ड्रीपरचा प्रवाह चार लिटर प्रति तास असलेल्या 12 किंवा 16 मि.मी. इनलाईन नळीची निवड करावी. इनलाईन नळीच्या दोन ड्रीपरमधील अंतर 60 सें.मी. किंवा 90 सें.मी. असावे. ठिबक सिंचन पद्धतीत जोडओळ पद्धत किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, त्यामुळे प्रति हेक्‍टरी झाडांची संख्या कायम राहून खर्चात बचत होते, तसेच पीक फवारणी, आंतरमशागत व कापूस वेचणी ही कामे सोईस्कर राबविता येतात.
लागवड व्यवस्थापन ः
ठिबक सिंचन आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातींची निवड करावी. बी.टी. कापसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या व जास्त फळफांद्या असणाऱ्या जातीची निवड करावी. लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, जाती इ. बाबींचा विचार करावा. लागवडीसाठी बियाणे लावण्यापूर्वी (पेरणीपूर्वी) 12 ते 14 तास ठिबक संच चालवून शेतात वाफसा होईपर्यंत ओलावा निर्माण करावा. नंतर शिफारस केलेल्या अंतरावर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 60 ते 120 ु 90 सें.मी. किंवा 90 ते 180 ु 105 ते 120 सें.मी. अशा अनेक जोडओळ किंवा पट्टा पद्धतीने ठिबक संचालगत लागवड करावी. लागवड करताना इनलाईन नळीचे ड्रीपर व बियाणे लागवडीची जागा जवळ येतील याची काळजी घ्यावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll