Welcome You All

RSS

ठिबक संच

 लहान शेतकऱ्यांस ठिबक संच बसविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसेल, तर दोन-तीन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकाच विहिरीवर पंपसेट, फिल्टर, प्रेशर गेज, खताची टाकी किंवा व्हेंच्युरी इत्यादी संचामधील भाग सामाईक/ सामुदायिक पद्धतीने खरेदी करून बसवू शकतात. त्यामुळे लहान क्षेत्रावरदेखील संच परवडू शकेल. त्यातून पाण्याची, खताची, मजुरांची, वेळेची, ऊर्जेची आणि पर्यायाने पैशांची बचत होईल.

प्रवाही आणि फवारा सिंचनापेक्षा जास्त कार्यक्षम (९० ते ९८ टक्के कार्यक्षमता) असणारी पद्धत म्हणून या सिंचन पद्धतीचा उल्लेख करावा लागेल. सध्या शेतकऱ्यांनी विहिरींवर बहुतेक तीन ते पाच हॉर्सपॉवर शक्तीचे सेंट्रिफ्युगल पंपसेट बसविलेले आहेत, त्यामधून एक ते दीड कि.ग्रॅ./ चौ. सें.मी. दाबाने चार ते सहा लिटर/ सेकंद दराने पाणी उपलब्ध होते; मात्र अशा ठिकाणी फवारा सिंचन (रेनगन) पद्धत वापरावयाची असेल तर अडीच ते पाच कि.ग्रॅ./ चौ. सें.मी. दाब निर्माण करणारा पंप त्यासाठी घ्यावा लागेल; परंतु ठिबक सिंचन पद्धत एक ते दीड कि.ग्रॅ./ चौ. सें.मी. दाबावरच चालत असल्याने उपलब्ध पंपाचा वापर करता येतो.

ठिबक संच मांडणी -
१) उसाच्या शेताचे क्षेत्रफळ, लांबी, रुंदी, चढ-उतार इत्यादी. २) सिंचन पाण्याची उपलब्धता (विहिरीचे ठिकाण, पंपाची माहिती, उपलब्ध हेड, प्रवाह दर आणि उपलब्धता कालावधी). ३) सिंचन पाण्याची प्रत आणि ४) सिंचनाखाली येणाऱ्या शेताचा कंटूर नकाशा.

यानंतर निवडलेल्या लागवड पद्धतीसाठी ठिबक संचाचा आराखडा ठरवावा. त्यानुसार कमीत कमी खर्चाचा, कमी दाबावर व अश्‍वशक्तीवर चालणारा संच बाजारातून निवडावा.

ठिबक संच उभारणी -
संचाची उभारणी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी - १) कंपनीच्या नियमाप्रमाणे सर्व भाग (फिल्टर, पाइप, ठिबक उत्सर्जक) बसविल्याची खात्री करावी. २) संचाचे डिझाईन योग्य झाल्याची खात्री करावी व त्यानुसार मुख्य, उपमुख्य व उपनळीचा व्यास ठरवून प्रत्येक ठिकाणी प्रमाणित पाणी प्रवाह आणि दाब मिळत असल्याची खात्री करून घ्यावी. ३) मुख्य नळीवर उपमुख्य नळी जोडताना व्हॉल्व्ह लावावा, तसेच उपमुख्य नळीवर ग्रोमेट टेक-ऑफ लावून त्यावर उपनळी घट्ट बसवावी. त्यावर ठरविल्याप्रमाणे विशिष्ट अंतरावर ठिबक उत्सर्जक लावावेत. ४) ठिबक संचामधून पाण्याची गळती होत नसल्याची खात्री करून घ्यावी. ५) शेतात फिरणाऱ्या मजूर व जनावरांकडून नुकसान होणार नाही याची खात्री करावी. ६) संचात काडी, कचरा, माती, खडे आत जाणार नाहीत याची खात्री करावी.

ठिबक सिंचन पद्धत वापरताना -
१) गाळण यंत्रणा सक्षम असावी, दोन ते तीन दिवसांनी बॅक फ्लशिंग करावे. २) तोटी पद्धतीत पाण्याचा दाब एक कि.ग्रॅ./ चौ. सें.मी. असावा. उपनळीच्या दोन्ही टोकात पाणी दाबात २० टक्‍क्‍यांपेक्षा दाब व्यय ठेवू नये व पाणी प्रवाहात दहा टक्‍क्‍यांपेक्षा फरक असू नये. ३) तोट्या बंद पडू नयेत म्हणून उपनळ्या अधूनमधून फ्लश कराव्यात. ४) तोट्या शक्‍यतो दाब नियमन करणाऱ्या असाव्यात, त्यामुळे सर्वत्र पाणीवाटप समान होते. ५) ऊस पिकासाठी चार लि./ तास प्रवाह असणाऱ्या तोट्या किंवा इनलाईन पद्धती निवडावी. ६) वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत वेगवेगळ्या तोट्यांच्या प्रवाहास जमिनीचे ओलित क्षेत्र किती होते याची माहिती असणे गरजेचे आहे. कारण त्यावरून पिकास किती अंतरावर व किती प्रवाहाच्या तोट्या बसवाव्यात याची कल्पना येते. ७) पाण्यातील क्षारांमुळे संच अंशत- बंद झाल्यास त्यास आम्ल प्रक्रिया करावी. जिवाणू किंवा शेवाळांमुळे बंद झाल्यास त्यास क्‍लोरिन प्रक्रिया करावी. ८) नळ्या, पाइप फ्लशिंगच्या वेळेस पाण्याचा दाब दीड कि.ग्रॅ./ चौ. सें.मी.पर्यंत वाढवावा.

ठिबक संच निवड -
जोड ओळ पद्धत - उसाची लागवड जोडओळ अथवा चार ते पाच फूट अंतरावर करून ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. जोडओळ पद्धतीत दोन ओळीत एक व ४-५ फूट अंतरावरील लागवडीस एका ओळीस एक उपनळी वापरता येते. इनलाईन व तोट्या असणारी ठिबक सिंचन दोन्ही पद्धतींचा अवलंब करता येतो. दोन तोटीतील अंतर भारी जमिनीसाठी २.५' (एकूण तोट्या एकरी २०००) व मध्यम जमिनीसाठी २' (एकूण तोट्या एकरी २५००) ठेवावे.

ठिबक सिंचन करताना पाण्याची गरज -
पाण्याची उपलब्धता कमी असेल किंवा अति पाण्यामुळे जमिनीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अत्यंत कार्यक्षम अशा ठिबक सिंचन पद्धतीची निवड केली जाते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना दर दिवशी अथवा दिवसाआड देण्यात येणारे पाणी खालील सूत्राने काढता येते -

यासाठी बाष्पीभवन पात्रातून दररोज होणारे बाष्पीभवन, पीक गुणांक, दोन उपनळ्यांमधील आणि दोन तोट्यांमधील अंतर, अपेक्षित ओलित क्षेत्र इत्यादी माहिती आवश्‍यक आहे.

प्रत्येक तोटीद्वारे द्यावयाचे पाणी (लिटर प्रति दिवसाआड) = दोन दिवसांचे एकत्रित बाष्पीभवन x ०.७ x पीक गुणांक x दोन तोट्यांमधील अंतर x दोन उपनळ्यांमधील अंतर x ०.६० ÷ ०.९०.

वरील सूत्रामध्ये बाष्पीभवन मि.मी.मध्ये असते, तर ०.७ हा बाष्पीभवन पात्र गुणांक आहे. ०.६ हा अपेक्षित ओलित क्षेत्र गुणांक आहे आणि ०.९० हा समप्रवाह गुणांक आहे.

ऊस लागवड केलेल्या ठिकाणी दररोज किंवा दिवसाआड होणारे बाष्पीभवन माहीत असल्यास वरील सूत्राचा उपयोग करून पाण्याची गरज ठरविता येते.

उदाहरण - समजा सुरू उसासाठी जानेवारी महिन्यात पाण्याची गरज काढताना बाष्पीभवन ६.९ मि.मी. असेल, पीक गुणांक ०.६० असेल, उपनळ्यांमधील अंतर २.७० (जोड ओळ पद्धत) व ठिबक तोट्यांमधील अंतर ०.७५ मीटर असेल, तर दर दिवसाआड लागणारे पाणी खालीलप्रमाणे ठरविता येईल -

दिवसाआड पाण्याची गरज (लिटर/ तोटी) = (६.९x२) x ०.७०x०.६०x०.७५x२.७०x०.६०÷०.९०.

जानेवारी महिन्यातील सुरू उसासाठी दिवसाआड पाण्याची गरज = ७.८२ लिटर/ तोटी म्हणजेच आठ लिटर/ तोटी एक एकर ३' - ६' जोड ओळीच्या क्षेत्रास ८x२००० = १६,००० लिटर पाणी लागेल.

ठिबक पद्धतीने (चार लिटर/ तास ड्रीपर), उन्हाळ्यात दररोज तीन ते साडेतीन तास, हिवाळ्यात दोन ते तीन तास व पावसाळ्यात दोन ते अडीच तास पाणी द्यावे. पाण्याची बचत होऊन २५ ते ३० टक्के उत्पादन वाढते.

संचामधून विद्राव्य खतांचा, तसेच नेहमीच्या खतांपैकी युरिया व पांढऱ्या रंगाचे म्युरेट ऑफ पोटॅश या खतांचा वापर करता येतो. ज्याद्वारे खतांची २५ - ३० टक्के बचत होते. ठिबक उपनळ्या काढून उसाची तोडणी करून घ्यावी आणि त्यानंतर खोडव्याचे व्यवस्थापन योग्य करून पुन्हा उपनळ्या पसरवून खोडव्यात पाण्याचे व खतांचे योग्य तऱ्हेने नियोजन करून उसाचे उत्पादन वाढविणे शक्‍य होते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

3 comments:

Unknown said...

मला माझ्या शेतामध्ये ठिबक सिंचन करावयाचे आहे. माझे शेत दोन ठिकाणी आहे. एका ठिकाणी दिड एकर व दुस-या ठिकाणी सव्वा एकर शेत आहे. ज्याठिकाणी दिड एकर शेत आहे त्या ठिकाणी विहीर आहे. विहीरीपासून 250 पाईपची पाईपलाईन केलेली आहे. तेथे सव्वा एकर शेती आहे. दोन्ही शेतामध्ये ठिबक टाकायचे आहे. यासाठी विहीरीवर फिल्टर बसविले तर चालेल का? दोन शेतामध्ये दोन वेगवेगळे फिल्टर बसवावे लागेल? मी नेटाफिम किंवा जैन टर्बो कंपनीचे ठिबक घेणार आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

Unknown said...

वाळुज एम आय डि सी मधे कुठे ठिबक सिंचन मिळेल ठिकाण सुचवा

Drip Irrigation System Subsidy 80% said...

ठिबक संच जिथे आहे त्या जवळ फिल्टर बसविले पाहिजे कारन फिल्टर मधील जाळी धुवून पून पुन्हा टाकायला दूर जावे लागेल

Post a Comment

Text

Followers

Blogroll