आवळा लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. लागवडीसाठी कृष्णा, कांचन, चकय्या, नीलम या जातींची निवड करावी. लागवडीसाठी एप्रिल महिन्यात 7 x 7 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतराचे खड्डे करून 20 किलो शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक भुकटी आणि मातीच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. चांगला पाऊस झाल्यावर कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची निवड करावी. त्यामुळे फळधारणा वाढण्यास मदत होते.
चिकू लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीसाठी खिरणीचा खुंट वापरून तयार केलेले कलम निवडावे. लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतरावर खड्डे खणून त्यामध्ये चांगली माती, तीन घमेली शेणखत, दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम कार्बारिल भुकटी यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल या जातींची निवड करवी.