कृषी विज्ञान केंद्रातील मत्स्यशेती तज्ज्ञ डॉ. बी. प्रदीप म्हणाले, की कोळंबी बीजोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक लागते; परंतु श्री. मनोज यांच्याकडे असलेले शेततळे लक्षात घेऊन आम्ही कोळंबी बीजोत्पादनासाठी लहान टाक्या तयार केल्या. आमच्या सल्ल्यानुसार श्री. मनोज यांनी प्रायोगिक तत्त्वावर कोळंबी बीजोत्पादनास सुरवात केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी कोळंबीच्या 5000 नवजात पिल्लांची विक्री केली.
बीजोत्पादनासाठी पिंजरा पद्धत
कोळंबी बीजोत्पादनानंतर श्री. मनोज यांनी पर्लस्पॉट जातीच्या बीजोत्पादनासाठी पिंजरा पद्धतीचा अवलंब केला आहे. हा पिंजरा त्यांनी प्लॅस्टिकच्या जाळीपासून तयार केला आहे. शेततळ्यातील पाण्यात हा पिंजरा तरंगण्यासाठी त्यांना चारही बाजूने पीव्हीसी पाइपचा सांगाडा तयार केला. परंतु पिंजरा तयार करण्यासाठी पीव्हीसी पाइपचा खर्च वाढला. हा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर केला. बूच लावलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या जाळीच्या पिंजऱ्याला वरच्या बाजूला लावल्या. त्यामुळे हा जाळीचा पिंजरा पाण्यात योग्य पद्धतीने तरंगू लागला. जाळीचा हा पिंजरा 3 मीटर ु 1 मीटर ु 1 मीटर आकाराचा आहे. पी.व्ही.सी. पाइपचा वापर करून हा पिंजरा बनविण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो. परंतु श्री. मनोज यांनी हा जाळीचा पिंजरा एक हजार रुपयांत तयार केला आहे. या पिंजऱ्याचा वापर करून दर हंगामात 20 हजार पर्लस्पॉट बोटुकलींची विक्री परिसरातील शेतकऱ्यांना केली. या कमी खर्चाच्या मत्स्यबीजोत्पादनातून त्यांना चांगला आर्थिक नफा मिळतो आहे.