"एकरी शंभर टन ऊस उत्पादन घ्या' हा नारा अलीकडे अनेक वेळा दिला जातो. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर इचलकरंजीपासून (जि. कोल्हापूर) केवळ तीन किलोमीटर अंतरावर माणकापूर गाव आहे.
तेथील मलकारी तेरदाळे यांनी मात्र हा "नारा' आपल्या शेतीत एकदा नव्हे तर सातत्याने अमलात आणला आहे. शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्यातर्फे आयोजित 2010-11 हंगामातील ऊसपीक स्पर्धेत त्यांनी एकरी 117.795 मेट्रिक टन उत्पादन काढून पहिला क्रमांक मिळविला आहे.
पाणी, खत, बेणे यांच्या वापरात बचत व त्यांचा काटेकोर वापर करणे सध्याच्या ऊसशेतीत गरजेचे झाले आहे. अनेक शेतकरी आपले नियोजन त्याप्रमाणे करताना दिसत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर इचलकरंजीपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर माणकापूर (ता. चिक्कोडी) हे गाव आहे. सरकारी कामकाज बेळगावला होत असले तरी या गावचा दररोजचा संपर्क महाराष्ट्रातील शहरांशीच येतो. याच गावातील मलकारी नेमू तेरदाळे या शेतकऱ्याने गेल्या काही वर्षांपासून उसाचे एकरी उत्पादन सातत्याने शंभर टनांपर्यंत तर काही वेळा त्याहून जास्त घेण्याचा सपाटा लावला आहे. शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या 2010-11 या हंगामातील ऊसपीक स्पर्धेत त्यांनी एकरी 117.795 मेट्रिक टन उत्पादन काढून पहिला क्रमांक मिळविला. खोडव्याची तोडणी झाल्यानंतर सातत्याने रान वाळविण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. यामुळेच उत्पादनात सातत्य तर राहतेच, पण जमिनीचा पोत कायम राहत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
लावणीपूर्वीचे व्यवस्थापन
तेरदाळे यांची चोवीस एकर जमीन आहे. त्यात ते सातत्याने ऊस घेतात. प्रत्येक वर्षी या पिकाचे त्यांचे नियोजन वेळापत्रक ठरलेले असते. ऊस स्पर्धेत भाग घेण्यापूर्वीही फुले 265 जातीचा ऊस त्यांनी घेतला होता. याचे उत्पादन शंभर टनांवर निघाले. तेरदाळे यांचे लागवडीचे नियोजन थोडक्यात व प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचे तर हरभऱ्याचा बेवड चांगला असल्याने या पिकानंतर ऊस घेण्याचे नियोजन केले. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने हरभऱ्याचे उत्पादन कमी आले. एकरी चार पोती हरभरा निघाला. हरभऱ्याच्या काढणीनंतर उभी- आडवी नांगरट केली. यानंतर एक महिना कालावधीपर्यंत रान वाळविले. यानंतर पुन्हा नांगरट केली. त्यानंतर दक्षिणोत्तर सऱ्या सोडल्या. त्याही महिनाभर वाळविल्या. लागवडीपूर्वी माती परीक्षण केले होते. त्याच्या अहवालानुसार जमिनीस एकरी चार पोती सेंद्रिय खताचा डोस दिला.
लावणीनंतरचे व्यवस्थापन
मागील वर्षी 27 जुलैला को- 86032 या जातीची सरी पद्धतीने आडसाली लावण केली. दोन डोळ्यांचे एकरी साडेसहा हजार टिपरी इतके बेणे वापरले. साडेतीन फुटाची सरी सोडून चांगल्या वाफशावर लागवड केली. या वेळी हलके पाणी दिले. उगवण झाल्यानंतर भरणीपूर्वी तीन भांगलणी केल्या. पहिली भांगलण लावणीनंतर एक महिन्यांनी केली. त्यानंतर पंधरा दिवसांत युरियाची दोन पोती, निंबोळी पेंड एक पोती मिसळून ते देण्यात आले. भरणीनंतर दोन भांगलणी झाल्या. सर्व भांगलणी मजुरांमार्फतच केल्या. तणनाशकाचा कोठेही उपयोग केला नाही. भरणीपूर्वी तीन व भरणीनंतर दोन अशा प्रकारे पाच वेळा टॉनिक दिले. एकरी पन्नास हजार ऊस संख्या कशी राहील याकडे विशेष करून लक्ष दिले. निरोगी नसलेले फुटवे काढले. चांगल्या बियाणे प्लॉटमधून बेण्याची निवड केल्याने उगवण चांगली म्हणजे सरासरी 90 ते 95 टक्क्यापर्यंत झाली. भरणीच्या वेळी युरिया तीन पोती, पोटॅश तीन पोती, गंधक दहा किलो, विविध सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत दहा किलो आदींचा वापर केला. लोकरी मावा येऊ नये यासाठी कीटकनाशकाची एक फवारणी करण्यात आली.
पाणी नियोजन सरी पद्धतीनेच पाणी दिले. लावणीपासून तोडणीपर्यंत 51 वेळा पाणी दिले. पाणी देताना पाणी अतिरिक्त अथवा कमी होणार नाही याची खबरदारी घेतली. मरके फुटवे काढण्यासाठी उगवणीपासून भरणीपर्यंत "अर्धी' सरीच पाणी दिले. भरणीनंतर पाण्याच्या प्रमाणात थोडी वाढ केली. पावसाळा व हिवाळ्याच्या कालावधीत वेळेत तीन आठवडे ते एक महिन्यानंतर पाणी दिले. तर उन्हाळ्यात पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी दिले. पाणी देताना नेहमीच काटेकोरपणा ठेवण्याचा प्रयत्न केला. तोडणी होईपर्यंत काटकसरीने व वाफसा स्थिती राहील अशा बेतानेच पाणी दिले.
जमा खर्च (एकरी)
तपशील खर्च (रुपयांत व एकरी)
ट्रॅक्टर भाडे - 3000
ऊस बियाणे- 3600
खत- 10,000
मजुरी खर्च- 4000 (मशागत)
मजुरी खर्च 2500 (पाणी देण्यासाठी)
बैलजोडी- 2000
रसायने- 4000
..............................................
एकूण खर्च- 29 100
मिळालेले उत्पादन- 117.795 मेट्रिक टन
मिळालेला भाव- 2300 रुपये प्रति मेट्रिक टन
एकूण रक्कम- दोन लाख 70 हजार 928 रुपये
खर्च वजा जाता मिळालेला निव्वळ नफा - दोन लाख 41 हजार 828 रुपये
शतकवीर "तेरदाळे'
तेरदाळे यांनी यापूर्वीही सातत्याने एकरी शंभर टनांच्या वर ऊस उत्पादन घेतले आहे. त्यांचे सरासरी उत्पादन 70 टन इतके आहे. गेल्या दहा वर्षांत सत्तर टनांपेक्षा कमी ऊस त्यांनी काढलेला नाही. त्यांनी उच्चांकी ऊस उत्पादनाची विविध पारितोषिकेही पटकाविली आहेत. तेरदाळे सध्या तरी फुले 265 व को 86032 या वाणाचा वापर करतात. यापूर्वीही त्यांनी अनेक वाण वापरले, मात्र हे दोन वाण अधिक फायदेशीर वाटल्याचे त्यांनी सांगितले. शिरोळच्या दत्त साखर कारखान्याच्या वतीने एकरी दीडशे टन ऊस उत्पादन हा महत्त्वाकांक्षी प्रयोग सुरू करण्यात आला आहे. त्यात तेरदाळे यांनी भाग घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष सा. रे. पाटील यांच्या सान्निध्यात राहिल्याने अनेक लहान-सहान गोष्टींचा अभ्यास करता आला. कारखान्याच्या वतीने प्रत्येक वर्षी उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. तेरदाळे स्वत: या कारखान्याचे संचालक असल्याने या सत्काराच्या वेळी ते उपस्थित असायचे. दुसऱ्याला हे पारितोषिक मिळते तर आपल्याला का मिळू नये, असा विचार येऊन त्यांनी आपली शेती या कारखान्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून सुधारली. या चांगल्या शेतीत आजपर्यंत सातत्य ठेवले आहे.
रान वाळविण्यामुळे उत्पादनात वाढ
उच्चांकी उत्पादनाबाबत बोलताना तेरदाळे यांनी सांगितले, की साखर कारखान्याने दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी उसाचे व्यवस्थापन केले; परंतु माझ्या शेतीच्या यशात अनेक गोष्टींपैकी शेताला देत असलेली विश्रांती ही गोष्टही महत्त्वाची ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उसाची लागवड करण्याआधी सुमारे दोन महिन्यांपर्यंत शेतजमिनी पूर्ण उन्हात वाळवितो. जमिनीचा पोत तयार होण्यासाठी जमिनीला मिळालेली विश्रांती महत्त्वाची ठरते. सूर्यप्रकाशामुळे जमिनीची प्रत सुधारून ती अधिक उत्पादनशील बनते असा माझा अनुभव आहे. साधारणत: 1994 पासून मी सातत्याने जमीन तापविण्यावर भर दिला आहे. तसेच ताग, धैंचा या हिरवळीच्या पिकांसोबत हरभऱ्याचे पीक घेतो. ही पिके काढल्यानंतर रान वाळवितो. इतर मशागतींबरोबरच रान वाळविणे म्हणजेच उत्पादन वाढविणे हे यशाचे सूत्र मी अंगीकारले आहे. खते देताना ती विस्कटून न टाकता खते टाकल्यानंतर ती झाकून घेतो. यामुळे पाण्याबरोबर खते वाहून जात नाहीत, तसेच पाणी देताना रानातले पाणी बाहेर पडू नये यावर विशेष लक्ष असते. सरीतून पाणी कडेला जाण्याअगोदर काही वेळ सरीचे पाणी बंद केले जाते. यामुळे सरीत पाणी अतिरिक्त होत नाही. जमिनीला हवे तेवढे पाणी मिळते. अशा लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिल्यानेच माझ्या उत्पादनातील सातत्य टिकून आहे.
शेतकरी संपर्क
मलकारी नेमू तेरदाळे, 0230-2600225
मु.पो. माणकापूर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव (कर्नाटक)