Welcome You All

RSS

हरळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी

संत्रा बागेत हरळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, नियंत्रणासाठी ग्लायफोसेटची फवारणी करावी का? काय काळजी घ्यावी?
परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ प्रा. आनंद गोरे यांनी दिलेली माहिती ः हरळी हे खूप काटक असे तण आहे. ते एकदा का शेतात वाढू लागले, की त्याचे नियंत्रण करणे अवघड होते. वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत असेल तर तणनाशकाने नियंत्रण होते; मात्र त्यानंतर शेतात पाणी दिले, की हरळी पुन्हा वाढू लागते. शेतात हरळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर करून या तणाचे नियंत्रण होऊ शकते; मात्र त्याचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
फवारणीवेळी ही काळजी घ्या…
बागेत फवारणी करताना पंपाला हूड लावूनच फवारणी करावी. तणनाशक झाडाच्या जवळपास किंवा हिरव्या भागावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतात पाणथळ जागा राहणार नाही याकडे लक्ष द्यावे. तण हे लुसलुशीत व चार ते पाच पानांवर असावे. तणांच्या प्रादुर्भावानुसार हेक्‍टरी दोन ते चार लिटर ग्लायफोसेट प्रति 500-600 लिटर पाण्यातून फवारावे. फ्लॅट नोझलचा वापर करावा. फवारणी स्वच्छ सूर्यप्रकाशात करावी. ढगाळ वातावरणात करू नये. फवारणीनंतर 21 दिवसांपर्यंत शेताची मशागत करू नये. तणांच्या उगवणीपूर्वी बागेत ऍट्राझीन हे तणनाशक दीड ते तीन लिटर प्रति हेक्‍टरी फवारल्यास चांगले नियंत्रण मिळते.


कोणतीही कंपनी जेव्हा एखादे कीटकनाशक, बुरशीनाशक वा तणनाशक किंवा अन्य कोणतेही रसायन संशोधित करते त्या वेळी तेथील प्रयोगशाळेत त्याच्या चाचण्या घेऊन जे ज्या गोष्टीसाठी कार्य करते त्यासंबंधीची जैविक क्षमता तपासली जाते. याला इंग्रजीत बायो इफिकसी म्हणतात. मात्र या उत्पादनाची जैविक क्षमता केवळ प्रयोगशाळेपुरतीच नव्हे तर प्रत्यक्ष शेतातही तपासून सिद्ध व्हावी लागते. त्यासाठी विविध कृषी हवामान विभागांमध्ये व हंगामांमध्ये म्हणजे भारतात त्याच्या प्रायोगिक चाचण्या घ्याव्या लागतात. कृषी विद्यापीठे किंवा संशोधन केंद्रांतून या चाचण्या संबंधित कंपनीमार्फत घेतल्या जातात. त्याला “मल्टीलोकेशनल्स फील्ड ट्रायल्स’ असे म्हणतात. या चाचण्यांव्यतिरिक्त पशु-पक्षी, जलाशय, मासे, किंवा एकूणच पर्यावरणासाठी हे उत्पादन सुरक्षित आहे का त्यासंबंधीच्या किंवा त्याच्या विषारीपणाबाबतच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यानंतर सर्व चाचण्यांचा हा अहवाल सीआयबीआरसीकडे सुपूर्त केला जातो. त्यानंतर या संस्थेमार्फत त्याचा अभ्यास होऊन कीडनाशकाच्या विक्रीला कायदेशीर वा अधिकृत मंजुरी दिली जाते. आता हे उत्पादन शेतकरी वापरणार असल्याने त्या उत्पादनाविषयी आवश्‍यक ती माहिती त्याच्या पॅकिंगवर किंवा बाटलीवर लिखित स्वरूपात छापणे अत्यावश्‍यक असते. त्याला लेबल असे म्हणतात. या लेबलमध्ये कोणती माहिती संबंधित कंपनीने देणे गरजेचे आहे त्याचे काही नियम वा निकष ठरवून दिलेले असतात. आता या कीडनाशकाची वा उत्पादनाची शिफारस ज्या पिकावरील ज्या किडीसाठी, ज्या मात्रेत (डोस) करण्यात आली आहे ती माहिती म्हणजेच लेबल क्‍लेम होय.
उत्पादनासोबत कंपनी एक छोटी घडीपत्रिका किंवा माहितीपत्रिका देते. त्यात हे लेबल क्‍लेम दिलेले असतात. (तुम्ही लीफलेट उघडून पाहा. त्यात कीडनाशकाचे नाव, सक्रिय घटक, कोणकोणत्या पिकांवर, कोणकोणत्या किडी-रोग वा तणांचे नियंत्रण), वापरण्याची मात्रा व डोस, पाणी याचा एक तक्ता वा कोष्टक दिलेले असते. ही माहिती म्हणजेच लेबल क्‍लेम.
उदा. कंपनीने या कोष्टकात आपल्या कार्बेन्डॅझीम या उत्पादनाचा (बुरशीनाशक) डोस भुईमुगावरील टिक्का रोगासाठी प्रति हेक्‍टरी प्रति 600 लिटर पाण्यासाठी 225 ग्रॅम आहे असे जेव्हा लिहिलेले असते त्याचा अर्थ भुईमूग पिकावर टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाचा लेबल क्‍लेम आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच विविध चाचण्यांतून पार पडल्यानंतर शास्त्रीय कसोटींवर आधारित सिद्ध झालेली किंवा करण्यात आलेली ही अधिकृत शिफारस होय. आता पॅकिंगवर लेबलच्या स्वरूपात जी माहिती कंपनी उपलब्ध करते त्याचे विस्तृत विवरण घडीपत्रिकेत असते. त्याला इंग्रजीत लीफलेट असे म्हणतात. प्रत्येक उत्पादनासोबत प्रत्येक कंपनी हे लिफलेट देते. पॅकिंगवरील माहितीवर कंपनीने असे लिहिलेलेच असते की अधिक माहितीसाठी लिफलेट वाचावे. मात्र अनेकवेळा बाटली एकीकडे, लीफलेट दुसरीकडे अशी विक्री केंद्रावर परिस्थिती असते. कोणत्याही परिस्थितीत बाटली किंवा उत्पादनाचा पुडा यासोबत दोन गोष्टी घेतल्याशिवाय शेतकऱ्याने दुकान सोडू नये. 1)खरेदीची पक्की पावती 2) लीफलेट (लेबलचे माहितीपत्रक वा घडीपत्रक)
लीफलेट घरी जाऊन सविस्तर वाचावे. अनेकवेळा लीफलेटवरील माहिती अत्यंत बारीक अक्षरात लिहिलेली असते, त्यामुळे ती डोळ्यांनी सहजासहजी वाचणे कठीण जाते. अशा वेळी चांगल्या दर्जाच्या भिंगाचा वापर करावा. शेतात किडींचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे भिंग असावेच लागते. त्याचा वापर करावा. लीफलेट कायम जपून ठेवावे. आपल्यासोबत अन्य शेतकऱ्यांनाही लेबल क्‍लेमचे महत्त्व समजावून द्यावे.
लेबल क्‍लेममुळे काय फायदे होतात?
शेतकऱ्याला त्या उत्पादनाच्या गुणवत्तेविषयी कायदेशीर हमी वा संरक्षण मिळते.
देशभरात विविध ठिकाणी (कृषी विद्यापीठे वा संशोधन संस्था) संबंधित कीडनाशकाच्या चाचण्या घेतलेल्या असतात. त्यामुळे सर्वत्र त्याची जैविक क्षमता तपासून मगच त्याची अधिकृतरीत्या ती शिफारस असते.
लेबल क्‍लेमद्वारे संबंधित कीडनाशकाची केवळ मात्रा, वापरण्याची वेळ निश्‍चित होते असे नाही, तर संबंधित पीक, मानव, पर्यावरण, मित्रकीटक, जनाव, जलाशय,मासे आदी घटकांवर कीडनाशकाच्या होणाऱ्या परिणामांच्या चाचण्या तपासलेल्या असतात. त्यानंतर ते सुरक्षित वापरासाठी घोषित करण्यात येते.
लेबल क्‍लेममधून “पीएचआय’ शेतकऱ्यांना समजून येतो. ज्यावरून पुढे “एमआरएल’ मिळवणे शक्‍य होते.
एखादे कीडनाशक वा कोणतेही रसायन आपण स्वतःच्याच निर्णयाने जर एखाद्या पिकावर वापरले तर त्याचा त्या पिकावर किंवा पाने, कळ्या, मोहोर, फळांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. लेबल क्‍लेम मिळालेल्या रसायनाच्या अशा चाचण्या घेतल्या असल्याने तो धोका टळला जाऊ शकतो.
लेबल क्‍लेममुळे एखाद्या रसायनाची चुकीची शिफारस करण्यास प्रतिबंध केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याची दिशाभूल वा फसवणूक होणे टळू शकते.




  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सोयाबीन

सोयाबीनवर गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, नियंत्रणासाठी कोणते उपाय करावेत?

पावसाळा सुरू असल्याने या वातावरणात गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. गोगलगायी घास, द्राक्ष, वाल, कारली, भोपळा, काकडी, टोमॅटो, लसूण, मिरची, भुईमूग, भेंडी, फुलकोबी, सोयाबीन इत्यादी पिकांची रोपे कुरतडतात. पावसाळ्यात त्या चारीलगत, बांधालगत असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. अंड्यातून बाहेर आल्यानंतर सुरवातीच्या वाढीच्या काळात गोगलगायींचा खाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे सुरवातीच्या काळात पिकांचे जास्त नुकसान करतात.
एकात्मिक नियंत्रणाचे उपाय -
1) शेतालगतचे बांध स्वच्छ करावे. 2) गोगलगायी दिसताच चिमट्याने अथवा हाताने गोळा करून उकळलेल्या पाण्यात टाकून माराव्यात. 3) संध्याकाळी शेतामध्ये ठराविक अंतरावर गवताचे ढीग ठेवावेत व सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून त्यांचा नाश करावा, तसेच पिकांच्या मुळाशेजारी गोगलगायींनी घातलेली पिवळसर पांढऱ्या रंगाची (100 ते 150च्या पुंजक्‍यात) साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत. 5) दहा लिटर पाण्यात एक किलो गूळ मिसळावा व त्या द्रावणात गोणपाटाची पोती भिजवून संध्याकाळी गोगलगायीग्रस्त शेतात ठराविक अंतरावर पसरावीत. गोगलगायी अशा पसरलेल्या पोत्यांखाली जमा होतात, सकाळ होताच त्यांचा वेचून नाश करावा. 6) सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खड्ड्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकावी. 7) जास्त उपद्रव असल्यास शेताभोवती दोन मीटर पट्ट्यात राख पसरून त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना 2ः3 या प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा किंवा बांधाच्या शेजारी तंबाखू अगर चुन्याच्या भुकटीचा चार इंच पट्टा टाकावा, त्यामुळे गोगलगायींना शेतात येण्यापासून अटकाव करता येईल. पाऊस पडत असल्यास या पद्धतीचा उपयोग होत नाही. 8) मेटाल्डीहाईड कीडनाशकाच्या गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत. प्रादुर्भाव असलेल्या शेतात संध्याकाळच्या वेळी पाच किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शेतात टाकल्यास, त्या खाऊन गोगलगायी मरतात. 9) विषारी आमिष देऊनही गोगलगायी मारता येतात, त्यासाठी गव्हाचा किंवा भाताचा 50 किलो कोंडा दोन किलो गुळाच्या द्रावणामध्ये 10 ते 12 तास भिजवून ठेवावा. त्यामध्ये 25 ग्रॅम यीस्ट मिसळावे. या मिश्रणात मिथोमिल कीटकनाशकाची 50 ग्रॅम भुकटी मिसळून संध्याकाळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रात प्रति हेक्‍टरी पसरून टाकावे. मिथोमिल हे
विषारी कीटकनाशक असल्यामुळे त्याचा वापर करताना प्लॅस्टिकचे हातमोजे घालावेत आणि नाका-तोंडावर कापड बांधावे. हे आमिष जनावरे व पाळीव प्राणी खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 10) सामूहिक प्रयत्न केल्यास प्रभावी नियंत्रण होते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कापूस

कापूस पिकाला ठिबक संचाद्वारे पाणी व खते दिल्याने दोन्हींच्या खर्चात मोठी बचत होते. पिकाला गरजेनुसार पाणी देता येते. तसेच फर्टिगेशन पद्धतीने विद्राव्य खतांचा वापर करता येतो. ठिबक संचाची शेतात उभारणी करण्यापूर्वी त्यास आवश्‍यक त्या घटकांची पूर्तता करून खत व पाणी देण्याचे योग्य नियोजन करावे.

ठिबक संच शेतात उभारण्यापूर्वी पुढील आवश्‍यक घटकांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे.

पूर्वमशागत ः संच उभारणीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत करावी. उभी/ आडवी नांगरट व वखराच्या पाळ्याद्वारे जमीन भुसभुशीत करावी. भुसभुशीत जमिनीत ठिबक सिंचनाचे पाणी योग्य रीतीने पसरते. कापूस लागवडीच्या अंतरानुसार ठिबक सिंचन संचाचा आराखडा व उभारणी करावी. ठिबक सिंचन संचाची निवड करताना तडजोड करू नये. संचामध्ये नळ्यांव्यतिरिक्त फिल्टर व प्रेशर गेज हे महत्त्वाचे घटक जरूर जोडावेत.

फिल्टर अतिशय महत्त्वाचा ः इनलाईन ठिबक नळ्या तयार होत असतानाच त्यांच्या आत ठिबक तोट्या बसविलेल्या असतात, त्यामुळे इनलाईन नळ्या वरून स्वच्छ करता येत नाहीत म्हणून या पद्धतीत फिल्टरची निवड जास्त महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे जाळीचा फिल्टर हा सर्वच संचामध्ये बसविलेला असतो, मात्र पाण्याच्या गुणवत्तेनुसार इतरही फिल्टर बसविणे आवश्‍यक असते. विहिरीचे व बोअरचे पाणी असेल व कचऱ्याचे प्रमाण कमी असेल तर जाळीचा फिल्टर बसवावा. पाण्यामध्ये शेवाळे व तरंगणारे पदार्थ असतील, साचलेले पाणी असेल, तलावातील किंवा उघड्या शेततळ्यातील पाणी वापरायचे असल्यास वाळूचा फिल्टर असणे अत्यंत आवश्‍यक आहे, अन्यथा जाळीचा फिल्टर वारंवार चोक होऊन पाण्याचा पुरेसा प्रवाह संचास मिळत नाही. पाण्यातून वाळूचे, मातीचे, रेतीचे कण येत असल्यास हे कण संचात जाऊन ठिबक तोट्या बंद पडू शकतात. जुन्या बोअरवेल किंवा नवीन खोदलेल्या विहिरीतील पाण्याद्वारे असे कण येत असतात. यासाठी हायड्रोसायक्‍लॉन फिल्टर वापरावा. या फिल्टरद्वारे वाळूचे कण जास्त घनता असल्यामुळे पाण्याच्या वेगाने फिल्टरच्या बाहेर भिंतीकडे फेकले जाऊन तळाशी जमा होतात. नंतर हे कण वेगळे काढता येतात. सिंचनाच्या पाण्यात घनपदार्थ, सेंद्रिय पदार्थ व विरघळलेले क्षार कमी प्रमाणात, परंतु एकत्रितपणे असल्यास डिस्क फिल्टरची निवड करावी. या फिल्टरमध्ये प्लॅस्टिकच्या चकत्या एका नळीवर एकमेकांना चिकटून बसविलेल्या असतात. या चकत्यांवर बारीक खाचा असतात. फिल्टरमध्ये शिरलेले पाणी दोन चकत्यांमधील खाचांतून स्वच्छ होऊन बाहेर पडते. पाण्याच्या गुणवत्तेनुसार गरज पडल्यास दोन वेगवेगळे फिल्टर (उदा. ः जाळीचा व वाळूचा) एकत्रितपणे संचास बसविणे फायद्याचे असते.

प्रेशर गेज आवश्‍यक ः
प्रत्येक शेतकऱ्याने प्रेशर गेज (दाबमापक) घेणे आवश्‍यक आहे. संचामध्ये कमीत कमी दोन प्रेशर गेज असावे. एक प्रेशर गेज मुख्य पाइपलाइनवर फिल्टरच्या पूर्वी व दुसरा फिल्टरच्या नंतर बसवावा. संचाच्या आखणीनुसार संच किती दाबावर चालवायचा, फिल्टर केव्हा स्वच्छ करायचा, व्हेंचुरीद्वारे खत मिश्रित पाणी किती सोडायचे यासाठी प्रेशर गेज असण्याची गरज आहे.

इनलाईन नळ्या, ड्रीपर्सची निवड ः
संच योग्य दाबावर (साधारणत: एक कि. ग्रॅ./ वर्ग सें.मी.) सुरू नसल्यास पाण्याचे वितरण समान होत नाही व संच चालविण्याचा कालावधी ठरविल्यास त्यात चुका होऊ शकतात. ठिबक संचातील इनलाईन नळ्यांची निवड काळजीपूर्वक करावी. या नळ्या १२ मि.मी. व १६ मि.मी. मध्ये उपलब्ध आहेत. १२ मि.मी. व्यासाची इनलाईन नळी स्वस्त असते; परंतु तिची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असते. या नळ्या वापरल्यास सबमेनवरील खर्चात वाढ होते, त्यामुळे शेताच्या आराखड्यानुसार दोन्ही प्रकारच्या (१२/१६ मि.मी.) नळ्यांद्वारे होणाऱ्या खर्चाची तुलना करून व त्याचा समन्वय साधूनच त्यांची निवड करावी. दोन ड्रीपर्समधील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार निवडावे, कापसासाठी मध्यम जमिनीत दोन तोट्यांमधील अंतर ६० सें.मी. असते. तोट्यांतून बाहेर पडणारा प्रवाह साधारणत: २.२ ते ४.० लिटर प्रति तास असतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळे अधिक प्रवाहाच्या तोट्या उपयुक्त ठरतात, यामुळे संच चालविण्याचा कालावधी कमी होतो.

लक्षात घ्या कापसाची पाण्याची गरज ः
बीटी कापसास पावसाच्या खंडाच्या दरम्यान एक किंवा दोन दिवसाआड ठिबकने पाणी द्यावे. पाणी देताना त्या दोन-तीन दिवसांचे एकत्रित बाष्पीभवन जितके असेल त्याच्या ५० टक्के इतक्‍या खोलीचे पाणी द्यावे. प्रत्येक ठिबक तोटीद्वारे किती लिटर पाणी द्यायचे हे काढण्यासाठी त्या तोटीद्वारे किती क्षेत्र भिजवायचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. लागवडीनंतर सुरवातीच्या काळात झाडाच्या जवळचे क्षेत्रच भिजवायचे असल्यामुळे या वेळी पाण्याची गरज कमी असते.

समजा लागवडीतील अंतर ६० १२० सें.मी. इतके असेल तर प्रत्येक झाडाने व्यापलेले क्षेत्र ०.७२ चौ. मीटर इतके होईल. प्रत्येक झाडास एक तोटी दिलेली असल्यास व एकत्रित बाष्पीभवन आठ मि.मी. असल्यास प्रत्येक झाडास साधारण तीन लिटर पाणी दोन दिवसांनी द्यावे लागेल. ठिबकची तोटी चार लिटर प्रति तास प्रवाहाची असल्यास संच ४५ मिनिटे चालवावा लागेल. याप्रमाणे लागवडीचे अंतर व नळ्याची व ठिबक तोट्यांची मांडणी यानुसार संच चालविण्याचा कालावधी काढून संचाचे नियमन करता येईल. कापूस पिकाला हवामानानुसार सहा महिन्यांच्या कालावधीत ८०० ते ९०० मि.मी. पाण्याची गरज असते. कापसाच्या हंगामात या कालावधीत साधारण ४५० ते ५५० मि.मी. उपयुक्त पावसाची नोंद होते. त्यामुळे उरलेले ३०० ते ४०० मि.मी. पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे लागेल. बऱ्याचदा हंगामानंतरही काही बोंडे हिरवी असल्यामुळे पीक राखले जाते. अशावेळी झाडावरील बोंडांची संख्या, त्यापासून मिळणारे उत्पादन, कापूस वेचण्यासाठी मजुरांची उपलब्धता व कापसाचा बाजारभाव इ. बाबींचा विचार करून पीक सांभाळावे. अशावेळी ठिबकद्वारे उर्वरित हंगामासाठीही बोंडे भरण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असल्यास बागायती बीटी कापसाची लागवड मे महिन्यात न करता २० जूनपर्यंत केली तरी फायद्याचे ठरते.

खत व्यवस्थापन :
बीटी कापसाला साधारणपणे १००:५०:५० किलो प्रति हेक्‍टरी नत्र, स्फुरद व पालाशचा वापर करावा. पिकाच्या हंगामाचा कालावधी लांबणार असल्यास (१८० दिवसांपेक्षा जास्त) यामध्ये ३० ते ५० टक्के वाढ करावी. याशिवाय हंगामापूर्वी मातीची तपासणी करून मातीत उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणात वरील मात्रेमध्ये गरजेनुसार बदल करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास आवश्‍यकतेनुसार त्यांचा वापर करावा. साधारणत: ६० ते ७० दिवसांनंतर मॅग्नेशिअम सल्फेट २५ ते ४० किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात वापर करावा. लागवडीपूर्वी उपलब्धतेनुसार शेवटच्या पाळीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी द्यायचे असल्यास तक्ता क्र. १ प्रमाणे खतांचे वेळापत्रक ठरवावे.

ठिबकद्वारे खते देण्याचे तंत्र ः
ठिबक संचाद्वारे खते देणेच जास्त योग्य असते. या प्रक्रियेस फर्टिगेशन म्हणतात. खते देण्यासाठी व्हेंचुरीचा वापर जास्त सोयीचा आहे. खतमिश्रित पाण्यात व्हेंचुरीचे एक टोक सोडून दुसरे टोक मुख्य पाइपला जोडले जाते व मुख्य पाइपवरील व्हॉल्व्हच्या साहाय्याने खतामधील पाणी मुख्य प्रवाहात सोडता येते. पाण्यात विरघळणारी सर्व खते या प्रक्रियेने पिकांना देता येतात. यासाठी संचासोबत व्हेंचुरी व बायपास असेंब्ली व्हॉल्व्हसह घेण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये खर्च येतो.

ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खतांची वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे आहे. विद्राव्य खते उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतांपैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतीचा म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक संचातून द्यावा. ठिबकद्वारे खतांची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. खते एक दिवसाआड देणे शक्‍य नसल्यास, आठवड्यातून / पंधरवड्यातून एकदा द्यावे. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होऊन दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. तक्ता क्र. २ मध्ये विद्राव्य खतांचे कापसासाठीचे वेळापत्रक दिलेले आहे. पिकाची कालावधी १८० दिवसांपेक्षा जास्त असल्यास १३५ दिवसांपर्यंत खते देण्यासाठी खतांच्या मात्रेत २० ते ३० टक्के वाढ करावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll