Welcome You All

RSS

कृषी व तंत्रज्ञान

युगांडा देशातील डेनिस ओचिनो येथील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक जोमो केनयट्टा यांनी केळी पिकात वाढणाऱ्या एका बुरशीवर संशोधन केले आहे. अर्थात, ही बुरशी त्या पिकाला हानिकारक नाही, उलट केळी पिकांची प्रतिकारक्षमता वाढत असून, केळीतील सूत्रकृमींच्या प्रादुर्भावास अटकाव करणे शक्‍य होत असल्याचे आढळले आहे.
इंडोफाईट बुरशी सर्व वनस्पतींमध्ये आढळतातच, त्यांचा त्या पिकाला संसर्गही होतो; मात्र तशी ठळक लक्षणे पिकावर दिसून येत नाहीत. युगांडा व केनियामध्ये याच बुरशींवर अधिक अभ्यास झाला आहे. तेथील कीड व्यवस्थापन पद्धतींवर आर्थिक व पर्यावरणीय परिणाम झाले आहेत. रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर परिणाम दिसले आहेत. अनेक वेळा ही कीडनाशके महाग असल्याने आफ्रिकेतील शेतकऱ्यांना ती परवडतही नाहीत. रासायनिक उपायांचा वापर कमी करताना एखादे पीक एखाद्या किडी वा रोगासाठी प्रतिकारक करणे हा पर्याय आहे; मात्र ही तशी सोपी गोष्ट नाही. मात्र, इंडोफाईट बुरशीचा आधार घेऊन पिकात एखाद्या किडीविरुद्ध प्रतिकारक्षमता विकसित करण्याचा पर्याय शास्त्रज्ञांनी हाताळला आहे. या बुरशीमुळे सूत्रकृमींसारख्या किडींविरुद्ध झाडात प्रतिकारक्षमता विकसित करणे शक्‍य असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्या दिशेने केळी पिकात हे प्रयोग झाले आहेत.
मात्र, हे संशोधन नेदरलॅंड येथील वॅगनिनजन विद्यापीठातील डॉ. थॉमस डुबॉइस व अरनॉल्ड व्हॅन हुस यांनी केलेल्या संशोधनाला छेद देणारे असल्याने यावर आणखी अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या संशोधनामुळे महागड्या कीडनाशकांवरील खर्च बऱ्याच अंशी कमी होणार आहे. युगांडात उतिसंवर्धित केळींवरही मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे. तेथील शेतकऱ्यांनाही या तंत्रज्ञानाचा फायदा होत असल्याचे आढळले आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शेतकऱ्यांच्या 'मसिहा'चा गौरव

बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील समौता गावामध्ये एक आगळावेगळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभामध्ये भात उत्पादकांनी फिलिपिन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार आणि "सब-1'जनुकाचे संशोधक डॉ. डेव्हिड मॅकील यांचा सत्कार केला. या सत्काराचे कारण म्हणजे भाताची "स्वर्ण-सब-1' ही जात या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन येणारी ठरली.
बिहारमधील चंपारण या जिल्ह्यात दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका भात शेतीला बसतो, त्यामुळे भात शेतीचे नुकसान हे ठरलेले; परंतु या भागातील शेतकऱ्यांना भात लागवडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हे शेतकरी पुराच्या पाण्यात तग धरून राहील अशा जातीच्या शोधात होते. गेल्यावर्षी पुसा येथील (बिहार) राजेंद्र कृषी विद्यापीठाने चंपारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना "स्वर्ण-सब-1' ही जात लागवडीसाठी उपलब्ध करून दिली. चंपारण जिल्ह्यात दरवर्षी किमान आठ ते 12 दिवस पुराचे पाणी शेतामध्ये थांबून राहते, त्यामुळे भात रोपे कुजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते; परंतु गेल्यावर्षापासून शेतकऱ्यांनी "स्वर्ण-सब-1' या जातीची लागवड पूरग्रस्त भागात सुरू केली. ही जात पुराच्या पाण्यात तग धरून राहिली, तसेच पूर ओसरल्यानंतर रोपांची चांगली वाढ झाली. शेतकऱ्यांना या जातीपासून प्रति हेक्‍टरी सरासरी पाच ते सहा टन उत्पादन मिळाले. या जातीच्या तांदळाचा दर्जा चांगला आहे, त्याचबरोबरीने भातही लवकर शिजतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे "स्वर्ण-सब-1' ही जात शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या जातीच्या संशोधकाला भेटण्याची शेतकऱ्यांची इच्छा हाती, ती यंदाच्या एप्रिल महिन्यात पूर्णही झाली.
एप्रिल महिन्यात डॉ. मॅकील हे भारतातील संशोधन केंद्रांच्या दौऱ्यावर होते. हे शेतकऱ्यांना कळल्यावर त्यांनी राजेंद्र कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. जे. पी. सिंग यांच्या माध्यमातून भेटीचे आमंत्रणही दिले. शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देत डॉ. मॅकील 8 एप्रिल रोजी समौता गावात दाखलही झाले.
या वेळी चंपारण जिल्ह्यातील सुमारे साठ शेतकऱ्यांनी एकत्र येत खास समारंभात डॉ. मॅकील यांचा "शेतकऱ्यांचा मसिहा' म्हणून गौरव केला. या वेळी शेतकऱ्यांनी "स्वर्ण-सब-1' या जातीच्या लागवडीचे अनुभव, तसेच भात शेतीमधील अडचणी सांगितल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भाताच्या जातींच्या निर्मितीमध्ये तशा पद्धतीने संशोधन सुरू असल्याची ग्वाही डॉ. मॅकील यांनी दिली.

पुरात तग धरणारी "स्वर्ण-सब-1'
आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार डॉ. मॅकील यांनी पुराच्या पाण्यातही तग धरून राहणाऱ्या "स्वर्ण-सब-1' या जातीची निर्मिती केली. ज्या ठिकाणी दरवर्षी पुराचे पाणी आठ ते 10 दिवस साचून राहते, त्या भागात या जातीची लागवड फायदेशीर दिसून आली आहे. जगभरातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या जातीच्या लागवडीमुळे शाश्‍वत उत्पादनाची खात्री मिळणार आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

हवामानबदल वेलदोडा

हवामानबदल व तापमानवाढीमुळे जगभरात विविध समस्या निर्माण होताना दिसत असल्या तरी वेलदोडा पिकासाठी मात्र हा बदल फायदेशीर ठरत असल्याचे शास्त्रज्ञांनी अभ्यास करून तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल नुकताच "हवामान बदल' विषयक दैनिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, वेलदोडा लागवड केलेल्या भागातील तापमानवाढीमुळे पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले. बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि सेंटर प्लॅंटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट, कयमकुलम (केरळ) येथील संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे गेल्या 17 वर्षांपासून यावर अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. त्यातील निष्कर्षानुसार हवामानबदल व तापमानवाढीचा वेलदोडा, कॉफी, चहा आणि काळी मिरी या पिकांवर चांगला परिणाम होत असल्याचे आढळले. रात्रीच्या किमान तापमानात झालेली वाढ आणि दिवसाचे कमाल तापमान वाढल्यामुळे वातावरणात एकप्रकारे ऊब निर्माण होऊन त्याचा फायदा वेलदोड्याच्या उत्पादनवाढीसाठी तसेच काहीसा कॉफीच्या उत्पादनासाठीही होत आहे. याबाबत केरळ येथील वेलदोडा संशोधन केंद्राचे सहायक प्राध्यापक मुथुसामी मुरुगन यांनी सांगितले, की वेलदोड्याच्या उत्पादनात वाढ होण्यास गेल्या शतकापासून सुरवात झाली. 1990 मध्ये प्रति हेक्‍टरी उत्पादन 84 किलो मिळत होते. 1994 मध्ये त्यात वाढ होऊन प्रति हेक्‍टरी 136 किलो उत्पादन मिळू लागले. 2007 मध्ये हे उत्पादन प्रति हेक्‍टरी 300 किलो मिळाले. एनजालानी, पीव्ही-1 या जाती उत्पादनवाढीसाठी फायदेशीर ठरल्या. चहा आणि काळी मिरीच्या उत्पादनवाढीसाठी अनेक वर्षे काम करूनही त्यावर उपाय मिळत नव्हता, मात्र हवामानबदल व तापमानवाढीमुळे ते शक्‍य झाले आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll