गेल्या कित्येक वर्षांपासून विदर्भातला शेतकरी कापसावर अवलंबून आहे. कापसानंतर इथल्या शेतकऱ्यांना आधार आहे तो सोयाबीनचा. पण कोरडवाहू कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता ही हक्काची पिकं तोट्याची पिकं ठरत आहेत. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या शेतीतून उत्पादन खर्चही निघत नाही.
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे तुषार टापरे गेल्या कित्येक वर्षांपासून कापसाची लागवड करतात. कापूस हाच त्यांच्या जगण्याचा आधार. त्यांच्या परिसरातला कापूस लाँग स्टेपलचा असल्याने या कापसाची निर्यातही केली जाते. पण यंदा त्यांची परिस्थिती बिकट आहे. दरवर्षी एकरी सहा क्विंटल कापसाचं उत्पादन ते घ्यायचे, पण यंदा त्यांना एकरी तीन क्विंटलही उत्पादन मिळण्याची आशा नाही. सध्याच्या चार हजार रुपये क्विंटल दरानुसार त्यांना यातून १२ हजार रुपये मिळणार आहे. आता एक एकर कापसाच्या शेतीसाठी त्यांनी केलेला खर्च पाहूया....
पूर्वमशागत - १३०० रु.
बियाणं - १५०० रु.
लागवड - १५०० रु.
खत - ३००० रु.
फवारणी - २००० रु.
वेचणी - २००० रु.
अशाप्रकारे तुषार टापरे यांना एकरी ११ हजार ३०० रुपये खर्च आला आणि सध्याच्या दरानुसार कापसातून त्यांना मिळतायत १२ हजार रुपये. सध्याच्या दरात कापसाची शेती परवडत नाही, त्यामुळे कापसाला किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी त्यांनी मागणी केली आहे.
विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याचं तोट्याचं गणित आपण पाहिलं. विदर्भातलं दुसरं हक्काचं पीक म्हणजे सोयाबीन, यंदा
सोयाबीनचीही परिस्थिती वेगळी नाही. सोयाबीनचा एकरी उत्पादन खर्च साधारण नऊ हजारांच्या आसपास आहे आणि यंदा सोयाबीनची सरासरी एकरी उत्पादकता आहे पाच ते सहा क्विंटल. सध्या सोयाबीनला १८०० ते २,००० रुपये क्विंटल दर मिळतोय. यानुसार सोयाबीनचं एकरी उत्पन्न मिळते ते फक्त १० हजारांच्या आसपास. एकरी खर्च नऊ हजार आणि उत्पादन फक्त १० हजार. त्यामुळे सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित तीन हजार रुपये क्विंटल दर मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत.
तोट्याच्या कोरडवाहू कापसामुळे यंदा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विदर्भात कोरडवाहू शेतकऱ्यांचं प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर ओलीताच्या शेतीत कापसाची चार बोंड जास्त लागतील अशी आशा होती. पण सततच्या लोडशेडिंगमुळे त्या आशाही मावळत आहेत. आधीच कापसाचं उत्पादन कमी त्यात शासकीय खरेदी सुरु न झाल्यामुळे व्यापाऱ्यांची मनमानी खरेदी सुरुच आहे.
विदर्भातली दोन हक्काची पिकं कापूस आणि सोयाबीनमधून यंदा उत्पादन खर्चही भरुन निघण्याची स्थिती नाही, मग पुढच्या हंमागात शेतीत पेरायचं काय आणि जगायचं कसं असा गंभीर प्रश्न या कोरडवाहू शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित कापूस आणि सोयाबीनला दर मिळावा अशी एकमुखी मागणी शेतकरी करत आहेत.