Welcome You All

RSS
Showing posts with label Agri Market. Show all posts
Showing posts with label Agri Market. Show all posts

ख रीप हंगामाच्या पूर्वतयारी

ख रीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये माती परीक्षण, जमिनीची पूर्वमशागत, बियाण्याची तरतूद, सेंद्रिय व रासायनिक खतांची त्याचप्रमाणे जिवाणू खतांची उपलब्धता करून ठेवणे, कीटकनाशकांची तसेच पेरणी अवजारे व हत्यारांची दुरुस्ती या बाबींचा समावेश होतो. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी माती परीक्षण उपयोगी ठरते. माती परीक्षणानुसार पिकास द्यावयाची खताची मात्रा निश्‍चित करता येते. जमिनीच्या पूर्वमशागतीमध्ये शेतात ढेकळे असल्यास ती बोड किंवा मैंदाच्या साह्याने फोडून घ्यावीत, जमिनीस उंच-सखलपणा असल्यास तिफणीने सपाट करावी. आडव्या-उभ्या कुळवाच्या पाळ्या द्याव्यात, शेवटच्या कुळवणीअगोदर शिफारशीप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. जमिनीची बांधबंदिस्ती करून पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे.

पीक उत्पादनवाढीसाठी संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांचा महत्त्वाचा वाटा असल्याने पेरणीसाठी बियाण्याची निवड करताना जास्त उत्पादन देणाऱ्या, खतास चांगला प्रतिसाद देणाऱ्या, कमी कालावधीत व कमी पाण्यात येणाऱ्या तसेच रोग व किडीस प्रतिकारक्षम असणारे वाण निवडावेत. शक्‍यतो प्रमाणित बियाणे पेरणीसाठी वापरावे. बियाणे खरेदी करताना त्याची उत्पादन तारीख, शुद्धता, वाणाचे/ जातीचे नाव, उगवणक्षमता इत्यादी सर्व गोष्टी पाहूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून त्याची पक्की पावती घ्यावी. विकत घेतलेल्या बियाण्याच्या पिशवीस असलेले लेबल व टॅग जपून ठेवावा, यदाकदाचित बियाण्यात काही दोष आढळल्यास बिल, लेबल व टॅगची संबंधितांकडे तक्रार करताना गरज पडते.

पीक पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेसाठी पिकानुसार शिफारस केलेल्या जिवाणू खतांची खरेदी करून ठेवावी. ज्वारी, बाजरी, भात, मका या एकदल व तृणधान्ये पिकासाठी ऍझोटोबॅक्‍टर, शेंगवर्गीय द्विदल पिकासाठी रायझोबियम हे जिवाणू संवर्धक वापरावे. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारचे रायझोबियम वापरावे. स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा आवश्‍यकतेनुसार बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.

पूर्वहंगामी कापूस लागवड ठिबक सिंचनावर केल्याने सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पिकाची वाढ जोमदार होते, लवकर फुले येतात. पर्यायाने हा कापूस हंगामी कापसाच्या तुलनेत वेचणीसाठी 20 ते 25 दिवस लवकर तयार होतो आणि उत्पादनात भरीव वाढ होते.

पूर्वहंगामी कापूस पिकासाठी उष्ण, कोरडे व कमी आर्द्रतायुक्त हवामान मानवते. या काळात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्वहंगामी कापूस पीक 25 ते 30 दिवसांचे होऊन त्यास पाते लागण्यास सुरवात होते. ठिबक सिंचनावर आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड योग्य वेळी करता येते व या पिकास पाण्याचा कोणताही ताण बसत नाही. सर्वसाधारणपणे पाच अश्‍वशक्तीचा पंप ताशी 18 ते 21 हजार लिटर पाणी देतो. एवढ्या पाण्यावर कमीत कमी दोन ते अडीच एकर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ठिबक पद्धतीने करणे शक्‍य आहे.

जमिनीची निवड ः
मध्यम ते भारी, काळी, कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. हलक्‍या, उथळ आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे.

पूर्वमशागत ः
एक खोल नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकाची धसकटे, पाला व काडीकचरा गोळा करून तो जाळावा व शेत स्वच्छ करावे. शेवटाच्या कुळवाच्या पाळीअगोदर 15 ते 20 गाड्या कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
ठिबक सिंचन संच उभारणी ः
पूर्वमशागत झाल्यावर शेताची पाहणी करून आराखडा तयार करावा. आराखड्याप्रमाणे ठिबक संचाची उभारणी करावी. पाण्याचा स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. कापूस पिकासाठी ड्रीपरचा प्रवाह चार लिटर प्रति तास असलेल्या 12 किंवा 16 मि.मी. इनलाईन नळीची निवड करावी. इनलाईन नळीच्या दोन ड्रीपरमधील अंतर 60 सें.मी. किंवा 90 सें.मी. असावे. ठिबक सिंचन पद्धतीत जोडओळ पद्धत किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, त्यामुळे प्रति हेक्‍टरी झाडांची संख्या कायम राहून खर्चात बचत होते, तसेच पीक फवारणी, आंतरमशागत व कापूस वेचणी ही कामे सोईस्कर राबविता येतात.
लागवड व्यवस्थापन ः
ठिबक सिंचन आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातींची निवड करावी. बी.टी. कापसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या व जास्त फळफांद्या असणाऱ्या जातीची निवड करावी. लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, जाती इ. बाबींचा विचार करावा. लागवडीसाठी बियाणे लावण्यापूर्वी (पेरणीपूर्वी) 12 ते 14 तास ठिबक संच चालवून शेतात वाफसा होईपर्यंत ओलावा निर्माण करावा. नंतर शिफारस केलेल्या अंतरावर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 60 ते 120 ु 90 सें.मी. किंवा 90 ते 180 ु 105 ते 120 सें.मी. अशा अनेक जोडओळ किंवा पट्टा पद्धतीने ठिबक संचालगत लागवड करावी. लागवड करताना इनलाईन नळीचे ड्रीपर व बियाणे लागवडीची जागा जवळ येतील याची काळजी घ्यावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सल्ला


सं प्रश्‍ तज्ज्ञांनी दिलेला सल्ला


काजू बोंडापासून बनणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांविषयी माहिती द्यावी. काजू बी आणि काजू बोंडे ही काजू पिकामध्ये दोन महत्त्वाची उत्पादने आहेत आणि काजू बीच्या सहा ते सात पट बोंडांचे उत्पादन मिळते. काजू बोंडाच्या रसामध्ये औषधी गुणधर्म असतात. जसे कातडीचे रोग (स्कर्वी), हगवण, स्त्रियांच्या गर्भाशयाच्या तक्रारी यांवर काजू बोंडाचा रस गुणकारी आहे. कॉलरा रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून तो वापरतात. काजू बोंडांच्या रसाचे नियमित सेवन केल्यास डोळे नेहमी पाणीदार राहतात. बाळंतपणात स्त्रियांनी काजू बोंडांचा रस घेणे फायदेशीर आहे. हे औषधी व पौष्टिक फळ (बोंड) असल्याने त्यावर प्रक्रिया करून, टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. काजू बोंडांपासून बनविण्यात येणारे टिकाऊ पदार्थ – 1) काजू बोंडांचे ताजे पेय (आरटीएस). 2) काजू बोंडांचे सरबत. 3) काजू बोंडांचा जॅम. 4) काजू बोंडांची कॅण्डी. 5) काजू बोंडांचे लोणचे. 6) काजू बोंडांची पावडर. 7) काजू बोंडांची टॉफी.
हे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्याविषयी अधिक माहिती प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग (संपर्क ः 02366 – 262234, 262693) येथे किंवा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे (02358) 280233, 280238 येथे संपर्क साधावा.


माती परीक्षण का करावे? कसे करावे? त्यामुळे काय फायदे होतात? जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन पिकांना त्यांच्या आवश्‍यकतेनुसार अतिरिक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा करता यावा यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यावरून पिकांना खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे सोपे होते; तसेच कोणत्याही फळझाडांची लागवड करण्यापूर्वी जमिनीची योग्यता तपासून पाहणे शक्‍य होते. त्यावरून ती जमीन फळपिकासाठी योग्य वा अयोग्य याचा अंदाज घेता येतो. परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्यास टिकाव, कुदळ, सब्बल, फावडे, खुरपी किंवा स्क्रू-अगर (गिरमिट), घमेला, गोणपाट, पिशव्या आदी साहित्य लागते. पाण्याच्या पाटाजवळील जागा, विहिरीजवळील जागा, गुरे-ढोरे बसण्याची जागा, जुने बांध, कुंपणाजवळील जागा, नुकतीच खणलेली जागा, खतांच्या ढिगाऱ्याजवळील अथवा खड्ड्याजवळील जागेतून मातीचा नमुना घेऊ नये. भात, भुईमूग, ज्वारी, गहू इत्यादी पिकांसाठी 15 ते 20 सें.मी.; तसेच कपाशी, ऊस, केळीसाठी 30 सें.मी., तर फळझाडांसाठी बुंध्यापासून एक ते 1.5 फूट जागा सोडून बाहेरच्या परिघामधून 30 सें.मी. खोलीपर्यंतचा नमुना घ्यावा. नमुना उन्हाळ्यात 15 एप्रिल ते 15 मेपर्यंत घ्यावा. यामुळे माती परीक्षण अहवाल व त्याद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन पीक लागवडीपूर्वी मिळेल.
मातीचा नमुना घेताना संपूर्ण शेतीच्या मातीचा रंग, खोली, उतार याप्रमाणे भाग पाडावेत. हे भाग प्रत्येकी एक ते 1.5 हेक्‍टर क्षेत्राचे असावेत. प्रत्येक भागातील एक ते 1.5 हेक्‍टर क्षेत्रातून प्रत्येक क्षेत्रासाठी आठ ते दहा ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावर, वेगवेगळ्या दिशेने, म्हणजे थोडे सरळ, थोडे आडवे, थोडे तिरकस अशाप्रकारे स्थान निश्‍चित करावे व तेथे लाकडी खुंट्या ठोकाव्यात. नमुना घेताना त्या जागेवरील पालापाचोळा व काडीकचरा स्वच्छ करावा. नमुना घेताना त्या जागेवर 15 ते 20 सें.मी. खोलीचा व 15 ते 20 सें.मी. जमिनीवरील लांबीचा “व्ही’ इंग्रजी अक्षरासारखा खड्डा खोदावा. या खड्ड्यातून दोन्ही बाजूंनी 2.5 सें.मी. जाडीचा मातीचा थर पृष्ठभागापासून तळापर्यंत तिरकस दिशेने काढावा. साधारणपणे 2.5 सें.मी. जाडीची जमिनीच्या पृष्ठभागापासून ते खालील तळापर्यंतची माती नमुन्यासाठी दोन्ही बाजूंनी काढावी व गोणपाटावर जमा करावी. जमिनीच्या फरकानुसार प्रत्येक विभागातील आठ ते दहा नमुने घ्यावेत.
घेतलेले नमुने गोणपाटावर उत्तम प्रकारे एकत्रित करावेत. त्यातील लहान-मोठे दगड, पिकांची मुळे व त्यांचे अवशेष वेगळे करावेत. त्यानंतर त्या एकत्रित आठ ते दहा नमुन्यांच्या मातीचे चार समान भाग करावेत. गोणपाटाच्या चार ठिकाणी चारही नमुने समान भागात ठेवावेत. विरुद्ध बाजूचे समोरासमोरील कोणतेही दोन भाग एकत्रित करावेत. या एकत्रित भागामधून 500 ग्रॅम आदर्श नमुना कापडी पिशवीत ठेवावा व इतर राहिलेले विरुद्ध बाजूचे दोन भाग फेकून द्यावेत. शिल्लक राहिलेली माती कापडी पिशवीमध्ये भरावी.
पिशवीच्या लेबलवर नमुना क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, शेतकऱ्याचे पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, सर्व्हे नंबर, जमिनीचा उतार, पाण्याचा निचरा, पूर्वी घेतलेले पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीची खोली (सें.मी.), ओलित / कोरडवाहू, नमुना घेतलेल्या जमिनीचे प्रातिनिधिक क्षेत्र ही माहिती नोंदवावी. हा नमुना संपूर्ण माहितीसह कृषी विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवावा.

माती परीक्षणाचे फायदे -
पीक पेरणीपूर्वी जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी पूर्ण माहिती होते. त्यानुसार पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते.
अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रा देऊन अनावश्‍यक खर्च टाळता येतो.
जमिनीचा सामू नियंत्रित (6.5 ते 7.5) ठेवून पिकांची अन्नद्रव्यांची शोषणक्षमता वाढवता येते.
उत्तम प्रकारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येत असल्याने पीक संवर्धनावरील खर्च वाचतो. जमिनीचे गुणधर्म टिकवून ठेवण्यास मदत होते.

मिश्र खत कसे तयार करतात? पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या दोन किंवा अधिक अन्नद्रव्ययुक्त खतांच्या मिश्रणाला मिश्रखत म्हणतात. दोन अन्नद्रव्ये असणाऱ्या संयुक्त खतांचे मिश्रण करूनही मिश्रखत तयार करता येते. शेतावरच मिश्रखत तयार करण्याची पद्धत - कोणत्याही विशिष्ट उपकरणांचा वापर न करता सरळ खतांचे मिश्रण करून मिश्रखते शेतावर तयार करता येतात. ही पद्धत आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. अशा तऱ्हेचे मिश्रण सिमेंट कॉंक्रिटचा पृष्ठभाग असणाऱ्या ओट्यावर तयार करता येते. यासाठी फावडे, चाळणी, लाकडी हातोडा, तराजू इत्यादी साहित्य पुरेसे होते. मिश्रखत पेरणीपूर्वी एक दिवस अगोदर तयार करावे. जेणेकरून त्यामध्ये खडे तयार होणार नाहीत. ठराविक मिश्रखत तयार करण्यासाठी आवश्‍यक असणारी सरळ खतांची मात्रा काढणे सुलभ आहे. उदा. ः एक टन 4-8-15 या ग्रेडचे मिश्रखत करायचे झाल्यास अमोनिअम सल्फेट, सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा पुढीलप्रमाणे काढता येते ः 100 किलो 4-8-15 ग्रेडचे मिश्रखत करण्यासाठी, म्हणजेच मिश्रखतामध्ये चार टक्के नत्र, आठ टक्के फॉस्फेट आणि 15 टक्के पोटॅश असण्यासाठी सरळ खतांची मात्रा पुढीलप्रमाणे काढावी. त्यानंतर एक टन मिश्रखत तयार करण्यासाठी आलेल्या सरळ खतांच्या मात्रेस दहाने गुणावे. अशा तऱ्हेने एक टन 4-8-15 ग्रेडचे मिश्रखत तयार करण्यासाठी 200 किलो अमोनिअम सल्फेट, 500 किलो सुपर फॉस्फेट आणि 250 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 50 किलो फिलरची गरज असते.
नत्र = 4 द 100 क्क 20 = 20 किलो अमोनिअम सल्फेट
स्फुरद = 8 द 100 क्क 16 = 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट
पालाश = 15 द 100 क्क 60 = 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश
100 किलो मिश्रखत = 95 किलो सरळ खत + पाच किलो फिलर
तयार करताना घ्यावयाची काळजी -
1) अमोनिया असणारी सरळ खते. उदा. – अमोनिअम सल्फेट, अमोनिअम नायट्रेट इत्यादी खते, बेसिक स्लॅग, फॉस्फेट रॉक या खतांसोबत मिसळल्याने नत्राचा वायूरूपात ऱ्हास होत असल्यामुळे ती मिसळू नयेत. 2) पाण्यात विद्राव्य स्फुरदयुक्त खते उदा. ः सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, अमोनिअम फॉस्फेट ही खते मुक्त चुना असणाऱ्या खतात मिसळल्याने विद्राव्य फॉस्फेट अविद्राव्य स्वरूपात बदलण्याची शक्‍यता असते आणि हा अविद्राव्य फॉस्फेट पिकांना उपलब्ध होत नाही. 3) सहज विद्राव्य होणारी आणि हवेतील बाष्प शोषून घेणारी खते. उदा. ः कॅल्शिअम, अमोनिअम नायट्रेट, युरिया इत्यादी खते मिसळल्यानंतर त्यात ढेकळे किंवा खडे तयार होतात; त्यामुळे अशा खतांचे पेरणीच्या थोडा वेळ अगोदर मिश्रण तयार करावे. सर्व प्रकारची नायट्रेट धारण करणारी खते, युरिया, पोटॅशिअम सल्फेट किंवा क्‍लोराइड्‌स खतांत मिसळल्यानंतर ती त्यांच्या जलाकर्षक गुणधर्मामुळे हवेतील पाणी शोषून घेतात व कठीण होतात, म्हणून अशा प्रकारची खते जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नयेत व ती केल्यास लगेचच पिकांना द्यावीत. द्रवरूप मिश्रखतांचा वापर फळबागा, भाजीपाला पिकांमध्ये करता येतो.


शेततळ्यासाठी अस्तरीकरण करायचे असल्यास कसे करावे? शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे असते. त्यासाठी बेन्टोनाईट, माती-सिमेंट मिश्रण, दगड-विटा-सिमेंट मिश्रण, चिकण माती किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. प्लॅस्टिक फिल्मची जाडी 300 ते 500 जी.एस.एम. असावी. सिमेंट व माती प्रमाण 1ः8 व जाडी पाच सें.मी. ठेवावी. शेततळे हे काळ्या खोल जमिनीत बांधले असेल, तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते, त्यामुळे शेततळ्यातील पाणी कमी होते; गाळाचे प्रमाण वाढते. यामुळे काही कालांतराने शेततळ्याची पाणी साठवणक्षमता कमी होते. असे होऊ नये म्हणून शेततळे घेण्यापूर्वी मृद्‌ व जलसंधारणाचे उपाय करावेत.


कांदा पिकाचे थंडी धुक्‍यापासून संरक्षण कसे करावे? कांदा लागवडीपासून दीड ते दोन महिन्यांत रात्रीचे तापमान दहा अंश से.च्या खाली गेले आणि सतत हेच तापमान 10 ते 12 दिवस राहिले तर कमी तापमानास संवेदनशील जातींमध्ये डोंगळे दिसतात. म्हणून हंगामानुसार योग्य जातींची लागवड करणे आवश्‍यक असते. धुके किंवा थंडीपासून कांदा पिकाला वाचविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कांद्याला तुषार सिंचनाचा वापर केला आहे त्यांनी ज्या दिवशी धुके, थंडी व दव जास्त असेल तेव्हा तुषार सिंचन संच सकाळच्या वेळी पाच ते दहा मिनिटे चालवावा. त्यामुळे कांदा पातीवर जमा असलेले दव पाण्याने धुतले जाईल. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण कमी होईल.
तुषार सिंचन नसेल त्या ठिकाणी स्प्रे पंपाने पाण्याची फवारणी करावी. धुके किंवा दव अशा अवस्थेमध्ये कांद्यावरील रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारशीत बुरशीनाशकाची स्टिकर मिसळून फवारणी करावी. सपाट वाफ्यात किंवा सरी वरंबा अथवा ठिबक वर कांदे लावले असतील तर हलके पाणी द्यावे. संध्याकाळी शेतात आठ ते दहा ठिकाणी ओला कचरा किंवा गवत जाळले तर शेतात रात्री धुराचे आवरण तयार होते. या आवरणामुळे शेतात उष्णता राहते. त्यामुळे थंडी, धुके व दव कांद्याच्या पातीवर जमत नसल्याने पिकाचे नुकसान होत नाही.


परसातील कोंबडीपालनासाठी कडकनाथ जातीच्या कोंबडीविषयी माहिती हवी, त्या कोठे मिळतील? कडकनाथ जातीच्या कोंबड्या मध्य प्रदेशातील झाबुआ व धार जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आढळतात. या कोंबडीचे मांस हे काळेशार असते. मांसातील प्रथिनांचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असून, रोगप्रतिकारशक्ती दणकट असते. या जातीच्या कोंबड्यांतील गुणसूत्रांमुळे त्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा तग धरून राहतात. गावकुसाबाहेर चरून कमी खर्चात हा पक्षी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो. सफल अंडी उत्पादन 55 टक्के असून, अंडी उबवणूक क्षमता 52 टक्के एवढी असते.


शेडनेट तयार करायचे आहे, कसे करावे? शेडनेटची उभारणी प्रामुख्याने उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी केली जाते, त्यामुळे शेडनेट उभारताना पुढील महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. शेडनेटमुळे हवा, आर्द्रता या घटकांवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होते, म्हणून त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. शेडनेट सांगाड्याशी ताणून बसवायला हवी. शेडनेटचा धागा तुटू नये याची काळजी घ्यायला हवी. सांगाड्याला थोडा उतार असणे आवश्‍यक आहे, त्यामुळे पावसाचे पाणी सरळ खाली न येता शेडनेटच्या धाग्यांवरून ओघळत खाली येते व पाण्याचा वेग कमी करता येईल. शेडनेटचे फाउंडेशन व सांगाडा उभारणी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाइपाचा सांगाडा भक्कम असतो. सांगाड्याची उंची ठरवताना कमीत कमी तीन मीटर व जास्तीत जास्त ती 4.5 मीटर ठेवावी. शेडनेट बसवताना त्या घटकाची टक्केवारी ठरवणे महत्त्वाचे असते. 35 टक्के, 50 टक्के, 75 टक्के व 90 टक्के असे त्यात प्रकार आहेत. शेडनेटची बांधणी करताना
सांगाडा वजनाने हलका असावा. तो साधा व उपलब्ध साहित्याचा असावा. सांगाड्याचा पृष्ठभाग चोहोबाजूंनी सारखा असावा.
सांगाडा असा असावा, की पॉलिथिन फिल्म सहजपणे बदलता यावी.
आतील झाडांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळावा, एकमेकांवर सावली येणार नाही, असे नियोजन करावे. शक्‍यतोवर दक्षिणोत्तर बांधणी अधिक फायदेशीर राहते.

लिंबाच्या झाडांना खत व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शनासाठी कोठे संपर्क साधावा? लिंबाच्या झाडांना त्यांच्या वयोमानानुसार योग्य प्रमाणात खतांच्या मात्रा दिलया, तर चांगले उत्पादन मिळते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शिफारशीनुसार चार वर्षे वयाच्या लिंबाच्या प्रत्येक झाडाला जून महिन्यात 15 किलो शेणखत, दोन किलो सुफला, 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश, 15 किलो निंबोळी पेंड देणे गरजेचे आहे; तसेच सप्टेंबर महिन्यात 150 ग्रॅम आणि जानेवारीत 150 ग्रॅम नत्र द्यावे. या खतांव्यतिरिक्त 500 ग्रॅम व्हॅम अधिक 100 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू अधिक 100 ग्रॅम ऍझोस्पिरीलम अधिक 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम द्यावे. सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास 0.5 टक्के झिंक सल्फेट, 0.5 टक्के मॅग्नेशिअम सल्फेट, 0.5 टक्के मॅंगनीज सल्फेट, 0.25 टक्के फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे आवश्‍यक आहे.

उन्हाळी तीळ लागवड केव्हा करावी, खते किती प्रमाणात द्यावीत? उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने “एकेटी-101′ ही तिळाची जात प्रसारित केली आहे. या वाणाचे गुणधर्म म्हणजे हा वाण उन्हाळी हंगामात 90-95 दिवसांत पक्व होतो. उन्हाळी हंगामाकरिता तीन ते चार किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कार्बेन्डाझिम यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति किलो तीन ग्रॅम, तसेच ट्र ायकोडर्मा व्हिरीडी प्रति किलो चार ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. उन्हाळी तिळाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आटोपावी. तिळाचे बियाणे फार बारीक असल्यामुळे समप्रमाणात वाळू / गाळलेले शेणखत / राख / माती मिसळावी. तिफणीने 30 सें.मी.वर पेरणी करावी. तीळ हे आपत्कालीन पीक, आंतरपीक आणि मिश्र पीक म्हणून घेता येते. आंतरपीक पद्धतीने तीळ + मूग (3ः3) फायदेशीर आढळून आलेले आहे. पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. 15-20 दिवसांनी प हिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. आवश्‍यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या / खुरपण्या कराव्यात.


जाने.-फेब्रुवारी महिन्यात कांदा लागवड करता येईल का? रब्बी हंगामासाठी ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये रोपे टाकून योग्य वाढ झालेल्या रोपांची लागवड डिसेंबर – जानेवारीमध्ये करण्याची शिफारस आहे; मात्र बारमाही पाण्याची सोय असल्यास फेब्रुवारीमध्ये रोपे टाकून एप्रिलमध्ये पुनर्लागवड करावी. जून ते जुलैमध्ये कांद्याची काढणी करता येते. पुनर्लागवडी वेळी शेताची मशागत करताना नांगरणी व कुळवणी करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेत तयार करताना चांगले कुजलेले शेणखत हेक्‍टरी 20 टन याप्रमाणे शेतात मिसळावे. सपाट वाफे तयार करावेत. मातीची तपासणी करून शिफारशीनुसार रासाय निक खते पुनर्लागवडीच्या अगोदर वाफ्यांमध्ये मिसळावीत. त्यात हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश ही खते लागवडीपूर्वी द्यावीत.


रेतनानंतर किती दिवसांनी म्हशींची तपासणी करावी? उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन कसे करावे? रे तनानंतर 45 ते 60 दिवसांनंतर म्हशीची पशुवैद्यकाकडून तपासणी करणे योग्य, म्हणजे ती गाभण आहे की नाही हे कळेल. उन्हाळ्यात म्हशींना उन्हाच्या झळ्यांचा त्रास होऊ नये म्हणून थंड जागी ठेवावे, त्यांच्या अंगावर दिवसातून तीन-चार वेळा गार पाणी टाकत राहावे. त्यांच्या पाठीवर ओले कापड किंवा पोते ठेवणेही उपयुक्त ठरते. स्वच्छ व थंड पाणी कमीत कमी चार ते पाच वेळेस पाजावे. उन्हाच्या वेळेस म्हणजे सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत म्हशी चरावयास सोडू नयेत. उन्हात चरायला गेल्याने सूर्यकिरण शोषले जातात व पाठीवर चट्टे उठतात. म्हशींना नियमित हिरवा चारा, खनिजे, क्षार, कॅल्शिअम, फॉस्फरस पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावे. उन्हाळ्यात चार ते पाच महिन्यांत जनावरांच्या शरीराची झीज किंवा वजनातील घट फारच झपाट्याने होते, ज्या म्हशींची झीज उन्हाळ्यात कमी होईल, त्यांचे वजन पुढे पावसाळ्यात हिरवा चारा वगैरे खाल्ल्यामुळे लवकर भरून निघेल व त्यांची प्रजनन क्रिया पुन्हा लवकर सुरू होईल.


हिरवळीच्या खतांसाठी कोणती पिके घ्यावीत? त्यांची निवड कशी करावी? त्याचे काय फायदे होतात? हिरवळीच्या पिकांमध्ये ताग, धैंचा, उडीद, मूग, चवळी, गवार इ. द्विदल पिकांचा तसेच गिरिपुष्प, सुबाभूळ, करंज यांचा समावेश होतो. ही पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या वेळी नांगरून जमिनीत गाडली जातात. या पिकांच्या कोवळ्या फांद्या व हिरवी पाने जमिनीत गाडल्यामुळे जमिनीस सेंद्रिय पदार्थ पुरविले जातात. जमिनीची जलधारणशक्ती वाढते आणि पर्यायाने पीकपोषक अन्नद्रव्यांची उपलब्धताही वाढते. हिरवळीच्या खतासाठी पिकांची निवड करताना पुढील वैशिष्ट्ये असावीत. 1) हे पीक शेंगवर्गीय असावे तसेच त्यात जलद गतीने हलक्‍या किंवा मध्यम जमिनीत वाढण्याची क्षमता असावी. 2) या पिकास पाण्याची आवश्‍यकता कमी असावी. 3) पिकाची मुळे खोलवर जाणारी असावीत. जेणेकरून जमिनीच्या खालच्या थरातील पोषण-द्रव्ये वापरली जातात. 4) ही पिके पालेदार असावीत तसेच लवकर वाढणारी असावीत. 5) या वनस्पतीत तंतुमय पदार्थांचे प्र माण कमी असावे आणि त्यांचे विघटन लवकर व्हावे. या वनस्पतीमध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असावे.
हिरवळीच्या खतांचे यश हिरवळीचे पीक जमिनीत गाडण्याची वेळ व ते कुजण्यासाठी दिलेला पुरेसा वेळ यावर अवलंबून आहे. पीक जमिनीत गाडण्याची योग्य अवस्था म्हणजे फुलोऱ्याची अवस्था होय. हिरवळीचे पीक जमिनीत गाडण्यास उशीर झाला तर पिकातील कर्बाचे प्रमाण वाढते व नत्राचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे लवकर विघटन होत नाही. हिरवळीची पिके सर्वसाधारणपणे सहा -आठ आठवड्यांत फुलोरा अवस्थेत येतात.


टोमॅटो व वांगी लागवड करायची आहे. योग्य जाती कोणत्या? लागवडीविषयी मार्गदर्शन करावे. ज्या जमिनीत टोमॅटो लागवड करायची आहे, त्या ठिकाणी अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय म्हणजे वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत, कारण त्यामुळे कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. टोमॅटोची रोपे तयार करताना रोपे जोमदार, निरोगी तयार होण्यासाठी तीन मीटर लांब, एक मीटर रुंद व 15 सें.मी. उंच या आकाराचे गादीवाफे बांधावेत. प्रत्येक वाफ्यावर एक घमेले चांगले कुजलेले शेणखत बारीक करून मिसळावे. बी पेरण्याअगोदर गादीवाफ्यावर रुंदीशी समांतर अशा तीन ते चार बोटे अंतरावर एक सें.मी. खोल रेघा पाडाव्यात. या पाडलेल्या ओळींमध्ये बी हातावर घेऊन चिमटीतून पातळ पेरावे. एका ठिकाणी जास्त बी पडल्यास ते कमी पडलेल्या जागी टाकावे. बियाणे प्रक्रिया केलेले असेल तर उत्तमच, अना बी पेरण्याअगोदर थायरमची बीजप्रक्रिया करावी. ओळीमध्ये बी पेरल्यानंतर हलक्‍या हाताने बी मातीने झाकून घ्यावे. वाफ्यांना बी उगवून येईपर्यंत शक्‍यतो झारीने पाणी द्यावे. रोपांचे वाफे नेहमी तणमुक्त ठेवावेत. रोपे पुनर्लागण करण्याच्या एक आठवडा अगोदर रोपांना पाणी हळूहळू कमी करावे. बियाण्याचे प्र माण ठरविताना संकरित जातींसाठी 150 ग्रॅम प्रति हेक्‍टरी तर सुधा रित जातींसाठी 400 ग्रॅम प्रति हेक्‍टरी घ्यावे. लागवडीचे अंतर 90 ु 30 सें.मी. ठेवावे. खत व्यवस्थापन करताना माती परीक्षणानुसार, सरळ वाणांसाठी 200ः100ः100 किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्‍टरी, तर संकरित वाणांसाठी 300ः150ः 150 प्रति हेक्‍टरी वापरावे. टोमॅटोच्या जाती ः धनश्री, भाग्यश्री, राजश्री, फुले राजा (संकरित). वांगी -
या फळभाजीची लागवड वर्षभरात तीनही हंगामांत करतात. दर हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम बी पुरेसे होते. रोपे तयार करण्यासाठी एक मीटर रुंदी व सोयीनुसार लांबीचा गादीवाफा तयार करून आठ ते दहा सें.मी. अंतरावर रेषा ओढून बी पेरावे. हलक्‍या हाताने माती टाकून बी झाकून द्यावे. बी पेरल्यापासून पाच ते सहा आठवड्यांत 12 ते 15 सें.मी. उंचीची रोपे लागवडीस तयार होतात. बी पेरल्यानंतर वाफ्यांना सुरवातीला झारीने व त्यानंतर वाफ्याभोवती असलेल्या सरीमधून गरजेनुसार पाणी द्यावे. बी पेरताना दहा टक्के फोरेट प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात टाकावे. रोपांची पुनर्लागवड करताना जमिनीची चांगली नांगरट करून वखरणी करून जमिनीत दर हेक्‍टरी 40 ते 50 बैलगाड्या शेणखत मिसळून द्यावे. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सरी- वरंबे पाडावेत. कसदार जमिनीत 100 सें.मी. ु 100 सें.मी., मध्यम प्रकारच्या ज मिनीत 75 सें.मी. ु 75 सें.मी. व हलक्‍या जमिनीत 50 सें.मी. ु 50 सें.मी. अंतरावर सरी वरंबे तयार करून वरंब्याच्या एका ठिकाणी एकच रोप लावावे. लागवडीनंतर दहा दिवसांनी दाणेदार फ ोरेट हेक्‍टरी दहा किलो या प्रमाणात प्रत्येक झाडास बांगडी पद्धतीने द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार खताचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. मध्यम काळ्या जमिनीत दर हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाशची शिफारस करण्यात आली आहे. जाती ः 1) मांजरी गोटा 2) वैशाली 3) रुचिरा 4) प्रगती.


कलिंगड लागवड कधी करावी? योग्य जाती कोणत्या? कीड-रोग व काढणीविषयी मार्गदर्शन करावे. क लिंगडाची लागवड 17 अंश ते 18 अंश से. तापमानात थंडी कमी झाल्यावर करावी. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीसाठी तोडेपर्यंत किमान 40 ते 45 दिवस तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्‍यक आहे. पिकाचा कालावधी जातीपरत्वे 90 ते 110 दिवसांचा असतो.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर व स्फुरद जिवाणू खताची 250 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. लागवडीसाठी चार मीटर अंतरावर रुंद सऱ्या कराव्यात. सरीच्या दोन्ही बाजूंस 90 सें.मी. अंतरावर खड्डे करून त्यात दोन किलो चांगले कुजलेले शेणखत आणि दहा ग्रॅम कार्बारिल पावडर टाकून खड्डे भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात दोन ते तीन बिया एकमेकांपासून तीन ते चार सें.मी. अंतरावर दोन ते अडीच सें.मी. खोलीवर पेराव्यात. एक हेक्‍टर लागवडीसाठी साधारण अडीच किलो बियाणे लागते. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 15 ते 20 टन शेणखत, 15 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. खते देताना संपूर्ण शेणखत, स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा व नत्राची 1/3 मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. उरलेले नत्र दोन समान हप्त्यांत लागवडीनंतर एक आणि दोन महिन्यांनी द्यावे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे फळे तडकतात. तेव्हा पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे. फळे काढणीस तयार झाली किंवा नाही हे ओळखण्यासाठी फळावर टिचकी मारल्यास तयार झालेल्या फळाचा बदबद असा आवाज येतो व अपक्व फळांचा टणटण असा आवाज येतो. तयार फळांचा जमिनीलगतचा रंग किंचित पिवळसर होतो. फळाच्या देठाजवळील लतातंतू सुकलेले असतात. काढणी सकाळी करावी. त्यामुळे फळांचा ताजेपणा व आकर्षकता टिकून राहते व ती चवीला चांगली रुचकर लागतात.
कलिंगड पिकावर भुरी, करपा व मर रोगांचा आणि तांबडे व काळे भुंगेरे, फळमाशी, मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची अथवा ट्रायकोडर्मा जैविक रोगनियंत्रकाची पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. किडींच्या नियंत्रणासाठी बिगर हंगामात शेतीची चांगली नांगरट व कुळवणी करावी. म्हणजे तांबडे भुंगेरे, फळमाशी इ. किडींच्या सुप्त अवस्था नष्ट होऊन त्याच्या बंदोबस्तासाठी मदत होईल.


ढोबळी मिरची लागवड कशी करावी, बियाणे किती वापरावे? शेडनेटमध्ये ढोबळी मिरची लागवड फायदेशीर ठरते. लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. मातीचा सामू 5.5 ते 6.5 असावा. काळ्या मातीची निवड करू नये. लाल माती (70 टक्के), शेणखत (20 टक्के) आणि भाताचे तूस (दहा टक्के) किंवा वाळू (दहा टक्के) या प्रमाणात मिश्रण मिसळून लागवडीसाठी तयार करावे. दहा गुंठे शेडनेटसाठी लाल माती 90 ब्रास, शेणखत 30 ब्रास आणि भाताचे तूस चार टन किंवा वाळू चार ब्रास या प्रमाणात वापरावी. सदर संपूर्ण एकत्रित मिश्रण कल्टिव्हेटरच्या साह्याने शेडहाऊसमध्ये समपातळीत पसरून घ्यावे. सपाट सारे वाफे बनवून त्यामध्ये पाणी सोडावे. काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचा कागद त्यावर व्यवस्थित झाकावा. सात दिवसांनंतर सदर प्लॅस्टिकचा कागद काढून पुन्हा एकदा वाफ्यामध्ये पाणी सोडावे.
लागवडीसाठी वाफसा येताच गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्याच्या पृष्ठभागाची रुंदी 90 सें.मी., उंची 40 सें.मी. आणि दोन गादीवाफ्यांतील अंतर 50 सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर दोन ओळींत ढोबळी मिरचीची लागवड करावी. दोन ओळींतील (रांगांतील) अंतर 50 सें.मी. आणि दोन रोपांतील अंतर 45 ते 50 सें.मी. ठेवावे. रोपांची निवड करताना ती चार ते पाच आठवडे वयाची असावीत. प्रत्यक्ष रोपावर चार ते पाच पाने असावीत. रोपांच्या मुळाचा जारवा चांगला झालेला असावा. रोपे कीडमुक्त आणि रोगमुक्त असावीत.
झाडाला आकार येण्यासाठी छाटणी करणे आवश्‍यक असते, त्यासाठी सहा पाने झाडावरती ठेवून लागवडीनंतर 21 दिवसांनी झाडांची छाटणी किंवा पिंचिंग करावे. लागवडीनंतर फांद्यांना नायलॉन/प्लॅस्टिकच्या (जाडसर) दोरीने बांधून जमिनीस समांतर व जमिनीपासून तीन मीटर उंचीवर लावलेल्या लोखंडी तारांना या दोऱ्या टांगाव्या. वरच्या लोखंडी तारा मजबूत (12 गेजच्या) असाव्यात, जेणेकरून रांगेतील सर्व झाडांचे वजन त्या सहन करू शकतील. एका गादीवाफ्यावरील दोन ओळींच्या वरती तीन लोखंडी तारा बांधतात व एका झाडाला चार प्लॅस्टिक दोऱ्या बांधाव्या.
माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 15 ते 20 गाड्या चांगले कुजलेले शेणखत, तसेच माती परीक्षण अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार 150 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश पिकाला द्यावे. संबंधित खतमात्रा संदर्भासाठी दिली आहे. संपूर्ण पालाश, स्फुरद आणि शेणखत, तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी. उर्वरित अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिना व पन्नास दिवसांच्या अंतराने दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे. मिश्रखतांचा वापर केल्यास फायदा अधिक होतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पीकवाढीच्या अवस्थेत योग्य वेळी पाण्यात विरघळणाऱ्या खतांची फवारणी करावी.


केळीवर प्रक्रिया करून कोणकोणते पदार्थ तयार करता येतात? के ळीवर प्रक्रिया केल्याने मूल्यवर्धन होऊन चांगला फायदा होतो. केळीपासून बनविता येणाऱ्या विविध पदार्थांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील काढणीपश्‍चात तंत्रज्ञान विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे :
पीठ ः केळीचे पीठ तयार करण्यासाठी कच्ची केळी वापरली जातात. एक किलो पीठ तयार करण्यासाठी साधारणपणे साडेतीन किलो गर लागतो. यासाठी प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून त्याच्या चकत्या किंवा बारीक तुकडे करून सुकवतात. सुकविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा किंवा वाळवणी यंत्राचा वापर करतात. केळीच्या चकत्या वाळवून त्याच्यातील पाण्याचे प्रमाण आठ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आणले जाते. नंतर या चकत्यांपासून दळणी यंत्राचा वापर करून पीठ तयार करतात. हे पीठ जर काळे पडत असेल तर पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या 0.05 ते 0.06 टक्का तीव्रतेच्या द्रावणात 30 ते 45 मिनिटे केळ्याच्या चकत्या बुडवून वाळवतात व नंतर पीठ तयार करतात. तयार झालेले पीठ प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून कोरड्या व थंड जागी साठवितात.
भुकटी ः यासाठी पूर्ण पिकलेली केळी लागतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या साह्याने लगदा करून घ्यावा. स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंवा फोम मॅट ड्रायरच्या साह्याने केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी करतात. तयार झालेल्या केळीच्या भुकटीला विशिष्ट गंध व चव असल्याने बाजारपेठेत वेगवेगळे पदार्थ (उदा. आइस्क्रीम) बनविण्यासाठी मोठी मागणी आहे. तयार झालेली भुकटी निर्जंतुक हवाबंद डब्यांत साठवून कोरड्या व थंड जागी साठवून ठेवावी.
चिप्स ः केळीचे चिप्स तयार करण्यासाठी हिरवी कच्ची केळी निवडावीत. ती स्वच्छ पाण्याने धुवावीत. त्याची साल काढून चिप्स (चकत्या) बनविण्याच्या यंत्राच्या (किसणी) साह्याने तीन मि.मी. जाडीच्या गोल चकत्या कराव्यात. या चकत्या 0.06 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या द्रावणात दहा मिनिटे भिजवल्यानंतर वनस्पती तुपात तळाव्यात. तळलेल्या चिप्सवर दोन टक्के मीठ टाकून ते चिप्सला व्यवस्थित लावावे. चिप्स दीर्घकाळ टिकविण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांत व्यवस्थित साठवाव्यात. दुसऱ्या पद्धतीने चिप्स बनविताना 7.5 टक्के मिठाचे द्रावण तयार करून त्यात 0.05 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट टाकावे. हे द्रावण व्यवस्थित उकळून, कोमट करून त्यात वरील पद्धतीने तयार केलेल्या चिप्स 30 मिनिटे बुडवाव्यात. नंतर द्रावणातून काढून वनस्पती तुपात तळून वरील पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशव्यांत साठवावे.
प्युरी ः पूर्ण पिकलेली केळी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन, साल काढून, पल्पर यंत्राच्या साह्याने लगदा तयार करून घ्यावा. हा लगदा निर्जंतुक करून निर्जंतुक डब्यात हवाबंद करावा. ही तयार झालेली प्युरी लहान मुलांना खाऊ देण्यासाठी, आइस्क्रीमला चव आणण्यासाठी, मिल्कशेक तयार करण्यासाठी किंवा बेकरी उद्योगामध्ये वापरतात.
वेफर्स ः चांगल्या प्रतीचे वेफर्स तयार करण्याकरिता पूर्ण वाढ झालेली, परिपक्व, कच्ची केळी निवडावी. केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून यंत्राच्या साह्याने साधारणपणे तीन ते पाच मि.मी. जाडीच्या चकत्या कराव्यात. या चकत्या 0.1 टक्का सायट्रिक आम्ल किंवा 0.05 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवाव्यात. यामुळे चकत्या काळसर न पडता पांढऱ्याशुभ्र राहतात. नंतर चकत्या उकळत्या पाण्यात तीन ते चार मिनिटे बुडवून, थंड करून प्रति किलो चकत्यांस चार ग्रॅम याप्रमाणे गंधकाची धुरी द्यावी. तयार झालेल्या चकत्या उन्हात किंवा वाळवणी यंत्रात सुकवाव्यात. जर चकत्या वाळवणी यंत्राच्या साह्याने सुकवायच्या असतील, तर तापमान 60 अंश से.पेक्षा जास्त नसावे. तयार झालेले वेफर्स प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून, कोरड्या व थंड जागी साठवावे. आवश्‍यकतेनुसार ते तेलात किंवा तुपात तळून, मीठ किंवा मसाले लावून खाण्यासाठी वापरावे.


उन्हाळी मिरची लागवडीसाठी गादीवाफे कसे तयार करावेत? लागवड कशी करावी? मि रचीच्या रोपांकरिता गादीवाफे शास्त्रीय पद्धतीने तयार करून मगच बी पेरावे. त्यासाठी गादीवाफ्यांची रुंदी एक मीटर, लांबी दोन ते तीन मीटर आणि उंची 15 ते 20 सें.मी. ठेवावी. गादीवाफे पाणी उपलब्धतेच्या ठिकाणी तयार करावे, जेणेकरून सुरवातीला पाण्याची अडचण येणार नाही. पेरणीपूर्वी वाफ्यातील बुरशी नियंत्रणाकरिता मॅन्कोझेब दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरावे. एक हेक्‍टर मिरची लागवडीसाठी 250 ते 300 ग्रॅम बियाणे लागते. वाफ्याच्या रुंदीला समांतर सहा सें.मी. अंतरावर रेघा पाडून त्यात पातळ बी पेरावे. पेरणीपूर्वी तीन ते चार ग्रॅम थायरम प्रति किलो चोळून नंतर बियाणे पेरणी करावी. पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांत मिरची रोपे लागवडीस तयार होतात. रोपे तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष लागवड करण्याकरिता दोन फुटाच्या म्हणजे 60 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. दोन रोपांतील व दोन ओळींतील अंतर 60 ु 60 सें.मी. ठेवावे. रोपे लागवडीअगोदर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड दोन ग्रॅम प्रति लिटर द्रावणात बुडवून लागवड करावी.


सफेद मुसळीची लागवड कशी करावी? रब्बी हंगामात लागवड करता येईल का? जमीन कशी हवी? स फेद मुसळीचे कंद विक्रीस खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध असेल, तरच लागवड करणे फायदेशीर ठरते, त्यासाठी लागवडीपूर्वी आपण आपल्या भागातील बाजारपेठेचा विचार करूनच लागवड करणे योग्य ठरेल. त्याचबरोबर लागवडीपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी सफेद मुसळी लागवड केली असेल, त्यांचे अनुभव व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणेही आवश्‍यक आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील प्रक्षेत्रावर सुगंधी वनस्पतींमध्ये कस्तुरी भेंडी, गवती चहा, जावा सिट्रोनेला, जिरॅनियम, तुळस, दवणा, वाळा; तसेच औषधी वनस्पतींमध्ये अश्‍वगंधा, कळलावी, इसबगोल, खाजकुईली, ज्येष्ठमध, रानवांगी, शतावरी, सदाफुली, सर्पगंधा, सफेद मुसळी यांची लागवड केलेली आहे. उत्पादित मालाची खरेदी करण्याची हमी असेल, तर लागवड करण्यास हरकत नाही. सफेद मुसळीची लागवड खरीप हंगामात करतात. लागवडीसाठी भुसभुशीत-पोयट्याची जमीन लागते. लागवड 30 ु 15 सें.मी. अंतरावर करावी.पाने पिवळी पडल्यावर नोव्हेंबर-जानेवारीत काढणी करतात.


गहू पिकावर येणाऱ्या कीड-रोगांपासून पिकाच्या संरक्षणासाठी काय उपाय करावे? रा ज्यात गव्हावर प्रामुख्याने तांबेरा व करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तांबेऱ्यामुळे उत्पादनात घट येते. प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करणे आवश्‍यक असते.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार तांबेरा रोगाची लागण दिसताच 25 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाची तीव्रता लक्षात घेऊन 10-15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. गव्हावर करपा रोगाचादेखील प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रण करण्यासाठी रोगाची लक्षणे दिसू लागताच 25 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खोडकिडीचा प्रादुर्भाव गहू ओंबीवर असताना आढळून येतो. अळ्या रोपट्यांच्या गाभ्यात शिरून गाभा पोखरतात. परिणामी रोपट्यांचा वरील भाग वाळतो. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त रोपे मुळांसह उपटून त्यांचा नायनाट करावा. किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास 40 ग्रॅम कार्बारिल (50 टक्के) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी. उंदीर गव्हाचे फुटवे व ओंब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. त्यासाठी धान्याचा भरडा 49 भाग, एक भाग झिंक फॉस्फाईड व थोडे गोडेतेल यांचे मिश्रण एकत्र मिसळावे. विषारी आमिष तयार करून प्रत्येक बिळात चमचाभर टाकून बिळे बुजवावीत.
कीडनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा.


गांडूळ खताची निर्मिती कशी करावी? सविस्तर मार्गदर्शन हवे. गां डूळ खताचे उत्पादन चार पद्धतीने उदा. : कुंडी पद्धत, टाकी पद्धत, खड्डा पद्धत आणि बिछाना पद्धतीने करतात. शेतावर मोठ्या प्रमाणावर गांडूळ खत तयार करण्यास खड्डा पद्धत अधिक सोयीची आहे.
गांडूळ खत तयार करण्याची पद्धत ः मोठ्या प्रमाणावर गांडूळ खत तयार करण्यासाठी पुढील पद्धतींचा वापर केला जातो :
1) खड्डा पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
2) सिमेंट हौद पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
3) बिछाना पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
वरील पद्धतींपैकी आपल्या सोयीनुसार एक पद्धत निवडावी. निवड केलेल्या पद्धतीसाठी लागणारी खड्ड्याची रचना ही गुरांच्या गोठ्याजवळ उंच जागेवर, योग्य निचरा असणाऱ्या ठिकाणी, मांडवाच्या किंवा झोपडीच्या सावलीत किंवा पत्र्याच्या शेडमध्ये करून घ्यावी. खड्डा भरताना सर्वच पद्धतींमध्ये थरांची रचना सर्वसाधारणपणे एकाच प्रकारे करावी. सुरवातीला तळाशी 15 सें.मी. जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा (उदा. : गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन, तूर, सूर्यफुलाचा भुस्सा, पालापाचोळा, चाऱ्याचा उरलेला भाग इ.) थर द्यावा. त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व चाळलेली माती 3ः1 या प्रमाणात मिसळून त्याचा 15 सें.मी.चा थर द्यावा. त्यावर ताज्या शेणाचा किंवा पाण्यामध्ये शेण कालवून त्याची रबडी करून दहा सें.मी.चा तिसरा थर द्यावा. शेवटी बिछान्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालावे. हा बिछाना पाण्याने ओला करावा. वातावरणानुसार व आवश्‍यकतेप्रमाणे पाणी द्यावे व खतामध्ये 50 टक्के ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. रचलेल्या थरांतील उष्णता कमी झाल्यावर एक ते दोन आठवड्यांनी वरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला सारून कमीत कमी एक हजार प्रौढ गांडुळे सोडावी. गांडुळांची संख्या कमी असेल, तर खत तयार होण्यास अधिक काळ लागतो, पण सर्वसाधारणपणे गांडुळांची संख्या दहा हजार झाली, की दोन महिन्यांत उत्तम असे एक टन गांडूळ खत तयार होते. गांडूळ खताचा रंग काळसर तपकिरी असतो. खत तयार झाल्यावर पाणी बंद करावे. वरचा थर कोरडा झाला, की पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे व त्याचा बाहेर सूर्यप्रकाशात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकूच्या आकाराचा ढीग करावा. उन्हामुळे सर्व गांडुळे तीन-चार तासांनंतर तळाशी जाऊन बसतील. नंतर वरचा खताचा भाग हलक्‍या हाताने अलग करून घ्यावा. ज्यामध्ये कुजलेले गांडूळ खत, तसेच गांडुळांची अंडी असतील.


कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे, तांत्रिक मार्गदर्शन कोठे मिळेल? कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याविषयीचे शास्त्रोक्‍त ज्ञान, तसेच त्यातील तांत्रिक गोष्टींची माहिती असणे आवश्‍यक आहे. साधारणपणे कुक्कुटपालन हे अंडी उत्पादनासाठी व मांसासाठी (ब्रॉयलर) करता येते. अंड्यासाठी कुक्कुटपालन करायचे असल्यास विविध जातींच्या कोंबड्या पाळता येतात. जसे- गावठी कोंबड्या, व्हाइट लेगहॉर्न, ऱ्होड आयलॅंड रेड इत्यादी.
अंड्यावरील कोंबड्यांचे वयोगटानुसार व्यवस्थापन करताना एक ते सहा आठवड्यांपर्यंत लहान पिल्लांची निगा राखणे, 6-20 आठवड्यांपर्यंत शरीरवाढीसाठी आणि 21 आठवड्यांपासून पुढे पक्ष्यांचा अंडी उत्पादनाचा काळ असतो. अशा पद्धतीने अंड्यावरील कोंबड्यांचे व्यवस्थापन करावे. कोंबड्यांना खाद्य व्यवस्थापन करताना वयोगटानुसार कोंबड्यांना चीक मॅश, ग्रोअर मॅश व लेअर मॅश द्यावे. कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी व सुव्यवस्थित व्यवस्थापनासाठी प्रत्येक पक्ष्याला वयानुसार साधारणपणे 1.5 ते 2.0 चौ. फूट जागा असावी. शहरी व ग्रामीण भागात कोंबडीच्या मांसासाठी (ब्रॉयलर कोंबड्यांसाठी) मागणी वाढत आहे. मांसासाठी कुक्कुटपालन करणे सोपे व फायदेशीर ठरते.
साधारणपणे पिल्ले जन्मल्यानंतर आठ आठवड्यांत विक्रीयोग्य होतात. पक्ष्यांची वाढ भराभर होत असल्याने असे पक्षी मांसासाठी वाढविणे किफायतशीर ठरते. कोंबडीच्या मांसासाठी विविध प्रकारच्या जातींचे पालन करता येते; परंतु भराभर वाढणाऱ्या व जास्त वजन देणाऱ्या जाती निवडाव्यात. मांसासाठी कोंबडीपालन करण्यासाठी व व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी शास्त्रोक्त व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, वेळच्या वेळी लसीकरण व बाजारपेठ महत्त्वाची आहे. साधारणपणे एका कोंबडीस एक चौ. फूट जागा पुरेशी होते.
कोंबडी फार्मची आखणी पूर्व-पश्‍चिम असावी. हवेशीर व आवाजापासून दूर असावी. कोंबड्यांना बसण्यासाठी खाली लाकडी भुस्सा किंवा शेंगांची टरफले यांचा पाच-दहा सें.मी.चा थर द्यावा. जेणेकरून जमिनीचा उबदारपणा टिकेल व कोंबड्यांची विष्ठा त्यात कालवली जाईल. कोंबडीघरात ऊब टिकण्यासाठी लाइटची व्यवस्था करावी. साधारणपणे दोन-तीन वॉट उष्मा प्रत्येक पक्ष्याला मिळावी, या दृष्टीने व्यवस्था करावी. कुक्कुटपालनासंबंधी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा :
ः 022 – 24131180, 24137030, विस्तार क्र. 136
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई


उन्हाळी मुगाची लागवड कधी व कशी करावी? खत व पाणी व्यवस्थापन कसे करावे? रब्बी हंगामातील पीक उदा. : गहू, हरभरा, करडई इ. पिकांनंतर उन्हाळी मूग घेता येतो. मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन योग्य असते. क्षारयुक्त, पाणथळ, तसेच उतारावरील हलक्‍या ते निकस जमिनीत लागवड करू नये, कारण मुळांवरील रायझोबियम जिवाणूंच्या गाठींची योग्य वाढ होत नाही व परिणामी रोपे पिवळी पडतात.
उन्हाळी मुगाकरिता एकेएम 8802, पीकेव्ही ग्रीनगोल्ड वाणांची निवड उन्हाळी हंगामात फायदेशीर दिसून आली आहे. पेरणी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांतील 10 सें.मी. राहील याची काळजी घ्यावी व पाभरीने पेरणी करावी. शिफारशीनुसार हेक्‍टरी 12 ते 15 किलो बियाण्याचा वापर करावा. बियाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया करावी.
सेंद्रिय खतांचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनात खूप महत्त्व आहे. दुसऱ्या वखराच्या पाळीच्या वेळेस 10 ते 15 गाड्या प्रति हेक्‍टर चांगले कुजलेले शेणखत टाकावे. या पिकाला नत्रापेक्षा स्फुरदाची जास्त आवश्‍यकता आहे, तरीपण सुरवातीच्या काळात पीक जोमदारपणे वाढण्याच्या दृष्टीने पिकाला 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद (43 किलो युरिया व 250 किलो स्फुरद किंवा 100 किलो डीएपी) प्रति हेक्‍टर एवढी खतमात्रा पेरणीच्या वेळी द्यावी. नत्र व स्फुरद एकाच वेळी पेरणीच्या वेळी जमिनीत बियाण्याच्या खाली पेरून द्यावे.
ओलित व्यवस्थापन ः हे पीक ऐन उन्हाळ्यात येत असल्यामुळे साधारणपणे पाच ते सहा ओलिताच्या पाळ्या द्याव्या लागतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे व वातावरणातील उष्णतेमुळे पाण्याच्या पाळ्या कमी किंवा जास्त होऊ शकतात. म्हणून पिकाला फुलोऱ्याच्या काळात, तसेच शेंगा भरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. आवश्‍यकतेनुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.


शेवग्याच्या झाडास मोठ्या प्रमाणात बहर आला आहे, परंतु झाडांना फळधारणा होत नाही, त्याचे कारण काय? त्यावर काय उपाय करावेत? उन्हाळी मिरची पिकात काकडीचे आंतरपीक घेणे योग्य आहे का? शेवग्याच्या झाडास कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास फळधारणा होण्यावर परिणाम होतो. शेवग्यावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो, तसेच करपा रोगदेखील होतो. रोगामुळे पाने पिवळी पडतात. परागीभवन व्यवस्थित न झाल्याने देखील फळधारणा होत नाही. बुरशीजन्य रोगांमुळे फुलांची गळ होते. उपाय म्हणून 18ः18ः18 या विद्राव्य खताची पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आठ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. उन्हाळी मिरची पिकात काकडीचे आंतरपीक घेतल्यास काकडीवर होणारा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मिरचीवरदेखील लवकर होऊ शकतो. तसेच काकडीवरील रसशोषक किडींमुळे मिरचीचे नुकसान होऊ शकते, तेव्हा काकडीचे आंतरपीक न घेणे योग्य होईल.


दोडका लागवड करायची आहे, जमीन कशी हवी? खत व्यवस्थापन कसे करावे? दो डका लागवडीसाठी मध्यम, काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची चांगली मशागत करून हेक्‍टरी 15 ते 20 गाड्या शेणखत मिसळावे. दोडका लागवडीसाठी पुसा नसदार, कोकण हरिता, फुले सुचेता या सुधारित जाती निवडाव्यात. खरीप लागवड जून-जुलै, तर उन्हाळी लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी. ताटी पद्धतीने लागवड करताना 1.5 ु 1 मीटर अंतराने करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी दोन ते अडीच किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी तीन ग्रॅम थायरम किंवा अडीच ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाण्यास लावावे. लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. एक महिन्याने उर्वरित 50 किलो नत्राची मात्रा द्यावी. मगदुरानुसार पाणी व्यवस्थापन करावे, तसेच कीड व रोगनियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.


उन्हाळी भेंडी लागवडीचा योग्य कालावधी कोणता? लागवडीबाबत मार्गदर्शन करावे. न्हाळी हंगामात घेतले जाणारे भेंडी हे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. लागवड 15 जानेवारी ते फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत करावी. भेंडीची लागवड हलक्‍या ते भारी कोणत्याही जमिनीत करता येऊ शकते; परंतु शक्‍यतो काळी, कसदार, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. शेतास उभी-आडवी नांगरणी करून, ढेकळे फोडून वखराच्या पाळ्या द्याव्यात. त्यात चांगले कुजलेले शेणखत हेक्‍टरी 30-40 गाड्या टाकावे व त्यानंतर पुन्हा एक वखराची पाळी देऊन शेत तयार करावे. शेवटच्या वखरणीनंतर 60 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. गादीवाफ्यावर लागवड केल्यास उत्तम प्रतीची सारख्या लांबीची फळे, तसेच जास्त उत्पादन मिळते. गादीवाफ्यावर लागवड करणे फायद्याचे आहे. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांतील अंतर 10 ते 15 सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी 10 ते 15 किलो बियाणे वापरावे. संकरित वाणांसाठी अंदाजे पाच ते दहा किलोपर्यंत बियाणे वापरावे. गादीवाफ्यावर लागवड करण्यासाठी दोन ओळींत 40 सें.मी. व दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. बियांची लागवड सरळ रांगेत करावी. एका ठिकाणी दोन बिया टोकून लावाव्यात. तापमान 17 अंश से.पेक्षा खाली गेल्यास बियाणे 55 ते 60 अंश से. गरम पाण्यात बुडवून प्रक्रिया केली असता उगवण लवकर होते. माती परीक्षणानुसार खताची मात्रा द्यावी. हेक्‍टरी 20 टन शेणखत पेरणीपूर्वी जमिनीत मिसळावे. ऍझोटोबॅक्‍टर व स्फुरद विरघळवणारे जिवाणूसंवर्धन अडीच ग्रॅम प्रत्येकी एक किलो बियाण्यास चोळावे व नंतर पेरणी करावी. रासायनिक खते देताना 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. यापैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश प्रति हेक्‍टरी पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले 50 कि. नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. पेरणीवेळी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. पिकास पहिले पाणी बियाणे उगवून आल्यानंतर द्यावे. त्यानंतरचे पाणी हे जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावे.


कामगंध सापळ्यांच्या वापराचे कोणते फायदे होतात? कोणत्या पिकांसाठी कोणते ल्युर वापरतात? शेतातील किडींची संख्या आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. कीटक स्वकियांशी सुसंवाद किंवा संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात. तो गंध स्वकियांमध्ये विशिष्ट प्रकारच्या संदेशवहनाचे कार्य करतो. या वासामुळे नर/मादीमध्ये चेतना निर्माण होऊन नर-मादी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि समागमासाठी योग्य जोडीदार मिळवू शकतात, त्यामुळे या गंधाला कामगंध (फेरोमोन) असे म्हटले जाते. वेगवेगळ्या किडींचा फेरोमोन वेगवेगळा असतो. काही कीटकांमध्ये नर कीटक मादीला, तर काहींमध्ये मादी कीटक नराला आकर्षित करतात. कीटकांच्या या सवयी लक्षात घेऊन कृत्रिम कामगंध (फेरोमोन) तयार केले जातात. फेरोमोन सापळे मोठ्या प्रमाणात लावल्याने लिंग प्रलोभन रसायनांचे (ल्यूर) सूक्ष्म कण वातावरणात पसरतात. कीटकांच्या शरीरातून सोडला जाणारा गंध आणि वातावरणातील कृत्रिम रसायनांचा संदेश यातील फरक त्यांना कळेनासा होऊन त्यांचा गोंधळ उडतो आणि मिलन होऊ शकत नाही. महत्त्वाच्या बाबी – 1) सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकांसाठी हेक्‍टरी पाच सापळे आवश्‍यक. किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर पकडण्यासाठी हेक्‍टरी 15 ते 20 सापळे गरजेचे. 2) कापूस पीक 30-40 दिवसांचे असताना हिरवी अळी, ठिपक्‍याची बोंड अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावाची माहिती व योग्य नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर करावा. 3) प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे सापळे वापरावेत. सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवड्याला काढून नष्ट करावे. 4) सापळ्यामधील लिंग प्रलोभने 15 ते 20 दिवसांनी बदलणे आवश्‍यक. 5) सापळा साधारणतः पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून दोन ते तीन फुटांवर राहणे आवश्‍यक. 6) सापळा वाऱ्याच्या दिशेला समांतर असावा, त्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून किडीचे जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षित होतात.
वापराचे फायदे – 1) किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य वेळी कीटकनाशकांची फवारणी शक्‍य. 2) एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशके फवारणीचा खर्च टाळता येतो. सापळ्यांचा खर्च कीटकनाशकांच्या खर्चापेक्षा कमी. 3) रसायनांचा वापर घटल्यामुळे परोपजीवी मित्रकीटक सुरक्षित राहून त्यांच्या संख्येत वाढ. नैसर्गिक नियंत्रणाचे चक्र क्रियाशील होते.4) सापळ्यातील रसायनांमुळे पर्यावणावर वाईट परिणाम होत नाही.


मिश्र खत कसे तयार करतात? पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या दोन किंवा अधिक अन्नद्रव्ययुक्त खतांच्या मिश्रणाला मिश्रखत म्हणतात. दोन अन्नद्रव्ये असणाऱ्या संयुक्त खतांचे मिश्रण करूनही मिश्रखत तयार करता येते. शेतावरच मिश्रखत तयार करण्याची पद्धत - कोणत्याही विशिष्ट उपकरणांचा वापर न करता सरळ खतांचे मिश्रण करून मिश्रखते शेतावर तयार करता येतात. ही पद्धत आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. अशा तऱ्हेचे मिश्रण सिमेंट कॉंक्रिटचा पृष्ठभाग असणाऱ्या ओट्यावर तयार करता येते. यासाठी फावडे, चाळणी, लाकडी हातोडा, तराजू इत्यादी साहित्य पुरेसे होते. मिश्रखत पेरणीपूर्वी एक दिवस अगोदर तयार करावे. जेणेकरून त्यामध्ये खडे तयार होणार नाहीत. ठराविक मिश्रखत तयार करण्यासाठी आवश्‍यक असणारी सरळ खतांची मात्रा काढणे सुलभ आहे. उदा. ः एक टन 4-8-15 या ग्रेडचे मिश्रखत करायचे झाल्यास अमोनिअम सल्फेट, सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा पुढीलप्रमाणे काढता येते ः 100 किलो 4-8-15 ग्रेडचे मिश्रखत करण्यासाठी, म्हणजेच मिश्रखतामध्ये चार टक्के नत्र, आठ टक्के फॉस्फेट आणि 15 टक्के पोटॅश असण्यासाठी सरळ खतांची मात्रा पुढीलप्रमाणे काढावी. त्यानंतर एक टन मिश्रखत तयार करण्यासाठी आलेल्या सरळ खतांच्या मात्रेस दहाने गुणावे. अशा तऱ्हेने एक टन 4-8-15 ग्रेडचे मिश्रखत तयार करण्यासाठी 200 किलो अमोनिअम सल्फेट, 500 किलो सुपर फॉस्फेट आणि 250 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 50 किलो फिलरची गरज असते.
नत्र = 4 द 100 क्क 20 = 20 किलो अमोनिअम सल्फेट
स्फुरद = 8 द 100 क्क 16 = 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट
पालाश = 15 द 100 क्क 60 = 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश
100 किलो मिश्रखत = 95 किलो सरळ खत + पाच किलो फिलर
तयार करताना घ्यावयाची काळजी -
1) अमोनिया असणारी सरळ खते. उदा. – अमोनिअम सल्फेट, अमोनिअम नायट्रेट इत्यादी खते, बेसिक स्लॅग, फॉस्फेट रॉक या खतांसोबत मिसळल्याने नत्राचा वायूरूपात ऱ्हास होत असल्यामुळे ती मिसळू नयेत. 2) पाण्यात विद्राव्य स्फुरदयुक्त खते उदा. ः सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, अमोनिअम फॉस्फेट ही खते मुक्त चुना असणाऱ्या खतात मिसळल्याने विद्राव्य फॉस्फेट अविद्राव्य स्वरूपात बदलण्याची शक्‍यता असते आणि हा अविद्राव्य फॉस्फेट पिकांना उपलब्ध होत नाही. 3) सहज विद्राव्य होणारी आणि हवेतील बाष्प शोषून घेणारी खते. उदा. ः कॅल्शिअम, अमोनिअम नायट्रेट, युरिया इत्यादी खते मिसळल्यानंतर त्यात ढेकळे किंवा खडे तयार होतात; त्यामुळे अशा खतांचे पेरणीच्या थोडा वेळ अगोदर मिश्रण तयार करावे. सर्व प्रकारची नायट्रेट धारण करणारी खते, युरिया, पोटॅशिअम सल्फेट किंवा क्‍लोराइड्‌स खतांत मिसळल्यानंतर ती त्यांच्या जलाकर्षक गुणधर्मामुळे हवेतील पाणी शोषून घेतात व कठीण होतात, म्हणून अशा प्रकारची खते जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नयेत व ती केल्यास लगेचच पिकांना द्यावीत. द्रवरूप मिश्रखतांचा वापर फळबागा, भाजीपाला पिकांमध्ये करता येतो.


शेततळ्यासाठी अस्तरीकरण करायचे असल्यास कसे करावे? शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे असते. त्यासाठी बेन्टोनाईट, माती-सिमेंट मिश्रण, दगड-विटा-सिमेंट मिश्रण, चिकण माती किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. प्लॅस्टिक फिल्मची जाडी 300 ते 500 जी.एस.एम. असावी. सिमेंट व माती प्रमाण 1ः8 व जाडी पाच सें.मी. ठेवावी. शेततळे हे काळ्या खोल जमिनीत बांधले असेल, तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते, त्यामुळे शेततळ्यातील पाणी कमी होते; गाळाचे प्रमाण वाढते. यामुळे काही कालांतराने शेततळ्याची पाणी साठवणक्षमता कमी होते. असे होऊ नये म्हणून शेततळे घेण्यापूर्वी मृद्‌ व जलसंधारणाचे उपाय करावेत.


कांदा पिकाचे थंडी धुक्‍यापासून संरक्षण कसे करावे? कांदा लागवडीपासून दीड ते दोन महिन्यांत रात्रीचे तापमान दहा अंश से.च्या खाली गेले आणि सतत हेच तापमान 10 ते 12 दिवस राहिले तर कमी तापमानास संवेदनशील जातींमध्ये डोंगळे दिसतात. म्हणून हंगामानुसार योग्य जातींची लागवड करणे आवश्‍यक असते. धुके किंवा थंडीपासून कांदा पिकाला वाचविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कांद्याला तुषार सिंचनाचा वापर केला आहे त्यांनी ज्या दिवशी धुके, थंडी व दव जास्त असेल तेव्हा तुषार सिंचन संच सकाळच्या वेळी पाच ते दहा मिनिटे चालवावा. त्यामुळे कांदा पातीवर जमा असलेले दव पाण्याने धुतले जाईल. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण कमी होईल.
तुषार सिंचन नसेल त्या ठिकाणी स्प्रे पंपाने पाण्याची फवारणी करावी. धुके किंवा दव अशा अवस्थेमध्ये कांद्यावरील रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारशीत बुरशीनाशकाची स्टिकर मिसळून फवारणी करावी. सपाट वाफ्यात किंवा सरी वरंबा अथवा ठिबक वर कांदे लावले असतील तर हलके पाणी द्यावे. संध्याकाळी शेतात आठ ते दहा ठिकाणी ओला कचरा किंवा गवत जाळले तर शेतात रात्री धुराचे आवरण तयार होते. या आवरणामुळे शेतात उष्णता राहते. त्यामुळे थंडी, धुके व दव कांद्याच्या पातीवर जमत नसल्याने पिकाचे नुकसान होत नाही.


परसातील कोंबडीपालनासाठी कडकनाथ जातीच्या कोंबडीविषयी माहिती हवी, त्या कोठे मिळतील? कडकनाथ जातीच्या कोंबड्या मध्य प्रदेशातील झाबुआ व धार जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आढळतात. या कोंबडीचे मांस हे काळेशार असते. मांसातील प्रथिनांचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असून, रोगप्रतिकारशक्ती दणकट असते. या जातीच्या कोंबड्यांतील गुणसूत्रांमुळे त्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा तग धरून राहतात. गावकुसाबाहेर चरून कमी खर्चात हा पक्षी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो. सफल अंडी उत्पादन 55 टक्के असून, अंडी उबवणूक क्षमता 52 टक्के एवढी असते.


तज्ज्ञांनी दिलेला सल्ला आंबा - – आंब्याला येणाऱ्या नवीन पालवी व मोहोरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणासाठी दहा ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा दहा ग्रॅम थायोफीनेट मिथाईल किंवा 20 ग्रॅम प्रॉपीनेब प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर फवारणी करावी.
– आंबा मोहोरावरील तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी (17.8 टक्के) इ मिडाक्‍लोप्रिड तीन मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. ज्या ठिकाणी मोहोर पूर्णपणे उमलून आलेला आहे तेथे चौथी फवारणी घ्‌ यावी. त्यासाठी (35 टक्के) एन्डोसल्फान 15 मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यातून संपूर्ण मोहोरावर फवारावे. भुरी रोगाच्या नियं त्रणासाठी वरील दोन्ही फवारण्यांमध्ये दहा ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा पाच मि.लि. हेक्‍झाकोनॅझोल किंवा 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. गंधकाची फवारणी प्रखर उन्हातकिंवा अधिक तपमानात घेऊ नये. इमिडाक्‍लोप्रिडचा साततने वापर करू नये.
– हवामानातील बदलामुळे आंब्यामध्ये काही ठिकाणी फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी (45 टक्के) स्पिनोसॅड 25 मि.लि. किंवा (30 टक्के) डायमेथोएट दहा मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यातून संपूर्ण झाडावर फवारावे.
– ज्या आंबा कलमांना पुरेसा मोहोर आलेला आहे व थंडीमुळे त्या कलमांना परत मोहोर येण्याची शक्‍यता आहे अशा ठिकाणी परत येणारा मोहोर टाळण्यासाठी 50 पीपीएम जिब्रेलिक ऍसिडची फ वारणी प्रथम पूर्ण मोहोर उमललेला असताना व मोहोरीच्या आकाराची फळे झाल्यावर संपूर्ण झाडावर करावी. (50 पीपीएम द्रावण तयार करण्यासाठी एक ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड हे प्रथम अल्कोहोलमध्ये विरघळवून घ्यावे व नंतर ते एक लिटर पाण्यात चांगले मिसळल्यानं तर त्याचे एकूण 20 लिटर द्रावण करावे म्हणजे ते द्रावण 50 पीपीएम होईल.) फळांची प्रत सुधारण्यासाठी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती असताना एक टक्का युरिया आणि एक टक्का पोटॅशिअम नायट्रेटची तीन वेळा फवारणी करावी.
– पाण्याची उपलब्धता असल्यास आंबा झाडांना विस्तारानुसार प्रति झाड 150-200 लि. पाणी 15 दिवसांच्या अंतराने द्यावे.
काजू, नारळ
- नारळावरील गेंडा भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी माड साफ करावे. बागेतील शेणखताच्या खड्ड्यातील अळ्यांना मारण्यासाठी 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारिल भुकटी 40 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावी. नारळावरील सोंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी भुंग्याने पाडलेली भोके दहा टक्के कार्बारिल भुकटी व वाळूने बुजवून घ्यावीत.
– नारळाच्या पानांवरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
– काजूवरील रोठा किडीच्या नियंत्रणासाठी रोठ्याच्या अळ्या 15 मि.मी. आकाराच्या पटाशीच्या साह्याने काढून टाकाव्यात आणि (20 टक्के प्रवाही) क्‍लोरोपायरिफॉस दहा मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात द्रावण तयार करून प्रादुर्भित भाग त्या द्रावणाने चांगला भिजवावा व उरलेले द्रावण झाडाच्या बुंध्यालगत मुळाशी ओतावे.
– काजू पिकात नवीन मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर मोहोरावर ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो. नियं त्रणासाठी (35 टक्के) एन्डोसल्फान 15 मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. काजूमध्ये काही ठिकाणी फळधारणेस सुरवात झालेली आहे, अशा ठिकाणी ढेकण्या व फुलकिडींच्या नियं त्रणासाठी 50 टक्के कार्बारिल भुकटी 20 ग्रॅम किंवा पाच टक्के लॅ म्डा सायहॅलोथ्रीन सहा मि.लि. किंवा 50 टक्के प्रोफेनोफॉस दहा मि. लि. प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर फवारावे.
– पाण्याची उपलब्धता असल्यास काजू कलमांना प्रति झाड 100- 150 लि. पाणी 15 दिवसांतून एकदा देण्याची व्यवस्था करावी.
भाजीपाला
– पालेभाज्या व फळभाज्या पिकांवर मावा व पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणासाठी 15 मि.लि. डायमेथोएट प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून फवारणी करावी.
– कलिंगडाच्या रोपांवर, वेलींवर पाने खाणाऱ्या भुंग्यांचा व पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. नियंत्रणासाठी 15 मि.लि. डायमेथोएट प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
मत्स्यपालन
कृषी संशोधन केंद्र, मुळदे, ता. कुडाळ येथे शोभिवंत माशांचे मत्स्यबीज विक्रीसाठी उपलब्ध आहे. तळ्यातील माशांना नैसर्गिक खाद्याबरोबर पूरक खाद्य म्हणून शेंगदाणा पेंड, भाताचा कोंडा किंवा गव्हाचा कोंडा एकास एक या प्रमाणात एकत्रित करून पाण्यात भिजवून खाद्याचे प्रमाण ठरवावे.


ऍझोला निर्मिती कशी करावी? जनावरांसाठी खाद्य म्हणून वापराबाबत मार्गदर्शन करावे. ऍझोला हे एक वनस्पतिजन्य पूरक खाद्य आहे. ही पाण्याच्या पृष्ठभागावर वाढणारी नेचा वर्गातील वनस्पती आहे. ही वनस्पती हवेतील नत्र शेवाळाच्या मदतीने शोषून घेऊन सहजीवन पद्धतीने वाढते.
यात 25 ते 35 टक्के प्रथिने असून ते पचनास हलके आहे. दहा ते 15 टक्के क्षार व आठ ते दहा टक्के ऍमिनो ऍसिड आहेत, तसेच जीवनसत्त्व अ, कॅरोटीन आणि कॅल्शिअम, झिंक यांसारखी खनिजे आहेत. तसेच ऍझोलाचा वापर नत्र स्थिर करणारे जैविक खत म्हणूनही होतो. नत्रयुक्त पदार्थ, कॅलरीज, क्षार आणि जीवनसत्त्वांच्या उणिवेमुळे जनावरांतील दुग्धोत्पादन क्षमता कमी होते. या उणिवा भरून काढण्यासाठी पशुखाद्य पूरकांचा उपयोग करणे आवश्‍यक आहे.
ऍझोलासंवर्धनासाठी अनबिना ऍझोला या जातीचे वाण उत्तम आहे. ऍझोला लागवडीसाठी तीन मीटर एक मीटर 0.2 मीटर या आकाराचा समपातळी खड्डा खोदावा. यामध्ये सिल्पोलीन प्रकारचा पॉलिथिन कागद अंथरावा. त्यानंतर कडांच्या बाजूने विटा लावाव्यात. सिमेंट कॉंक्रीटचा वापर करून पक्के वाफे तयार करता येतात. या प्रकारात प्लॅस्टिक पेपर न वापरता ऍझोला लागवड करता येते. या वाफ्याला एका बाजूला पाणी बाहेर काढण्यासाठी छिद्रे सोडावीत. वाफ्यातील लहान खडे काढून टाकावेत, त्यामुळे प्लॅस्टिक पेपर फाटणार नाही. ऍझोलासंवर्धन करताना पहिल्यांदा वाफ्यामध्ये 10 ते 15 किलो चाळलेल्या मातीचा समपातळी थर द्यावा. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गाईचे शेण 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट वाफ्यामध्ये सोडावे. ऍझोलाचे ताजे, बुरशी नसलेले बियाणे वापरावे. साधारणपणे एका वाफ्यासाठी 500 ग्रॅम ते एक किलो बियाणे पुरते. वाफ्यातील पाण्याची पातळी वरील बाजूस दोन ते तीन इंच वाफा रिकामा राहील अशी असावी.
ऍझोला निर्मितीसाठी ः 1) ऍझोलासंवर्धन शक्‍यतो झाडाच्या सावलीत किंवा कृत्रिम सावलीत करावे. 2) लागवडीसाठीच्या वाफ्यामध्ये चाळलेल्या मातीचा थर समप्रमाणात पसरून टाकावा. 3) 3 1 मीटर वाफ्यातून दररोज एक किलो ऍझोला काढून घ्यावा. 4) दर पाच दिवसांनी 20 ग्रॅम सुपरफॉस्फेट, एक किलो शेण, 20 ग्रॅम खनिज मिश्रण एकत्र करून वाफ्यामध्ये मिसळावे. 5) ऍझोला काळा पडल्यास दहा ग्रॅम कार्बेन्डाझीम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 6) दहा दिवसांनी 30 ते 35 टक्के पाणी बदलून त्यात स्वच्छ पाणी ओतावे. 7) प्रत्येक महिन्याला खड्ड्यातील पाच किलो माती काढून नवीन चाळलेली माती त्यात टाकावी. 8) दर सहा महिन्याने वाफे रिकामे करून स्वच्छ धुऊन पुन्हा मिश्रण भरावे.


मातीचा सामू कशाप्रकारे तपासला जातो? द्रावणाचा आम्ल-विम्ल निर्देशांक म्हणजे सामू (कि ) हायड्रोजन अणूच्या प्रमाणावर अवलंबून असल्याने त्याला पीएच (र्िीळीीरपलश वश कूवीेसशप) अशी संज्ञा आहे. सामू पीएच मीटरवर मोजला जातो. जमिनींची आम्लता, तसेच विम्लता तपासण्यासाठी सामू काढला जातो. सामू साडेसहापेक्षा कमी असल्यास जमिनी आम्लधर्मीय तर सामू 7.3 पेक्षा जास्त असल्यास जमिनी विम्लधर्मीय समजल्या जातात. सामू साडेसहा ते 7.3 इतका असल्यास अशा जमिनीत सर्व पिकांची वाढ चांगली होते. जमीन आम्लयुक्त असल्यास भात, नागली आणि विम्लयुक्त असल्यास कापूस, ऊस, गहू, कांदा, वांगी इत्यादी पिके चांगली येऊ शकतात.


रुंद वरंबे सरी पद्धतीने भुईमूग लागवड कशी करावी? लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया कशी करावी? रुंद वरंबे सरी या पद्धतीने भुईमूग लागवड करताना पूर्वमशागत करून रान भुसभुशीत झाल्यानंतर रुंद वरंबे व सरी तयार करण्यासाठी शेतात 150 सें.मी. अंतरावर खुणा करून, रेषा मारून आखणी करावी. पुन्हा रेषा मारलेल्या ठिकाणी 30 सें.मी. रुंदीचा पाट पाडल्यास 120 सें.मी. रुंदीचे व 15-20 सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार होतील. हे वाफे प्रथम पाणी देऊन पूर्ण भिजवून वाफस्यावर आल्यावर त्यावर 30 सें.मी. रुंदीच्या चार ओळी बसवून अशा ओळींत दोन रोपांतील अंतर दहा सें.मी. ठेवून बियाण्याची टोकण करावी. प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करावयाचा झाल्यास काळा किंवा पांढरा, सात मायक्रॉन जाडीचा, टोकण अंतरानुसार छिद्र पाडलेला प्लॅस्टिक कागद वाफ्याच्या आकारानुसार गादी वाफ्यावर अंथरूण, दोन्ही बाजूने वाफ्याच्या बगलेत माती घुसडून देऊन छिद्र असलेल्या ठिकाणी एक एक शेंगदाणा टोकावा. या तंत्राचा वापर केल्यास पाण्याचा निचरा चांगला होऊन जमिनीत हवा व पाणी यांचे योग्य प्रमाण साध्य करता येते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन, भरपूर फुलधारणा होऊन, भरपूर आऱ्या सहजतेने जमिनीत घुसून, शेंगधारणा वाढून शेंगा चांगल्या पोसतात. अशा रुंद वरंब्यावरील मधल्या दोन ओळींना पुरेसे पाणी मिळत नसेल, तर वाफ्याची रुंदी 120 सें.मी. ऐवजी 90 सें.मी. ठेवावी. अशा या रुंद वरंबा-सरी पद्धतीबरोबरच प्लॅस्टिक आच्छादन वापरून नोव्हेंबर महिन्याच्या थंडीतही भुईमूग पीक टोकून त्याची उगवण चांगली होऊन आवश्‍यक रोप संख्येसह पीक जोमदार वाढते. कारण अशा आच्छादनाने जमिनीचे तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढते. शेंगांचा आकार वाढून शेंगदाण्याचे वजन वाढते; तण, रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, गांडूळ व सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. तापमानात अचानक बदल झाला, तर आच्छादनामुळे पिकाचे रक्षण होते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होते. या सर्वांच्या एकत्रित चांगल्या परिणामाने उत्पादनात 40 ते 50 टक्के वाढ होते. पिकाला माती परिक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे.
बीजप्रक्रिया
पेरणीसाठी शिफारस केलेल्या वाणांचे शुद्ध व प्रमाणित बियाणे वापरावे, त्यामुळे उत्पादनात 35-40 टक्केपर्यंत वाढ होते. पेरणीपूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर शेंगा फोडून बियाणे तयार करावे. फुटके, बियाण्याचे आवरण निघालेले, किडके, तसेच बारीक व चिरमुटलेले बियाणे बाजूला काढून पेरणीसाठी टपोरे बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे रोपावस्थेत येणाऱ्या रोगांपासून संरक्षण होऊन उगवण चांगली होते, झाडांची मर होत नाही. याचबरोबरीने दहा किलो बियाण्यास भुईमूग पिकासाठी शिफारशीत केलेले 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक आणि 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. यामुळे झाडांच्या मुळांवरील गाठींची वाढ चांगली होऊन उत्पादनात 12 ते 15 टक्केपर्यंत वाढ होते.


केळी लागवडीसाठी जमीन कशा पद्धतीची निवडावी? केळीसाठी जमीन भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी, हलक्‍या ते मध्यम प्रतीची, पोयटायुक्त आणि भरपूर सेंद्रिय कर्ब आणि 6 ते 7.5 सामू असलेली जमीन योग्य असते. जमिनीची क्षारता 0.05 टक्केपेक्षा जास्त नसावी. पाणी धरून ठेवणारी अत्यंत वालुकामय किंवा भरकाळीची आणि चोपण जमिनीमध्ये केळीची लागवड करू नये. केळी पिकाची मुळे अत्यंत नाजूक आणि मांसल असतात. मुख्य मुळे झाडाला आधार देण्याचे कार्य करतात आणि दुय्यम तंतुमय मुळे पाणी व अन्नद्रव्य शोषण्याचे कार्य करतात. केळी पिकाची मुळे जमिनीमध्ये 120 सें.मी.पर्यंत खोलवर जातात आणि जवळपास 150 सें.मी.पर्यंत आडवी पसरतात. त्यामुळे जमिनीची पूर्वमशागत चांगली होणे गरजेचे आहे.
केळीची मुळे जरी 120 सें.मी. पर्यंत खोलवर जात असली तरी कार्यक्षम मुळे जमिनीच्या सर्वांत वरच्या 30 सें.मी. भागामध्ये कार्यक्षम असतात, म्हणून जमिनीची खोल, आडवी नांगरट करून दोन-तीन वेळा वखरणी करून आणि मोठी ढेकळे असतील तेथे रोटाव्हेटर चालवून जमीन भुसभुशीत करावी. मध्यम, हलक्‍या, काळीच्या जमिनीमध्ये केळी ज्या अंतरावर लागवड करणार असाल, त्या अंतरावर लागवडीच्या दोन महिने आधीच सऱ्या पाडून लागवडीसाठी शेत तयार ठेवावे. शिफारशीत अंतरानुसार रोपांची लागवड करावी.


नारळ लागवड करायची आहे, यासाठी कोणत्या जाती निवडाव्यात? नारळ लागवड करण्यापूर्वी पूर्वनियोजन गरजेचे असते. ओलिताची सोय असल्यास सर्वच प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते. जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करणे आवश्‍यक आहे. रेताड जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता शेणखताचा वापर करून वाढवायला हवी, तर काळ्या चिकट जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळूचा, तसेच सेंद्रिय खतांचा वापर करायला हवा. शेताच्या बांधावरदेखील लागवड करता येते.
लागवड करताना सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन माडांतील अंतर. दोन माडांत योग्य अंतर असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. योग्य प्रमाणात उत्पादन मिळविण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 25 फूट (7.5 मी.) अंतर ठेवणे गरजेचे आहे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत लागवड करावयाची असल्यास 20 फुटांचे अंतर ठेवले तरी चालेल, तसेच ठेंगू जातीसाठीदेखील 20 फूट अंतर चालू शकते. जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा खोदणे जरुरीचे असते. वरकस किंवा मुरूमयुक्त जमीन, तसेच जी जमीन प्रथमच लागवडीखाली आणली जात आहे अशा जमिनीत 1 ु 1 ु 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करणे आवश्‍यक असते. नारळाच्या अनेक जातींची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे, त्यामध्ये बाणवली, प्रताप; तर संकरित टी ु डी आणि डी ु टी या जाती आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बाणवली जातीची रोपे तयार केली जातात, तर काही प्रमाणात प्रताप आणि संकरित जातींची रोपे तयार केली जातात. रोपवाटिका पिशवीऐवजी जमिनीमध्ये केलेली असल्याने संशोधन केंद्रातील नारळ रोपे पावसाळा सुरू झाल्यानंतरच विक्रीसाठी उपलब्ध होतात.
नारळ रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार देणे आवश्‍यक असते आणि म्हणूनच त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव अगोदरपासूनच करणे आवश्‍यक आहे. रोप लावल्यानंतर पश्‍चिमेकडील वाऱ्याने ते हलू नये म्हणून रोपांच्या उंचीच्या दोन काठ्या 45 सें.मी. अंतरावर रोपांच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.


सुरू हंगामातील ऊस लागवडीसंदर्भात मार्गदर्शन हवे. सुरू ऊस लागवडीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन योग्य असते. साधारणपणे जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. निवडलेल्या जमिनीची दोन वेळा उभी – आडवी नांगरणी करून मशागत करावी. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्‍टरी २० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे. मध्यम प्रकारच्या जमिनीत एक मीटर व भारी जमिनीत १.२० मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. कंपोस्ट – शेणखत उपलब्ध नसल्यास लागवडीपूर्वी ताग-धैंचा हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाडावीत.
वाणांची निवड ः को ८६०३२, को ९४०१२, कोएम ०२६५, कोसी ६७१, को ८०१४, को ७५२७, को ९२००५ बेणेप्रक्रिया करूनच उसाची लागवड करावी. जिवाणूंच्या बीजप्रक्रियेमुळे नत्रामध्ये ५० टक्के, तर स्फुरदाच्या मात्रेत २५ टक्के बचत होते. लागवड दोन डोळे टिपरी पद्धतीने करावी. दोन डोळ्यांचे टिपरे तयार करताना डोळ्याच्या वरील १/३ भाग ठेवून धारदार कोयत्याने बेणे छाटावे. ऊस लागवड करताना दोन टिपऱ्यांमधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावे. मध्यम काळ्या जमिनीसाठी (एक मीटर सरी अंतर) हेक्‍टरी ३०,००० टिपरी व भारी जमिनीसाठी (१.२ मीटर सरी अंतर) हेक्‍टरी २५,००० टिपरी बेणे लागते.


ऊस खोडव्याचे खत पाणी व्यवस्थापन कसे करावे? खोडवा व्यवस्थापनात पाणी, खत व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे. खोडव्यासाठी हेक्‍टरी २५० किलो नत्र, ११५ किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाश ही अन्नद्रव्ये विभागून द्यावीत. ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत वाफसा आल्यावर रासायनिक खताची पहिली मात्रा पहारीने द्यावी. ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत वाफशावर पहारीच्या साह्याने बुडख्यापासून १० ते १५ सें.मी. अंतरावर २० ते २२ सें.मी. खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला खतमात्रा देऊन छिद्र मातीने बुजवून घ्यावे. दोन छिद्रांमधील अंतर एक फूट (३० सें.मी.) ठेवावे. उर्वरित ५० टक्के खतमात्रा याच पद्धतीने सरीच्या दुसऱ्या बाजूस १२० ते १२५ दिवसांनी द्यावी. माती परीक्षणानुसार खोडवा पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी एकरी आठ किलो झिंक सल्फेट, दहा किलो फेरस सल्फेट, चार किलो मॅंगेनिज सल्फेट व दोन किलो बोरॅक्‍सचा वापर करावा. पाणी व्यवस्थापन करताना पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार १२ महिन्यांच्या खोडवा पिकास पाण्याच्या साधारण २८-३० पाळ्या द्याव्यात. पाचटामुळे पाणी पुढे जात नाही, अशा वेळी सरीमधून पाचट दाबत गेल्यास पाणी सरकते. त्यामुळे पाचट मातीला चिकटते व ते कुजण्यास मदत होते. ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत खते देऊन हलके पाणी द्यावे. उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी व इतर हंगामांत १२ ते १५ दिवसांनी गरजेप्रमाणे पाणी द्यावे.


सफेद मुसळी, बिब्बा, बेहडा, वावडिंग, भुईरिंगणी, अश्‍वगंधा, काडे चिरायत, सर्पगंधा, पानपिंपळी, इसबगोल या औषधी वनस्पतींचे कोणते भाग उपयोगी पडतात? सफेद मुसळी ः मुसळीचे कंद वापरण्यास उपयोगी ठरतात. शक्तिवर्धक, बाळंतपणाचे दोष दूर करण्यासाठी.
सर्पगंधा ः सर्पगंधाची मुळे आणि बियांचा वापर केला जातो. रक्तदाब कमी करणे, जीर्ण ज्वर, तसेच सुलभ प्रसूती होण्यासाठी उपयोगी.
पानपिंपळी ः वाळलेली फळे कफ, वात, दमा, खोकला, ताप, मूळव्याध यावर उपयोगी. बिब्बा ः बी हा वापरण्याचा भाग आहे. कफनाशक, वातनाशक म्हणून उपयोगी.
बेहडा ः फळे वापरतात. पचनशक्ती वाढविणे, त्रिफळा चूर्ण तयार करण्यास उपयोगी.
वावडिंग ः फळांचे चूर्ण, जंतनाशक, पाचनशक्ती वाढविते.
अश्‍वगंधा ः मुळे, बियांचा वापर होतो. अशक्तपणा, गर्भधारणेसाठी उपयोगी.
काडे चिरायत ः पाने, मुळे वापरतात. यकृत संरक्षणासाठी, संधिवात, पित्तनाशक म्हणून उपयोगी.
इसबगोल ः बियांचा वापर होतो. बद्धकोष्ठता, मूळव्याध, संधिवातावर उपयोगी ठरते.


पानवेल लागवड कशी करतात? पानवेलीसाठी सुपीक व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची आवश्‍यकता असते. क्षारयुक्त व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड करू नये. पानवेलीस उष्ण व दमट हवामान मानवते. पानवेल बागेत कायम सरासरी ६० ते ७० टक्के आर्द्रता असावी, त्यामुळे जमिनीची मशागत चांगल्याप्रकारे होणे आवश्‍यक असते. पानमळा लागवडीसंबंधी महत्त्वाचे मुद्दे ः १) पानमळ्यासाठी योग्य जमीन. २) वर्षभर भरपूर पाणीपुरवठा सोय. ३) पानमळ्यात काम करण्यासाठी कुशल मजुरांची उपलब्धता. ४) पानवेलीसाठी उपलब्ध बाजारपेठ व बाजारपेठेपर्यंत पाठवण्यासाठी वाहतुकीची साधने. ५) भरपूर प्रमाणात शेणखत व माती मिळण्याची शक्‍यता. ६) पानमळा उभारणीसाठी आवश्‍यक भांडवल. पानवेल हे नाजूक व सावलीप्रिय पीक असल्यामुळे पानवेलीची लागवड करण्याअगोदर सावलीसाठी व आधारासाठी शेवरी व शेवगा यांची लागवड करावी. पहिल्या पद्धतीमध्ये लागवड करण्यासाठी वाफ्याच्या लांबीच्या बाजूस शेवगा बियांची टोकण पद्धतीने लागवड करावी. शेवग्याच्या दोन झाडांमधील अंतर ६० सें.मी. ठेवावे. त्याच वेळी शेवरीच्या एक-दोन बिया शेवग्याच्या बियांबरोबर टाकाव्यात. पानवेल वाढीस लागल्यानंतर शेवरीची रोपे दोन आठवड्यात काढून टाकावीत. शेवग्याच्या विरुद्ध बाजूस एक मीटर अंतरावर शेवरीच्या बियाण्याची टोकण करावी.


शास्त्रोक्‍पद्धतीने कांदाचाळ उभारण्याविषयी मार्गदर्शन करावे. अपुरी साठवणूकक्षमता असल्याने कांद्याची नासाडी होते. शास्त्रोक्त पद्धतीने कांदाचाळ उभारून साठवणीत होणारे कांद्याचे नुकसान कमी करता येते, त्यासाठी कांदाचाळ बांधकामास सुरवात करण्यापूर्वी शासनाने ठरवून दिलेल्या विविध मापदंडाप्रमाणे चाळीचे बांधकाम करावे. चाळ उभारणी करताना शक्‍यतो उंच जागेची निवड करावी. पाणथळ किंवा उसाच्या शेताजवळील जागेची निवड करू नये.
जमिनीच्या प्रकारानुसार आवश्‍यक तेवढा पाया खोदून आराखड्यानुसार पायासाठी सिमेंट कॉंक्रिटचे पिलर/ कॉलम उभारावेत. तळाशी एक फूट माती काढून त्यामध्ये वाळू भरावी. नंतर चाळीची उभारणी करावी. कांदा साठवणुकीची जागा दीड ते दोन फूट उंच असावी, त्यामुळे खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरेल व गरम झालेली हवा चाळीच्या त्रिकोणी भागातून बाहेर निघेल. अशा रीतीने उत्तम वायुविजन होईल. पाया/आरसीसी खांब/ पिलर/ कॉलम, वरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपूर्ण सांगाडा तयार करावा. कांद्याची साठवणूक ही जास्तीत जास्त पाच फूट उंचीपर्यंत करावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

हेलिओथिस अळी

हेलिओथिस अळी म्हणजेच बोंडअळी किंवा घाटेअळी, या अळीमुळे कापूस, तूर, हरभरा या पिकांप्रमाणेच मका, ज्वारी, सूर्यफूल, टोमॅटो अशा अनेक पिकांचे अपरिमीत नुकसान होते. भारतात या किडीमुळे सुमारे १००० कोटी रुपये उत्पादनाचे नुकसान होते. बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशकांना या किडीची प्रतिकारक्षमता वाढली आहे. तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या अवास्तव फवारण्यांमुळे पीक उत्पादनात विषारी अंश (Residue) दृष्टोत्पत्तीस येवू लागले आहेत. बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी परिणामकारक कमी खर्चाची जैविक कीड नियंत्रण द्ध प्रचलित झाली आहे. यामध्ये भक्ष्यक कीटक, परोपजीवी   कीटक किडीमध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव यांचा वापर केला जात आहे
 
हेलिकोवर्पा न्युक्लिअर पॉलिहेड्रॉसिस विषाणू 
(
एच.एन.पी.व्ही.)मोठय प्रमाणावर उत्पादन करुन घाटेअळी / बोंडअळी नियंत्रणासाठी वापरात येतो. ग्रामीण भागातील महिलांनी एच.एन.पी.व्ही. निर्मिती व वापर तंत्रज्ञानाबाबत आता प्रशिक्षण घेतले पाहिजे. एच.एन.पी.व्ही. च्या फवारणीमुळे प्रभावी कीड नियंत्रण होते. यासाठी महिलांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पुढाकार घ्यावा. म्हणून एच.एन.पी.व्ही. निर्मितीची सोपी व घरगुती पद्धत समजावून घेणे गरजेचे आहे.

पिके
हेलिओथिस अळीची ओळख
हरभरा
घाटेअळी
ज्वारी, बाजरी, मका
कणसातील अळी
गहू
ओंबी खाणारी अळी
तूर, मूग, चवळी,    वाटाणा
शेंगा पोखरणारी अळी
कपाशी
अमेरिकन बोंडअळी
सूर्यफूल, झेंडू
फुलांवरील अळी
करडई
बोंडअळी
टोमॅटो, कारली, मिरची
फळ पोखरणारी अळी

एच.एन.पी.व्ही. निर्मितीसाठी लागणारे साहित्य
  • लहान कुपी किंवा पारदर्शक डबी अथवा बाटली.
  • दोनशे मिली एच. एन. पी. व्ही. मातृवाण
  • मातीचे भांडे
  • भेंडी किंवा हरभरा
  • पांढरा शुभ्र कापूस
  • काळे कापड
  • मध किंवा साखर

एच.एन.पी.व्ही. निर्मितीची सोपी पद्धत
शेतातील कपाशी, तूर अथवा हरभरा पिकातून काही बोंडअळया वेचून प्रत्येक   कुपीत किंवा डबीत एक याप्रमाणे ठेवावी.
१.      या अळयांना कोषावस्थेत जाईपर्यंत (म्हणजे २ ते १० दिवस) कुपीमध्ये किंवा डबीमध्ये भेंडी किंवा कपाशीची कोवळी बोंडे खायला द्यावीत.
२.     तळाशी ओली वाळू असलेल्या मातीच्या भांडयात तयार झालेले कोष पसरवून काळया कापडाने भांडयाचे तोंड व्यवस्थित बंद करावे.
३.     ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा साखर मिसळून द्रावण तयार करावे.
४.     या तयार केलेल्या साखरेच्या किंवा मधाच्या द्रावणात कापूस बुडवून पिळून काढावा. नंतर कोषातून बाहेर पडलेल्या पतंगावस्थेतील प्रौढ कीटकाला हाच कापूस खाद्य म्हणून मातीच्या भांडयाच्या तळाशी ठेवावा. भांडयाचे तोंड मात्र काळया कापडाने झाकून घ्यावे.
५.    मातीच्या भांडयातील पतंगांनी काळया कापडावर घातलेली अंडी गोळा करावीत.
६.      अगोदरच भिजविलेले हरभरा/भेंडी, पारदर्शक डबी/बाटलीत घेऊन त्यामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे अंडी टाकावीत.
७.    अंडयातून बाहेर पडलेल्या अळयांचे १० दिवसांपर्यंत पारदर्शक डबी/ बाटलीत संगोपन करावे.
८.     मिली पाण्यामध्ये १ मिली एच.एन.पी.व्ही. मातृवाण मिसळल्याने द्रावण सौम्य होते.
९.      अळी १० दिवसांची झाल्यावर तिच्या तिस-या अवस्थेपर्यंतच्या काळात सौम्य एन. पी. व्ही. द्रावणात भिजवलेले हरभरा खाद्यासाठी वापरल्याने अळीस एन. पी. व्ही. विषाणु ची बाधा होते.
१०.  अशा एन. पी. व्ही. विषाणूग्रस्त अळीमध्ये सूस्तपणा येणे, पोटाचा भाग गुलाबी  होणे, शरीरातन द्रव स्त्रवणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. नंतर अशी रोगग्रस्त अळी लवकरच मरते.
११.   या मेलेल्या अळया गोळा करुन उकळून थंड केलेल्या पाण्यात एक आठवडाभर साठवाव्यात.
१२.  अळया पाण्यात पूर्णपणे चिरडून द्रावण तयार करावे. हे मिश्रण ढवळून घ्यावे आणि असे मिश्रण कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यावे.
१३.  हे द्रावण थंड ठिकाणी साठवून बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ठराविक कालावधीमध्ये वापरता येते. तसेच त्याचा त्वरित वापर करावयाचा असल्यास ही फवारणी संध्याकाळच्या वेळेस पिकावर केल्याने बोंडअळीचे प्रभावीपणे नियंत्रण होते.
 
 टीप-
  • मि.ली. एन.पी.व्ही. मातृवाणापासून तयार केलेले ५० मिली द्रावण ७५० अळयांना एन.पी.व्ही. चा प्रादुर्भाव होण्यासाठी पुरेसे असते. या रोगग्रस्त अळयांपासून तयार केलेले एन.पी.व्ही. विषाणूयुक्त द्रावण एकर फवारणीसाठी पुरेसे आहे.
  • ४० एकर पिकावर फवारणी करण्यासाठी लागणारे द्रावण आणि त्यासाठी पुरेशा प्रमाणात रोगग्रस्त अळया मिळण्यासाठी कृषि विद्यापीठे तथा संशोधन केंद्राकडून उपलब्ध झालेले २०० मि.ली. एच.एन.पी.व्ही. मातृवाण पुरेसे होते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll