यंदाच्या हंगामात कापसाला चांगला भाव असला, तरी सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला नाही. कारण मोठी भाववाढ होण्याआधीच अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकला होता. सध्या कापसाची आवक बंद झाल्यासारखी आहे. चालू हंगामात शाळू ज्वारीची आवक कमी होत असून, भाव गेल्या हंगामाच्या तुलनेत वाढलेले आहेत..
हंगाम संपताना जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढय़ात कापसाचे भाव मोठय़ा प्रमाणावर कमी झाले. या वर्षीच्या हंगामात नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक सुरू झाली आणि भावासोबत आवकही चढत्या कमानीने राहिली. सर्वाधिक सहा हजार ७३१ रुपये क्विंटल भावाची नोंद ११ फेब्रुवारीला झाली. हंगामात सर्वसाधारण सरासरी भाव पाच हजार रुपये क्विंटल राहिला. शेजारच्या देशांतील कापसाचे कमी उत्पादन आणि केंद्र सरकारने निर्यातीसाठी खुला केलेला कोटा याचा परिणाम कापसाचे भाव वाढण्यात जसा देशभर झाला, तसा जालना बाजारपेठेतही झाला. आता आवक संपण्याच्या काळात कापसाचा भाव तीन हजार रुपयांपर्यंत खाली आला. निर्यातीचा नवीन कोटा नसल्याचा परिणाम भाव कमी होण्यात झाल्याचे सांगण्यात येते.
यंदाचे वर्ष कापसाची अधिक आवक असणारे राहिले. या काळात जालना मोंढय़ात पाच लाख १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक झाली. त्याची एकूण किंमत दोन अब्ज २७ कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. आधीच्या म्हणजे २००९-१० वर्षांत जालना मोंढय़ातील कापसाची एकूण आवक तीन लाख ९६ हजार क्विंटल आणि त्याची किंमत एक अब्ज २२ कोटी रुपये होती. यंदाच्या हंगामात कापसाला चांगला भाव असला, तरी सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला नाही. कारण मोठी भाववाढ होण्याआधीच अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकला होता. सध्या कापसाची आवक बंद झाल्यासारखी आहे. एप्रिलमध्ये कापसाची एक हजार ८५० क्विंटल एवढीच आवक झाली.
चालू हंगामात शाळू ज्वारीची आवक कमी होत असून, भाव गेल्या हंगामाच्या तुलनेत वाढलेले आहेत. ज्वारीचा भाव एप्रिलमध्ये तीन हजार ६०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता. ३० एप्रिलला ज्वारीचा कमाल भाव तीन हजार २०० रुपये व किमान भाव एक हजार ७०० रुपये क्विंटल होता. गेल्या आर्थिक वर्षांत एक लाख ८८ हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली होती; परंतु चालू आर्थिक वर्षांत मात्र ती लक्षणीय कमी होणार आहे. दररोजच्या जेवणात गव्हाऐवजी शाळू ज्वारीचा वापर करणाऱ्यांची संख्या जालना जिल्ह्य़ासह मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण करणारी ही भाववाढ आहे. गेल्या एप्रिलमध्ये जालन्याच्या मोंढय़ात १२ हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली होती.नवीन गव्हाची आवक आधीच्या वर्षांपेक्षा जास्त होत आहे. गेल्या एप्रिलमध्ये गव्हाची आवक जवळपास २२ हजार क्विंटल होऊन कमाल भाव एक हजार ७०० रुपये व किमान भाव एक हजार १०० रुपये राहिला होता. सोयाबीनची वाढलेली आवक हेही नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांचे वैशिष्टय़. सन २००९-१०मध्ये सोयाबीनची आवक एक लाख २४ हजार क्विंटल होती आणि पुढील आर्थिक वर्षांत ती तीन लाख ५२ हजार क्विंटलपर्यंत पोहोचली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत सोयाबीनच्या उलाढालीची एकूण किंमत आधीच्या आर्थिक वर्षांतील २७ कोटी रुपयांवरून ६९ कोटी रुपयांवर पोहोचली. ही उलाढाल भाववाढीमुळे नव्हे तर उत्पादनवाढीमुळे झाली. कारण या दोन्ही आर्थिक वर्षांतील सोयाबीनच्या भावात फारसा फरक नव्हता. जालन्याच्या मोंढय़ात सध्या मक्याचीही लक्षणीय आवक सुरू आहे. एप्रिलमध्ये ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक मक्याची आवक झाली आणि किमान भाव एक हजार २१० रुपये क्विंटल राहिला. सध्या जालना मोंढय़ात सर्वाधिक आवक होणारे मका हेच पीक आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत पाच लाख ५४ हजार क्विंटल मक्याची आवक झाली होती. नवीन हंगाम कापूस, सोयाबीन, मक्याची वाढती आवक असणारा आणि कापसाचा त्याच प्रमाणे ज्वारीचा भाव अगोदरच्या हंगामापेक्षा अधिक भाव असणारा आहे. प्रामुख्याने कापूस-ज्वारीच्या भावासंदर्भात जालना मोंढय़ातील अनेकांचे अंदाज चुकविणारा हा हंगाम आहे.
0 comments:
Post a Comment