IECIT

You are most welcome....
RSS

ठिबक सिंचन ठरतंय मिरची पिकांसाठी लाभदायक


नंदुरबार हे मिरचीच्या बाजारपेठेचे प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात मिरची पिकासाठी पोषक वातावरण असल्याने मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मिरची पिकासाठी मुबलक पाण्याची गरज असते. तथापि पाणीटंचाईमुळे हे पिक ठिबक सिंचन पध्दतीने घेणे शक्य आहे असा एक अभिनव प्रयोग नंदुरबार तालुक्यातील बामळोद येथील कैलास दशरथ पाटील या तरुण शेतकर्‍याने यशस्वी केला आहे. ठिबक सिंचन पध्दतीतून गेल्या वर्षी त्यांनी तीन एकर शेतीतून एक हजार पाच क्विंटल मिरचीचे भरघोस उत्पादन काढले.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच अपुर्‍या पाण्याचा काटकसरीने वापर करुन शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचन पध्दत उपयोगी ठरते. आजपर्यंत विविध फळ पिकांसाठी ही पध्दत शेतकर्‍यांनी उपयोगात आणल्याचे लक्षात येते. परंतु मिरची पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सुध्दा ठिबक सिंचन यशस्वी होते हे कैलाश पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच सिध्द करुन दाखविले आहे.

ठिबक सिंचन योजनेसाठी कृषि विभागाच्या केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजनेतून त्यांना ५० टक्के अनुदान उपलब्ध झाले आहे. ठिबक सिंचन करण्यासाठी कैलास पाटील यांना एकरी २४ हजार रुपये खर्च आला. यावर्षी त्यांनी चार एकर शेतीतून मिरचीसाठी ठिबक योजना उपयोगात आणली आहे. त्यामध्ये रोशनी आणि व्ही.एन.आर. २७० या सुधारित जातीच्या मिरचीचे वाण लावले आहे. ठिबक सिंचनातून मिरची उत्पादनाचा प्रयोग जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरला आहे. दररोज अनेक शेतकरी अभ्यासासाठी या ठिकाणी भेट देत आहेत. राज्याचे फलोत्पादन, वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री डाँ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ठिबक सिंचनातून शेती या प्रयोगास भेट देऊन श्री. कैलास यांचे अभिनंदन केले आहे.

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कैलास पाटील यांनी नोकरीसाठी शिक्षण घेण्यापेक्षा शेतीकडेच लक्ष देऊन कष्ट करण्याचा निर्णय घेतला. मिरचीसाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी कैलास यांनी दोन वर्षांपूर्वी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे इतर १२ शेतकर्‍यांसह अभ्यास दौरा केला.

बामळोद परिसरातील विहिरींना पाहिजे त्या प्रमाणात पाणी लागत नाही. मिरची सारख्या पिकासाठी हे पाणी पुरेसे नाही. कैलास यांनी शेतीत स्वत:ची विहिर खोदली आहे पण त्यात अपूरे पाणी लागले. गावात त्यांची स्वत:ची बोअरवेल आहे. कृषि विभागाचे मार्गदर्शन घेतल्यानंतर ठिबक सिंचन पध्दत मिरचीसाठी तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतजमीन ट्रक्टरने नांगरुन भुसभुशीत केली. मिरची लागवडीसाठी गादिवाफे तयार करुन त्यात ठिबक सिंचनाचे पाईप आणि नळ्या टाकल्या. भरपूर शेणखत टाकले. तालुक्यातील चौपाळे येथील नर्सरीमधून रोशनी आणि व्हि.एन.आर. २७० या सुधारित जातीच्या मिरची रोपांची तीन एकरामध्ये लागवड केली. गावातील बोअरचे पाणी एका पाईपद्वारे आणून ते विहिरीत सोडले. तेथून ते पाणी ठिबकसाठी वापरले.

ठिबक सिंचन मार्फत पाणी देत असल्याने जमिनीत सतत ओलावा राहिला. मिरची रोपांना अनेक फुटवे फुटले. त्यामुळे झाडाचा पसारा वाढला. बघता बघता मोठ्या प्रमाणात मिरचीची लागण झाली. ठिबक सिंचन पध्दतीतून नुसते पाणीच दिले जात नाही तर रासायनिक खते सुध्दा या पध्दतीतून देण्यात येतात. यातून धो-धो वाहणार्‍या पाण्याची बचत झाली आणि अपेक्षेप्रमाणे मिरचीची लागणही वाढली आहे.

आतापर्यंत ६ ते ७ मिरचीच्या तोडण्या झाल्या आहेत. त्यातून एकरी १५० ते २०० क्विंटल मिरची निघाली असून प्रति क्विंटल रुपये १२०० ते १३०० भावाप्रमाणे खर्च वजा जाता रुपये दोन लाखाचे उत्पन्न झाले आहे. काही महिन्यातच मिरचीची खुळणी होणार आहे. मिरची तोडण्यासाठी गावातूनच मजुर मिळतात. वर्षभर रोजगार मिळत असल्याने गावातून मजुरीसाठी त्यांचे स्थलांतर होत नाही. मजुरांना वेळेवर मजुरी दिली जाते. मजुरांना मिरचीसुध्दा दिली जाते.

ठिबक सिंचनातून मिरचीचे भरपूर उत्पादन मिळत असल्याने कैलासचे कुटूंब सुखी झाले आहे. दोन भाऊ व वडील असा त्यांचा परिवार आहे. पूर्वी कपाशी, मक्का या सारखी पिके घेत असत. परंतु त्यांचे मोजके उत्पादन निघत असे. मात्र इतर पिकांप्रमाणेच ठिबक सिंचनातून मिरचीचे भरघोस उत्पादन होत असल्याने नंदुरबारमध्ये आता एक वेगळा प्रघात पडला आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll