IECIT

You are most welcome....
RSS

फळझाड

फळझाडांच्या लागवडीपूर्वी शेताचा नकाशा एका कागदावर तयार करावा. शिफारशीत अंतरानुसारच फळझाडांतील लागवडीचे अंतर ठेवून खड्ड्यांचा खोदाईचा आराखडा तयार करावा. जेणे करून योग्य आकाराचे खड्डे वेळेवर खोदता येईल. पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्यातील मातीचा प्रकार, खड्ड्यांचे आकारमान आणि शेणखत व इतर खते, वेळोवेळी केलेली निगा, यावर पीक उत्पादन अवलंबून असते. खड्डा खोदताना घेतलेली काळजी भविष्यातील उत्कृष्ट यशस्वी फळबागा तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. जमीन चढ- उताराची असल्यास कंटूर अथवा उताराच्या समपातळी रेषेवर फळझाड लागवडीची आखणी करावी.
जमीन कोणत्या फळपिकाकरिता योग्य आहे, याचा निर्णय माती परीक्षणानुसार घ्यावा. लिंबू वर्गीय फळ पिकांसाठी अल्कधर्मीय चुनखडीयुक्त जमिनी योग्य नसतात. त्यामुळे अशा जमिनीमध्ये आवळा, चिंच या फळपपिकांची लागवड करणे योग्य ठरते. चुनखडी जास्त असलेल्या जमिनीत आंबा व लिंबू वर्गीय पिकांची लागवड करू नये.
खड्डे भरताना छोटे दगड, धोंडे काढून टाकावेत. खड्ड्यामध्ये कुजलेले शेणखत 50 टक्के आणि माती 50 टक्के हे मिश्रण अतिशय योग्य असते. खड्डा भरताना तळाशी शिफारशीत कीटकनाशकाची भुकटी टाकावी, तसेच प्रति खड्डा दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट खतमाती मिश्रणात मिसळून घ्यावे. त्यानंतर कलमे किंवा रोपांची लागवड करावी. जमिनीत ओघळी असल्यास किंवा जमीन उताराची असल्यास अशा ठिकाणी पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासाठी बांध किंवा सलग समपातळी चर खोदावेत. जास्तीचे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी शेतचर काढावेत.
फळझाड लागवडीच्या सुरवातीच्या काळात भाजीपाला, भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांसारख्या कमी उंचीच्या व द्विदल धान्य प्रकारातील आंतरपिकाची लागवड करून जादा उत्पन्न घेण्याचे नियोजन करावे. आंतरपिकांना वेगळी खताची मात्रा द्यावी. जेणेकरून मुख्य फळपिकावर आंतरपिकांचा परिणाम होणार नाही.

लागवडीसाठी रोपांची,कलमांची निवड
शासकीय रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठातूनच खात्रीलायक रोपे , कलमे खरेदी करावीत. फळझाडे जातिवंत, चांगल्या व विषाणूविरहित मातृवृक्षांपासून तयार केलेली असावीत. निवडलेली रोपे जास्त लहान नसावीत, तसेच जास्त जून नसावीत. रोपे,कलमे एक वर्ष वयाची, मध्यम वाढीची आणि 60 ते 75 सें.मी. उंच असावीत. कलम केलेल्या रोपांमध्ये खुंट व कलम काडीची जाडी सारखी असावी. फळझाडांचे कलम किंवा भरलेले डोळे जमिनीपासून 20 सें.मी.च्या वर नसावेत. कलमांना व छाट्यांना भरपूर मुळ्या असाव्यात. कलमांच्या फांद्या, पानांची वाढ समतोल व निरोगी असावी. योग्य त्या अधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेल्या रोपवाटिकेतून किंवा शासकीय रोपवाटिकेतूनच रोपे, कलमे खरेदी केलेली असावीत. लागवडीसाठी आवश्‍यक असणाऱ्या रोपांच्या संख्येपेक्षा 15 टक्के जास्त रोपे खरेदी करावीत. पावसाळी हंगामात दोन ते तीन पाऊस पडल्यानंतरच रोपांची लागवड करावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll