IECIT

You are most welcome....
RSS

उझी माशीचा प्रादुर्भाव

ढगाळ वातावरणामुळे रेशीम कीटकांवर उझी माशी या उपद्रवी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. या माशीची माहिती व त्यावर करावयाच्या उपायांविषयी माहिती करून घेऊ.
उझी माशी ही उपद्रवी कीड असून, तिच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांमध्ये नुकसान होत असल्याचे दिसून येते. देशात कर्नाटकच्या शेजारील राज्ये आंध्र प्रदेश व तमिळनाडू या ठिकाणी सन 1981-82च्या दरम्यान या माशीचा प्रादुर्भाव व प्रसार झाला. गेल्या काही महिन्यांपासून काही जिल्ह्यांमध्ये उझी माशीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झालेली आहे. उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 10 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
या माशीच्या जीवनचक्रातील अंडी, मॅगट, प्युपा, माशी या चार अवस्था आहेत. नर उझी माशी मादी उझी माशीच्या तुलनेत आकाराने मोठी असते. पाठीवर गडद काळ्या रंगाचे चार उभे पट्टे असतात. ही माशी 300 ते 1000 पर्यंत अंडी घालू शकते. ही माशी शक्‍यतो चॉकी अवस्थेतील रेशीम कीटकांवर अंडी घालण्याचे टाळते, तर आकाराने मोठ्या असलेल्या प्रौढ रेशीम कीटकांना भक्ष्य बनवते. अंडे घातल्यापासून एक-दोन दिवसांत अंड्यातून मॅगट बाहेर येतो, ज्याचा रंग पिवळसर पांढरा असतो. मॅगट रेशीम कीटकाच्या नाजूक त्वचेला छिद्र पाडून कीटकाच्या शरीरात प्रवेश करतो. ज्या ठिकाणाहून तो प्रवेश करतो, त्या ठिकाणी काळ्या रंगाचा डाग दिसून येतो. परिपूर्ण वाढ झालेला क्रीम व्हाइट रंगाचा मॅगट संगोपनगृहातील रॅकमध्ये, जमिनीला असलेल्या भेगांमध्ये अथवा कीटक संगोपनगृहातील कोपऱ्यांमध्ये अंधाऱ्या जागी वाटचाल करतो. या ठिकाणी त्याची पुढील प्युपा अवस्था सुरू होते. प्युपा अवस्था 10 ते 12 दिवसांची असते. प्युपाचा आकार लंबगोलाकार/दंडाकृती असून, प्रौढ प्युपाचा रंग गडद तपकिरी असतो. या प्युपामधून मादीच्या तुलनेत नर उझी माशी अगोदर बाहेर येते. उझी माशीचा जीवनाचा कालावधी 17 ते 18 दिवसांचा असतो. या एकूण कालावधीपैकी चवथ्या ते सातव्या दिवसांपर्यंत मोठ्या प्रमाणात अंडी घालते. नर माशीपेक्षा मादी माशीचा जीवनकाल अधिक असतो. उझी माशी 1000 ते 2000 मीटरपर्यंत उडू शकते
नियंत्रण
भौतिक, रासायनिक व जैविक उपायांनी नियंत्रण करणे शक्‍य आहे.
भौतिक उपाय – कीटक संगोपनगृह, कोष खरेदीकेंद्र, अंडीपुंजनिर्मिती केंद्र, रेशीम धागानिर्मिती केंद्र इ. ठिकाणांवरील मॅगट व प्युपा गोळा करून जाळून नष्ट करावा किंवा 0.5 टक्के साबणाच्या द्रावणात नष्ट करावा. जमिनींना असलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात. उझी माशीच्या प्रादुर्भावास बळी पडलेले रेशीम कीटक गोळा करून नष्ट करावेत.
पाचव्या अवस्थेतील रेशीम कीटकांस प्रादुर्भाव झाला असेल, तर असे प्रादुर्भावित रेशीम कीटक इतर रेशीम कीटकांच्या तुलनेत दोन दिवस अगोदर कोष बांधतात. असे कोष मॅगट बाहेर येण्यापूर्वीच गोळा करून त्यांवर कोष ड्राय करण्याची प्रक्रिया करावी, ज्यामुळे कोषातील मॅगट मरून जाईल व कोषांचे नुकसान होणार नाही. उझी माशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणावरून कोष, मॅगट, प्युपा येणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या गावांतील शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या एक-दीड महिना पीक बंद ठेवावे, ज्यामुळे उझी माशीच्या जीवनचक्रात निसर्गतःच अडथळा निर्माण होऊन तिच्या प्रसारावर नियंत्रण मिळविता येईल. कीटक संगोपनगृहाच्या खिडक्‍या व तावदाने इत्यादींना नायलॉन जाळीने झाकून घ्यावे, यामुळे जवळपास 20 ते 22 टक्के नियंत्रण मिळविता येते. चॉकी ट्रे, तसेच रॅक नायलॉन जाळीने झाकून ठेवावे, यामुळे उझी माशीला अंडी घालणे शक्‍य होणार नाही.
किडीची लक्षणे
रेशीम कीटकाच्या शरीरावर लहान एक ते दोन अंडी असणे किंवा रेशीम कीटकाच्या त्वचेवर काळ्या रंगाचा डाग असणे किंवा कोषाला छिद्र पाडून मॅगट बाहेर आलेला असणे.
उझी माशीचा प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या तिसऱ्या अवस्थेत झालेला असल्यास रेशीम कीटक कोषावस्थेपूर्वीच मृत होताना आढळतात, जर प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या पाचव्या अवस्थेत झालेला असेल, तर पोचट कोषांची निर्मिती होते. होणारे नुकसान 10 ते 30 टक्के असते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll