IECIT

You are most welcome....
RSS

नॅडेप कंपोस्ट खत

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रीय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदोर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.नॅडेप कंपोस्ट खत
ही पद्धत गांधी वादी शेतकरी श्री. नारायण राव देवराव पांढरीपांडे, मु. पुसद, जि.यवतमाळ यांनी येथील गोधन केंद्रात त्यांच्या स्वतच्या प्रयोगशिलतेतून विकसित केली आहे. त्यांच्या नावावरून या पद्धतीला नॅडेप कंपोस्ट पद्धती असे नामकरण करण्यात आले. या पद्धतीचे वैशिष्टय म्हणजे कमी कालावधीत चांगले कुजलेले कंपोस्ट तयार होते. तयार होणा-या खतात अन्न द्रव्याचे प्रमाण वाढते तसेच कमी शेणाचा उपयोग करून जास्तीतजास्त कंपोस्ट खत तयार करता येते.

टाक्याचे बांधकाम
या पद्धतीत चांगला पाया भरून जमिनीवर पक्क्या विटांच्या सहाय्याने ३ मीटर लांब, १.८० मीटर रूंद व ०.९० मीटर उंच (१० x x ३ फूट) अशा आकाराचे टाके बांधले जाते. टाक्याच्या भिंतीची जाडी २२.५ सेंमी. (९इंच) असावी. विटांची जुळवणी व बांधकाम मातीत करावे. टाके पडू नये म्हणून वरच्या थरांची जुळाई सिमेंटची करावी. टाक्याच्या तळाचा भाग धुमसाने विटा व दगड घालून टणक बनवावा. या टाक्यात मोकळी हवा खेळती रहावी याकरिता टाके बांधताना चारही बाजूच्या भिंतींना छिद्र ठेवावे लागते. विटांच्या दोन थरांची जुळाई झाल्यानंतर तिस-या थराची जुळाई करताना प्रत्येक वीट १७.५ सेंमी ( ७ इंच ) रिकामी जागा सोडून जुळाई करावी म्हणजे चारही बाजूला १७.५ सेंमी अंतराचे छिद्र तयार होऊन त्यातून मोकळी हवा खेळू शकेल. यामुळे काडीकचरा, पालापाचोळा कुजण्याची क्रिया चांगली होते. पहिल्या ओळीच्या दोन छिद्राच्यामध्ये दुस-या ओळीचे छिद्र व दुस-या ओळीच्या दोन छिद्राच्यामध्ये तिस-या ओळीचे छिद्र येईल. या पद्धतीने जुळाई करावी. अशाप्रकारे ३-या, ६ व्या व ९व्या थरामध्ये छिद्र तयार होईल. टाक्याच्या आतील व भूपृष्ठाचा भाग शेण व मातीने लिंपावा. टाके वाळल्यानंतर उपयोगात आणावे.

नॅडेप कंपोस्ट करण्याकरिता लागणारी सामग्री
१) शेती किंवा इतर भागातील काडीकचरा, पालापाचोळा, मुळ्या, टरफल, सालपटे इत्यादी १४०० ते १५०० किलोग्रॅम  यात प्लॅस्टीक, काच, गोटे इत्यादी वस्तूंचा समावेश असू नये.
२) ९० ते १०० किलोग्रॅम (८ ते १० टोपले) शेण (गोबर गॅस संयंत्रातून निघालेल्या
शेणाच्या लगद्याचा सुद्धा उपयोग करता येईल.)
३) कोरडी माती - शेतातील किंवा नाल्यातील बारीक गाळलेली माती १७५० किलो (१२० टोपली )
४) पाणी - कोरडा पालापाचोळा, काडीकचरा व इतर वनस्पती यांच्या वजनापेक्षा २५ टक्के जास्त पाणी ( १५०० ते २००० लिटर) कंपोस्ट खताची गुणवत्ता वाढविण्याकरिता गाईचे किंवा इतर जनावरांचे मुत्र जमा करून त्याचाही उपयोग करावा.

नॅडेप कंपोस्ट टाके भरण्याची पद्धती
पहिली भराई
टाके भरण्याचे काम सुरू करण्यापूर्वी टाक्याच्या आतील भिंती व तळ शेण व पाणी यांचा धोळ करून ओल्या कराव्यात.
अ)पहिला थर
काडीकचरा व पालापाचोळा, देठ, मुळे इत्यादी वनस्पतीजन्य पदार्थाचा पहिला १५ सेंमी.चा (६ इंच) थर टाकावा.
ब) दुसरा थर
१२५ लीटर पाणी व ४ किलो शेण यांचे मिश्रण पहिल्या काडी कच-याच्या थरावर शिंपडावे जेणेकरून संपूर्ण वनस्पतीजन्य पदार्थ ओले होतील.
क) तिसरा थर -
साफ वाळलेली व गाळलेली माती वनस्पतीजन्य पदार्थाच्या ५० टक्के (५० ते ६० किलो) याप्रमाणे शेण व पाण्याच्या मिश्रणाने ओल्या केलेल्या वनस्पतीजन्य पदार्थावर पसरावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे.

वरील पद्धतीने प्रत्येक वेळी ३ थर देण्याच्या पद्धतीचा अवलंब करून टाक्याच्यावर ४५ सेंमी (१.५ फूट) उंच थर येतील याप्रमाणे टाके भरावे. साधारणत ११ ते १२ थरामध्ये टाके भरले जाते. त्यावर ७.५ सेंमी (३ इंच) मातीचा थर (४०० ते ५०० किलो) टाकून त्यावर शेण व पाणी यांच्या मिश्रणाने व्यवस्थित लिंपून टाकावे. वाळल्यानंतर भेगा पडल्यास पुन्हा शेण व पाण्याच्या मिश्रणाने लेप द्यावा.

२) दुसरी भराई
१५ ते २० दिवसानंतर या टाक्यात टाकलेली सामग्री आकुंचन पाऊन साधारणत २० ते २२.५ सेंमी (८ ते ९ इंच) खाली दबलेली दिसून येईल. तेंव्हा पुन्हा पहिल्या भराई प्रमाणेच वनस्पतीजन्य पदार्थ शेण व मैंती मिश्रण आणि गाळलेल्या मातीच्या थराने पुन्हा थराची रचना करून टाक्याच्या वर ४५ सेंमी उंचीपर्येंत टाके भरून पुन्हा ७.५ सेंमी (३ इंच) मातीचा थर देऊन शेण व माती यांचे मिश्रणाने लिंपून बंद करावे.
या पद्धतीमध्ये टाके भरल्यापासून चांगले कंपोस्ट खत तयार होण्याकरिता ९० ते १२० दिवस लागतात. या संपूर्ण कालावधीत पडलेल्या भेगा शेण व पाण्याच्या मिश्रणाने बुजविणे व शिंपडणे चालू ठेवणे याबाबत दक्षता घ्यावी. टाक्यावर गवत उगवल्यास ते काढून टाकावे, आर्द्रता कायम ठेवणे , तसेच जास्त ऊन असल्यास गवत किंवा चटईने टाके झाकून ठेवावे.

खताची परिपक्वता
तीन चार महिन्यात खत परिपक्व होऊन खताचा रंग भुरकट होतो. खताचा दुर्गंध नाहिसा होतो. अशा खतामध्ये १५ ते २० टक्के ओलावा कायम असावा. हे खत चाळणीने गाळून चाळणीच्या वरील अर्धकच्या वनस्पतीजन्य पदार्थाचा भाग पुन्हा टाक्यात वापरावा. चाळणीमधून गाळलेले खत जमिनीमध्ये पेरून घ्यावे. या टाक्यातून साधारणत १६० ते १७५ घनफूट चाळलेले खत व ४० ते ५० घनफूट कच्चा माल मिळतो.

कंपोस्ट खत देण्याची पद्धत
पुरेशा प्रमाणात आपणाजवळ नॅडेप कंपोस्ट खत तयार असल्यास दरवर्षी प्रती हेक्टर ७.५ ते १२.५ टन खत पेरणीच्या १५ दिवस अगोदर पसरून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेल्या कंपोस्ट खताची उपलब्धता कमी असल्यास पेरणीच्या वेळी चाडयामधून द्यावे. खत देण्याचे चाडे पुढे ठेवून बियाणे पेरणीकरिता चाडे मागे असावे. जेणेकरून खत प्रथम जमिनीत पडेल व त्यानंतर बियांची पेरणी होईल. टाक्यामधून खत काढल्यानंतर ते मोकळ्या जागेत ठेवू नये. खत प्रत्यक्ष देण्यापूर्वी काही दिवस साठवून ठेवायचे असल्यास ढीग लावून व त्यावर गवताचे आच्छादन टाकून ठेवावे. मधून मधून पाणी शिंपडावे. त्यामुळे आर्द्रता कायम राहण्यास मदत होईल.

तरी सर्व शेतक-यांनी नॅडेप कंपोस्ट खत पद्धतीचा अवलंब करून उत्तम कंपोस्ट खताची निर्मिती करावी, व त्याचा वापर करून जमिनीचा पोत व उपजाऊशक्ती कायमस्वरूपी राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. यामुळे राष्ट्राची खताची समस्या सोडविण्यास हातभार लागेल.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll