Welcome You All

RSS

तूर

म ध्यम ते भारी (45 ते 60 सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही, तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जिवाणूंच्या ग्रंथीची वाढ योग्य होत नसल्याने रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट होते. तुरीची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे खोल नांगरणी करून वरवरच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी. पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडी, कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. पिकाच्या चांगल्या उगवणीसाठी आणि अनुकूल वाढीसाठी चांगली पूर्वमशागत आवश्‍यक असते.

पेरणी आणि बियाण्यांचे प्रमाण ः
मॉन्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान तुरीची पेरणी पूर्ण करावी. पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने हेक्‍टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्‍यक असते. त्यासाठी प्रति हेक्‍टर बियाण्याचे पुरेसे प्रमाण ठेवावे.

बीजप्रक्रिया आणि जिवाणूसंवर्धन :
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डेझीम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास 250 ग्रॅम चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.

खतांची मात्रा ः
सुधारित वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते. प्रति हेक्‍टरी चांगले कुजलेले पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाच्या सुरवातीच्या काळात नत्राची गरज भागविण्यासाठी तूर पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद म्हणजे 125 किलो डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्‍टरला द्यावे. प्रति हेक्‍टर 30 किलो पालाश म्हणजेच 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिले असता पीक प्रतिसाद देऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा अनुभव आहे.

आंतरमशागत :
पीक सुरवातीपासूनच तणविरहित ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्‍यक बाब आहे. कोळप्याच्या साहाय्याने पीक 20-25 दिवसांचे असताना पहिली आणि 30-35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते व त्यायोगे पीकवाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्‍यतो वाफशावर करावी. तूर पीक पहिले 30 ते 45 दिवस तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असते. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. मजुरांअभावी खुरपणी करणे शक्‍य नसल्यास पेरणीपूर्वी तणनाशकाचा वापर करावा, त्यासाठी प्रति हेक्‍टरला पेंडीमेथिलीन हे तणनाशक तीन लिटर प्रति 500 ते 700 लिटर पाण्यातून जमिनीवर फवारून वखर पाळी घालावी म्हणजे ते जमिनीत चांगले मिसळले जाऊन तणनियंत्रण अधिक प्रभावी होते.

पाणी व्यवस्थापन :
तूर हे कडधान्य पीक बहुतांश पावसाच्या पाण्यावर येते, परंतु पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमीन मध्यम, उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहात नाही. जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणावर फूलगळ होते. हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा फार कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याच्या सुरवातीलाच संरक्षित पाणी द्यावे. अवर्षणप्रवण भागात लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पावसाची शक्‍यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर पहिले पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना आणि तिसरे शेंगात दाणे भरताना द्यावे. मात्र पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. पाऊस नसेल तर जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या अगोदरच प्रमाणात पाणी द्यावे.
ः 02426 - 233447
(लेखक कडधान्य सुधार प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर येथे कार्यरत आहेत.)

आंतरपीक आणि मिश्र पीक पद्धती
पारंपरिक शेतीमध्ये कोरडवाहू क्षेत्रात तूर हे मिश्र किंवा आंतरपीक म्हणून घेतले जाते. कपाशीच्या सहा किंवा आठ ओळींनंतर एक ओळ तुरीची अशी पद्धत विदर्भामध्ये प्रचलित आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच मराठवाडा, विदर्भामध्ये खरीप ज्वारीचे पीक घेण्याची पद्धत आहे. अशा क्षेत्रामध्ये 45 सें.मी. अंतरावर ज्वारीच्या दोन ओळी आणि त्यानंतर 30 सें.मी. अंतरावर तुरीची एक ओळ अशी पद्धत प्रचलित आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बाजरीमध्ये तुरीचे आंतरपीक घेण्याची पद्धत आहे, यासाठी 45 सें.मी. अंतरावर बाजरीच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची या पद्धतीने पेरणी केल्यास बाजरीचे पीक सप्टेंबरपर्यंत निघून जाते आणि पुढे पडणाऱ्या हस्ताच्या पावसावर तुरीचे चांगले पीक हाती येते. अलीकडे भुईमूग, सूर्यफूल व सोयाबीन या पिकांमध्ये सुद्धा तुरीचे आंतरपीक घेणे शक्‍य आहे .
भुईमूग किंवा सोयाबीनच्या तीन ओळींनंतर तुरीची एक ओळ पेरावी आणि दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. यासाठी तुरीचे विपुला, बीएसएमआर- 853, एकेटी- 8811 हे वाण उपयुक्त आहेत. मूग, उडीद किंवा चवळी यांसारख्या अतिशय लवकर येणाऱ्या पिकांमध्ये मुगाच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीच्या जोमदार वाढीची सुरवात होण्यापूर्वी मूग/ उडीद/ चवळीचे पीक हाती येते आणि त्यापासून एकरी तीन ते चार क्विंटल उत्पन्न मिळते, मुख्य पीक तुरीपासून 12 ते 15 क्विंटल/ हेक्‍टर उत्पन्न मिळते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll