पशुसंवर्धन व्यवसायात ६० ते ६५ टक्के खर्च हा त्यांच्या आहारावर होत असतो. त्यामुळे चारा उत्पादन व व्यवस्थापनाद्वारे हा खर्च १० ते १५ टक्केपर्यंत कमी करता येतो. संपूर्ण वाढ झालेल्या दुधाळ जनावरास २५ ते ३० किलो हिरवा चारा, तसेच सहा ते आठ किलो वाळलेला चारा देणे आवश्यक आहे, तर शेळ्यांसाठी चार ते पाच किलो हिरवा चारा आणि एक ते दीड किलो वाळलेला चारा पुरविणे फायद्याचे ठरते.
जनावरांना दिला जाणारा चारा हा सकस व संतुलित असणे आवश्यक असते; या चाऱ्यामध्ये प्रथिने, स्निग्ध, ऊर्जा, खनिजे व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असली पाहिजेत. जनावरांच्या संख्येनुसार आपल्याकडे लागवडीस उपलब्ध असलेल्या क्षेत्रापैकी २० टक्के क्षेत्र चारापिके लागवडीसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. सकस व हिरवा चारा उपलब्ध करण्यासाठी ओलिताखालील हमखास पाण्याची उपलब्धता असणाऱ्या अल्पशा क्षेत्रातून हंगामी व बहुवार्षिक बागायती चारापिकांची लागवड करावी. कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या ते मध्यम मुरमाड, डोंगर-उताराच्या चराऊ क्षेत्रात जेथे पर्जन्यमान अत्यंत कमी आहे आणि ज्या ठिकाणी कोणतेही पीक घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशा जमिनीवर चारापिकांची लागवड करून जास्तीत जास्त चारा निर्मिती करावी.
चारापिकांचे नियोजन :
एकदल चारापिके : ज्वारी, बाजरी, मका, ओट इत्यादी.
द्विदल चारापिके : ल्युसर्न, बरसीम, चवळी, गवार इत्यादी.
त्यामुळे चारापिकांचे उत्पादन करताना एकच प्रकारचा चारा उत्पादन करून चालणार नाही, कारण जनावरांच्या आहारात एकदल आणि द्विदल चाऱ्याचे प्रमाण हे १:१ असे असायला हवे.
संपूर्ण वाढ झालेल्या एक जनावरास वर्षभर दररोज २५ ते ३० किलो एवढा एकदल आणि द्विदल चारा उपलब्ध होण्यासाठी दहा गुंठे क्षेत्र चारापिकांच्या लागवडीसाठी पुरेसे ठरते, याप्रमाणे एक हेक्टर क्षेत्रात दहा जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध केला जाऊ शकतो. याशिवाय वाळलेल्या चाऱ्याची गरज ही कडबा, सरमाड, भुस्सा, वाळलेले गवत इत्यादींपासून भागवली जाऊ शकते.
पशुसंवर्धन
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment