Welcome You All

RSS

शेतकर्‍याला गाय

“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.”
त्याचं असं झालं,आमच्या बिल्डींगच्या खाली धनाजी जाधवांचं फळाचं दुकान आहे हे धनाजी खंभिररावांचे धाकटे भाऊ.कोकणातून येणारा फळांचा आणि भाज्यांचा माल जाधव आपल्या दुकानात ठेवतात.आंब्या फणसाच्या मोसमात कोकणातून ट्रक भर-भरून माल आणून ह्या दुकानात विकला जातो.अलीकडे तर रोजच एक दोन ट्रकांची कोकणातून येण्या-जाण्यात फेरी होत असल्याने, चाफ्याची,आबोलीची,मोगर्‍याची ताजी फुलं,तसंच गणपतिच्या सणात कमळाची,आणि लाल रंगाची ताजी फुलं पण आणून ठेवतात. हार-वेण्या करण्यासाठी फुलं विकत घेण्यासाठी फुलवाल्यांची दुकानात रोजचीच गर्दी असते.
एकदा गप्पा मारत असताना जाधव मला म्हणाले,
“केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला सांगा.परतीच्या ट्रकात बसून आपण माझ्या बरोबर या. कोकणात जाऊंया. माझ्या भावाची छोटीशीच शेती आहे.तुम्हाला त्यांचं जीवन पहायला मजा येईल.”
आणि तो दिवस उजाडला.मी धनाजीबरोबर दोन चार दिवस रहायला त्यांच्या भावाच्या गावी गेलो होतो.
“आमच्या पूर्तिच शेती करायला मला आवडतं.मी आणि माझी बायको ह्या शेतावर मेहनत घेतो.आमच्या मेहनतीच्या पैशाने हे शेत आणि थोडी गुरं आम्ही विकत घेतली.हा सारा व्याप सांभाळताना आम्ही आमच्या दोन मुलांची जोपासना पण करीत असतो.”
खंभिरराव जाधव,मला माहिती देत होते.
दुसर्‍या दिवशी मी खंभिररावांच्या शेतावर फेरफटका मारायचं ठरवलं होतं.त्याशिवाय त्यांच्या गाईच्या दुधाच्या व्यवसायचं त्यांच्या भावाकडून ऐकलं होतं,त्याचंही कुतूहल माझ्या मनात होतं.ते पण पहाणार होतो.आणि वेळ मिळेल तेव्हा खंभिररावांशी गप्पा मारून माहिती काढायचं ठरवलं होतं.
शेतीची आणि त्याशिवाय दुधदुभत्याची कामं हाती घेतल्यावर ह्या व्यवसायात माणूस दिवसाचे चौविस तास व्यस्त असतो हे मला माहित होतं.
पण त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी मी जाधवांना म्हणालो,
“हा शेतीचा धंदा असा आहे की तुमच्या रोजी-रोटीवर होत असणारे परिणाम बाह्य कारणावर अवलंबून असतात. आणि त्यावर तुमचं कसलही नियंत्रण नसतं.हवामान हा एक मोठा मुद्दा असतो.हे सर्व बाह्य परिणाम जेव्हा तुमच्या विरूद्ध जातात तेव्हा शेतीचा धंदा निमूट चालण्यात जास्त किफायतशीर असतो असं मी ऐकलं आहे ते खरं काय?”.
खंबिरराव हंसत हंसत मला म्हणाले,
“खूप थकायला होत असणार नाही काय?”
असं शेती न करणारी आमची मित्रमंडळी आम्हाला विचारतात.
माझं म्हणणं, खरंच थकायला होत असतं.
पहाटे चारला उठण्याचा प्रघात दिवसानी -दिवस ठेवावा लागतो.
पण यातही अभिमान वाटण्याची समाधानी आणि आमच्या स्वमेहनतीमुळे हे घडतंय हे पाहूनच आमचा मार्ग चाललेला असतो.”
मी म्हणालो,
“ह्या नकारात्मक वृत्तिने भरलेल्या समुद्रात शेती नकरणारे हे लक्षात का आणू शकत नाहीत हे कळायला जरा कठीणच जातं.”
“ह्या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात शेती असताना सहभाग घेणार्‍यांना खूपच कष्ट पडत असतील यात वाद नाही. परंतु,आम्ही सांभाळतो तसं छोटंसं शेत सांभाळण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा व्यवसाय एव्हडा हाडां-मासांत खिळलेला असतो की काहीतरी गोष्ट करीत राहाण्याशिवाय गत्यंतरच नसतं.हा व्यवसाय करताना पैशावर डोळा ठेऊन आम्ही करीत नाही.आंतरीक इच्छेमुळे आम्ही त्यात आहोत.”
खंभिररावानी आपलं प्रांजाळ मत दिलं.
“गाईच्या दुधाच्या व्यवसायाचा व्याप कसा असतो हो?”
मी खंभिररावांना लगेचच विचारलं.
“तेही तितकंच कटकटीचं असतं,पण कुठच्याही कामावर प्रेम असल्यानंतर त्याची कटकट भासत नाही.उलट उमेद येते.”
खंभिरराव सांगायला लागले.
“सकाळीच उठून गाईंच्या आंचूळ्या धूवून मग दूध काढताना दुधाच्या आठ-दहा चरव्या भरून निघाल्यावर संतुष्ट होण्यात इतकं समाधान वाटतं की काय सांगावं.ह्या गुरांना खाणं-पिणं व्यवस्थीत गेल्याने दुधाचा रतीब वाढतो. आपल्या आईचं दुध लुचून लुचून, पाडसं गुबगुबीत होतात.आणि वयात आल्यावर गाभण राहून मग विहिल्यानंतर परत दुधाच्या पुरवठ्यात भर टाकायला मदत करतात.
काही गाई भाकड झाल्यावर गुराख्याबरोबर माळावर चरायला पाठवल्यावर उरलेल्या दुभत्या गाई दुधाची उणीव भरून काढतात.”
भाकड गाईंबद्दल मला बर्‍याच शंका होत्या.आणि काही अपसमजही मी ऐकले होते.प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या तोंडून “फ्रॉम हॉरसीस माऊथ” म्हणतात तसं होईल म्हणून मी जाधवांना विचारलं,
“ह्या भाकड गाई नंतर कसायाकडे दिल्या जातात, असं मी ऐकलं होतं.किती खरं आहे?”
“छे,छे! कुणी सांगीतलं तुम्हाला?”
माझ्या प्रश्नाने जाधव जरा वैतागल्या सारखे मला वाटले.
मला म्हणाले,
“कोकणातला शेतकरी हे पाप कधीच करणार नाही.गाईला देवी कशी मानली जाते.गाई भाकड झाल्या तरी काय झालं? ती गाईची तात्पुरती अवस्था असते.गुराख्याकडे भाकड म्हणून दिलेल्या गाई त्यांचा फळायचा मोसम आल्यावर त्या फळल्या जातात. एखाद दुसरी गाय सोडल्यास उरलेल्या गाई गाभण राहिल्या हे ऐकून पुढच्या मोसमात जादा दुधाच्या चरव्या भरणार ह्याचा विचार आमच्या मनात येऊन चार पैसे गाठीला जमतील मुलांना
दिवाळीत नवीन कपडे घेता येतील याची जाणीव होऊन आम्हा दोघां नवरा-बायकोना मेहनतीचं सार्थक होतंय हेच उलट तृप्तिचं कारण बनतं.”
असा प्रश्न का केला ह्याचा संदर्भ देताना मी जाधवांना म्हणालो,
“वांद्र्याला फार पूर्वी कसाईखाना होता.आता तो तिकडून उचकटून टाकला आहे.त्या दिवसात बाहेर गावाहून गुरांचा कळप मुंबईला कत्तल खान्यात घेऊन यायचे हे मी पाहलंय.ती गुरं कुठून यायची ह्याची कल्पना नाही.”
“त्या गुरांच्या कळपाचं मला काही माहित नाही.”
असं म्हणून खंभिरराव मोठ्या अभिमानाने आणि सद्गदीत होऊन सांगू लागले,
“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.
खाण्या पिण्यात त्यांची यत्किंचही आबाळ करीत नाही.आणि दुर्दैवाने त्या म्हातार्‍या गाई निर्वतल्या तरी आम्ही शेताच्या बाहेर माळरानावर खड्डा करून पुरतो.अक्षरशः घरातलं माणूस गेल्या सारखं शेतकर्‍याला दुःख होतं.दोन दिवस आम्ही उपास केल्यासारखे रहातो.त्यावर्षी आम्ही सणसोहळा सुद्धा करीत नाही.घरातली लहान मुलं सुद्धा दुर्मुखलेली रहातात.गेलेल्या गाईचं कातडं पायतानासाठी वापरायला महार-चांभार पूर्वी यायचे.पण पैशासाठी
म्हणून सुद्धा कोकणी शेतकरी गरीब झाला म्हणून ह्या मार्गाला जाणार नाही.”
चर्चा बरीच अशी भावूक होत आहे असं पाहून मी जरा विषय बदलण्याचा विचार करून जाधवांना म्हणालो,
“शेती कामात अवजारं वापरायची झाली म्हणजे त्यात दुरूस्थी-नादुरूस्थीच्या कटकटी आल्याच.पण ती अवजारं पुन्हा वापरण्याच्या स्थितीत आणल्यावर मनःशांती मिळते ती वेगळीच असते.तुम्हालाही तसं होत असेल नाही काय?”
“मनःशांती,आनंद,समाधानी आणि उत्कंठा असले प्रकार शेतकर्‍याच्या जीवनात येतच असतात.”
खंभिररावानाही मी विषय बदलल्याचं जाणवलं असावं.
मला म्हणाले,
“दोनचार कुंणग्यात भातशेती रोवून पिकं आल्यावर जमा केलेला तांदूळ गोण्या भरून मांगरात रचून ठेवायला आनंद होतो.शेती संपल्यावर त्याच जागेत मिरची,डांगर भोपळे,मुळा अशी भाजीची पिकं काढायला,आमचा आवर बेताचाच असल्याने मेहनत घ्यायला परवडतं.
कामं अजिबात न संपणार्‍या ह्या व्यवसायात काहीतरी संपादन केलं ह्याची समाधानी औरच असते.मग ते काम तांदळाची तूसं काढण्याचं असो किंवा गायरीतलं खत उपसून कुंणग्यात पसरवण्याचं असो, कशाचाही आधाराने, कोणतही काम त्या मोसमापुरतं झालं म्हणजे फत्ते.हवामान खात्याने दिलेलं भाकित खोटं ठरून येणारं वावटळीचं वादळ पुर्वेच्या दिशेने निघून गेल्याचं पाहून सुटकारा मिळाल्यावर मनही प्रफुल्लीत होतं.”
चर्चेचा शेवट आनंदात होतोय असं पाहून मी खंभिररावाना म्हणालो,
“आणि सर्वात उत्तम गोष्ट ही की तुमची मुलं रोज तुमच्या सहवासात असतात ह्याचं महत्व किती मोठं आहे.मेहनतीची फळं मिळाल्याचं पाहून त्यांना परिश्रमाची मुल्यं कळतात हे पाहून तुमचं समाधान होत असेल हे ही तितकंच महत्वाचं आहे.आणि तुमच्या मुलांच्या तोंडात आरोग्यजनक आणि पौष्टीक अन्न पडतं हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे असं तुमच्या मुलांना वाटणं हे ही खूप समाधानाचं आहे.
अगदी खूश होऊन जाधव मला म्हणाले,
“म्हणूनच मला शेती आवडते.”
दुसर्‍या दिवशी आणि माझ्या पुर्‍या मुक्कामात मी,खंभिरराव आणि त्यांचे धाकटे बंधू धनाजी यांच्यासह मनसोक्त पाहूणचार घेतला हे सांगायला  नकोच.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment

Text

Followers

Blogroll